‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ हा चित्रपट साकार होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. हा चित्रपट हेमलकसा सारख्या अतिदुर्गम भागामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून माडीया गोंड आदिवासींच्या जीवनात आरोग्याचा आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या असामान्य कार्यावर आणि जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समृद्धी पोरे करणार आहेत. हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असून डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य जगभर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत बनवण्याचा मानस अॅड. समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.
या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची मध्यवर्ती भूमिका प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर साकारणार आहेत. मुंबईतील स्वा. सावरकर सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात नुकतीच या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटात नाना पाटेकरांबरोबर डॉ. मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी दिसणार आहे. प्रसिद्ध छायालेखक महेश लिमये यांचे छायाचित्रण असेल तर विक्रम गायकवाड रंगभूषा सांभाळणार आहेत.
आनंदवनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उत्थानासाठी मोलाचे कार्य केले. त्यांची दोन्ही मुले डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांनी त्यांचा हा वारसा पुढे सांभाळला. नाना पाटेकर यांना बाबा आपला तिसरा मुलगा मानत. या सर्वांचे जीवन व कार्य नानांनी अतिशय जवळून अनुभवलं आहे, तसंच त्यांच्या बरोबर कामही केलं आहे. त्यामुळे डॉ. प्रकाशची भूमिका साकारण्यासाठी नाना लगेच तयार झाले. याबाबत बोलताना नाना म्हणाले, “ज्या परिवाराने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी वेचला त्या परिवाराने मला मुलाप्रमाणे प्रेम दिलं हे मी माझं भाग्य समजतो. अॅड. समृद्धी यांनी चित्रपटाची पटकथा ऐकवली आणि डॉ. प्रकाशच्या भूमिकेबद्दल विचारले आणि मी होकार दिला. माझ्या दृष्टीने ही भूमिका आहे किंवा हा चित्रपट आहे असं मी काही मानत नाही. माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे जगणं आहे. त्याचा आनंद मला लुटायचा आहे एवढेच मी बोलू शकेन.” यावेळी नानांनी बाबा आमटेंबरोबरच प्रकाश व विकास बरोबरच्या आठवणी तसेच आनंदवन आणि हेमलकसातील अनुभव सांगितले. तसेच या दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट देण्याचे सर्वांना आवाहनही केले.
“मंदाताईंची भूमिका करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते. लहानपणी एकदा आजोबांबरोबर आनंदवनात गेले असताना आजोबांनी बाबा आमटेंना नमस्कार करायला सांगितले आणि हे देव आहेत असे सांगितले. मोठी झाल्यानंतर मला त्याचा अर्थ कळला आणि आता हे ही कळलं की देवांच्याही पिढ्या असतात, ज्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदा ताईंच्या माध्यमातून आपल्यात वावरत असतात,” अशा शब्दांत मृणाल कुलकर्णीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी नाना आणि मृणालबरोबर डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हा चित्रपट कसा बनणार याबद्दल आम्ही उत्सुक आहोत असे सांगून नाना आणि मृणाल ही भूमिका साकारणार असल्याचा आनंदही व्यक्त केला.
No comments:
Post a Comment