Saturday, July 21, 2012

मराठीच्या वाटेवर हिंदीची सफर ……

375689 394545967272716 1507485875 n मराठीच्या वाटेवर हिंदीची सफर ......



प्रसिद्ध हिंदी अभिनेते जॅकी श्रॉफ हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत आहेत… होsssss
हल्ली मराठी अभिनेते, अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळत असतानाच हिंदी स्टार्समध्ये मराठीत काम करण्याची क्रेझ आली आहे. सतत प्रकाशझोतात राहणे हे प्रत्येक स्टारचं जणू कर्तव्यच असते आणि आपल्या अभिनयामध्ये एकच मूड न येऊ देता विविध आशयाच्या व्यक्तिरेखा साकारण्याकडे सगळ्याच कलाकारांचा कल असतो. अशीच एक वेगळी व्यक्तिरेखा घेउन जॅकी श्रॉफ मराठी चित्रपटसृष्टीला आकर्षित करून घेत आहेत.
नितेश वाघमारे निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘हृदयनाथ’ यामध्ये एका सुसंस्कृत घरामधल्या ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वावर चालणारे ‘तात्या’ ही व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. पेशाने शिक्षक असलेले श्री. सावंत (तात्या) यांचा आदर्श जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यात येणा-या बिकट प्रसंगांवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून पुढे त्यांचे नव्याने सुरु झालेले आयुष्य अशी कथा रेखाटण्यात आली आहे. गावात राहणारे हे तात्या संपूर्ण गावाचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या सतत कार्यक्षम राहण्याच्या वृत्तीमुळे गावात त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा मान आहे. अभ्यासू वृत्तीची त्यांची मुलगी गावात राहूनच तिचं शिक्षण पूर्ण करते. त्यांच्या सहधर्मचारिणी ‘माई’ यांच्या साथीने होत असलेला त्यांचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येईल.
या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे रंगीला गर्ल ‘उर्मिला मातोंडकर’ हिच्यावर चित्रित करण्यात आलेले आयटम साँग. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेनंतर आपल्या अदांनी ही मराठमोळी पोरगी मराठी मुलखाला घायाळ करणार आहे. सुनिधी चौहान, अदनान सामी, शंकर महादेवन या गाजलेल्या सुरांची सुरावट सुद्धा या चित्रपटातून ऐकायला मिळेल. संतोष मुळ्ये यांनी संगीतबद्ध केलेली गीते मिलिंद जोशी यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही अमर गुप्ते यांचे आहे. छायांकनाची जबाबदरी केदार गायकवाड यांनी स्वीकारली आहे.
अतिशय वेगळे कथानक, नवीन चेहरे आणि नवीन गायकी असा हिंदी टीमचा हा मराठमोळा चित्रपट प्रेक्षकांचे मराठमोळे मनोरंजन कसा करतो ही उत्सुकता आहे.

No comments:

Post a Comment