Tuesday, July 3, 2012

सत्यशोधक : एक प्रांजळ नाट्यानुभव

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या सफाई कामगारांना घेऊन अतुल पेठे यांनी गो.पु.देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ या नाटकाचा अत्यंत रेखीव प्रयोग पेश केला आहे. रंगभूमीच्या मुख्य धारेपासून आजवर शतयोजने दूर असलेले कामगार निर्भीडपणे रंगमंचावर उभे राहण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गो. पु . देशपांडे हे देखील असं म्हणाले की ज्योतीराव फुले यांचे चरित्रनाटय सादर करण्यासाठी श्रमिक वर्ग पुढे झाला हे राजकियीकरण एकविसाव्या शतकातील आधुनिक मराठी प्रेक्षकाला, कदाचित एकंदरीत भारतालाही नवे आहे.
दोन वर्षांपूर्वी जालन्यातल्या जांबसमर्थ या दूरच्या गावातल्या कलावंतांना घेऊन नाटक केल्यानंतर पेठेंनी शहरातला कामगार वर्गच निवडला. त्यांनी नाटकाचा अनुभव नसलेल्यांकडूनही गुणवत्तेची किमान रेषा ओलांडणारं काम करवून घेतलं आहे. गो. पु. देशपांडेंचं हे सुमारे वीस वर्षांपूर्वीचं नाटक आहे. महात्मा फुले यांचं चरित्रनाट्य असं त्याचं ढोबळमानाने वर्णन करता येईल. मात्र त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास नसून फुले चरित्रातला आपल्याला हवा तो भाग निवडून त्याची फेरमांडणी केलेली आहे. भारतीय समाजात फुले यांचं चरित्र पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज निर्माण होते आणि आज तर ती वीस वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक आहे. भारतीय समाज जात, वर्ण यात कायम विभागलेला आहे. अगदी आज एकविसाव्या शतकातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे फुले यांनी केलेला ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यातला फरक, शुद्रातिशुद्राची व्याख्या आणि स्त्रीदास्यांतकाचा केलेला विचार यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे चरित्रनाट्य असूनही त्याचा गाभा विचारप्रधान आहे. यातील पात्रं व्यक्तिरेखा म्हणून नाही, तर विचार म्हणून येतात. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तीचं दिसणं, त्यांची स्वभाववैशिष्ट्य, लकबी यांच्या फंदात कोणी पडत नाही. नाटकाची संवादरचनाही तशीच असून सर्व कलावंत तिला काटेकोरपणा सांभाळतात. संगीताचा भाग श्रवणीय झाला आहे आणि कलावंतही तो मनापासून सादर करतात. वादकांचा वाटाही लक्षणीय आहे. यातल्या दृश्य भागाला उठाव येण्यासाठी प्रदीप वैद्य यांनी केलेली प्रकाशयोजना नाटकाला छायाचित्रात्मक पोत प्राप्त करवून देते आणि फोटो अल्बम बघितल्यासारखे एकामागून एक प्रसंग उलगडत जातात.
महात्मा फुलेंची भूमिका ओंकार गोवर्धन याने प्रभावी केली आहे. विशेष करून वैचारिक भाग त्याने उत्तमरितीने पोहोचवला आहे. पर्ण पेठेनेही सावित्री बाई तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. हे दोन्ही कलावंत गुणी असले तरी त्यांच्या जागी कामगार कलावंतंच असते तर नाटकाचा पोत अधिक रांगडा झाला असता. तरी एक मात्र नक्की की सगळ्यांनी एक थेट भिडणारा प्रांजळ नाट्यानुभव मराठी प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. श्रमिकांना घेऊन नाटक करण्याची कल्पना अतुल पेठे यांची असून, ते नाटक महात्मा फुले यांच्यावरच असावं ही कल्पनाही त्यांचीच असल्यामुळे या योजकतेचं किंवा गो. पु. देशपांडे म्हणतात त्या नवेपणाचं श्रेय पेठेंना द्यायला हवं.

No comments:

Post a Comment