लक्ष्मण गायकवाड लिखित ‘उचल्या’ या कादंबरीने संपूर्ण साहित्यविश्वाला तिची दखल घ्यायला भाग पाडले. भटक्या विमुक्तांच्या जीवनातील सत्य परिस्थितीवर आधारलेली ही कादंबरी १९८७ मध्ये प्रकाशित झाली. या वास्तववादी कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आणि देशभरातील अनेक भाषांमध्ये ती अनुवादित करण्यात आली. समाजाने सतत अवहेरलेला आणि लाजीरवाणे जीवन जगणारी ही जात – हिच्या दुर्लक्षित आयुष्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात ‘ उचल्या’ कादंबरी यशस्वी ठरली. अक्षरा फिल्म्स तर्फे आता ह्या अंधारलेल्या जीवनवाटा रूपेरी पडद्यावर साकार होत आहेत. अमर कक्कड, पुष्पा कक्कड निर्मित, ‘उचल्या’ चित्रपटाचा मुहूर्त विवेक चाबुकस्वार या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकारावर चित्रित करण्यात आला. समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रसंगाला सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. सुप्रसिद्ध सिनेमाटोग्राफर संजय जाधव यांनी छायांकनाचे काम केले आहे. ‘उचल्या’ चे लेखक लक्ष्मण गायकवाड यांचे मार्गदर्शनही चित्रपटाला लाभणार आहे. भटक्या विमुक्त जातींच्या जगण्यातील वास्तव या चित्रपटात रेखाटले आहे.
कायद्याची सर्व दारे बंद झाल्यामुळे पोटासाठी अन्न आणि संरक्षणासाठी चोरी करणारा हा गरजू समाज, तर दुसरीकडे ज्यांची भूक कधी भागतच नाही, ज्यांना संपत्ती कमावण्यासाठी डोंगर पोखरावे लागतात असा कायदेशीर चोरी करणारा पांढरपेशा समाज. लाच आणि भ्रष्टाचाराच्या हातात हात घालून जगणारे प्रतिष्ठितांचे जिणे जगतात आणि पोटासाठी चोरी करणाऱ्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, या लाजिरवाण्या परिस्थितीवर ह्या चित्रपटात ओरखडे ओढले आहेत.
‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाची यशस्वी निर्मिती केलेल्या ‘अक्षरा फिल्म्स डिव्हिजन’ चा ‘आयना का बायना’ हा नृत्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कलाकारांची निवड पूर्ण होताच ‘उचल्या’ च्या चित्रीकरणास सुरुवात होईल.
No comments:
Post a Comment