Tuesday, January 26, 2010

'सामना' नंतर तब्बल ३५ वर्षांनंतर 'विहीर' च्या निमित्ताने मराठी चित्रपट बर्लिनमध्ये.

पुसान, मामी, एशियन, केरळ, पीफ, रॉटरडॅम आदी चित्रपट महोत्सवांमध्ये 'विहीर'चा गौरव झाला आहे. आणि आता साठाव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ३५ वर्षापूर्वी 'सामना' चित्रपटाची या महोत्सवासाठी  निवड करण्यात आली होती. 

बर्लिन महोत्सवातील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 'एबी कॉर्प'च्या जया बच्चन, उमेश कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, मदन देवधर, आलोक राजवाडे, शार्वी कुलकर्णी, पर्ण पेठे उपस्थित राहणार आहेत. १४ तारखेला होणार्‍या या 'शो'ला 'रेड कार्पेट'चा मान मिळणार असून १४ ते १७ फेब्रुवारी या सलग चार दिवस हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 

३५ वर्षापूर्वी बर्लिन महोत्सवात सहभागी झालेल्या 'सामना' चित्रपटात आणि आता सहभागी होणार्‍या 'विहीर' चित्रपटात एक साम्य आहे. ते म्हणजे डॉ. मोहन आगाशे. 

Thursday, January 14, 2010

'आघात' च्या निमित्ताने अभिनेते विक्रम गोखले यांच दिग्दर्शनात पदार्पण.

Vikram Gokhale
'आघात' च्या निमित्ताने अभिनेते म्हणून रसिकांना परिचित असलेले विक्रम गोखले 'दिग्दर्शका'च्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहेत. 'स्प्रिंट आर्ट क्रिएशन्स' या बॅनरखाली मोहन दामले, श्रीराम दांडेकर आणि संजय साठे हे 'आघात' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

पटकथा-संवाद समीर विद्वांस यांचे आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका असून कादंबरी कदम, अनिकेत विश्वासराव, सुहास जोशी, अनंत जोग, अरुण नलावडे, सुरेखा कुडची, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, मनोज जोशी, दीपा श्रीराम आदींच्या भूमिका आहेत.

Friday, January 8, 2010

संगीतकार अजय-अतुल प्रथमच पुणेकरांच्या भेटीला.

मूळचे पुणेकर असलेले अजय-अतुल हे संगीतकार प्रथमच पुणेकरांसमोर आपली गाजलेली गाणी सादर करणार आहेत. ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एसएसपीएमएसच्या मैदानावर 'अजय-अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, योगिता गोडबोले आणि अमृता नातू यामध्ये सहभागी होणार आहेत. 

अजय-अतुल आपल्या ११० वादकांच्या ताफ्यासह पुण्यात प्रथमच संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. परांजपे स्किम्सचे शशांक परांजपे आणि आयफेल रिऍल्टर्सचे राहुल नहार हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. 

पुण्यातच कारकिर्दीला सुरुवात झाल्याने पुणेकरांसाठी कार्यक्रम करण्याची इच्छा या कार्यक्रमातून पूर्ण होत असल्याचे अजय-अतुल यांनी सांगितले.

Thursday, January 7, 2010

'इरादा पक्का' च्या प्रमोशनसाठी २० कलाकार श्री व सौंची उपस्थिती.

नवरा बायकोच्या रिलेशनशिपमधली कॉमेडी समोर ठेऊन केदारचा नवा सिनेमा येतोय. सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. चित्रपटातील गाणी सुद्धा तितकीच प्रसिद्ध व्हावी यासाठी मराठी चित्रपटसृष्टी तेवढीच जागृक झाली आहे. याच उदाहरण म्हणजेच 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...' मधला पोवाडा.... त्याचं बजेट...... असाच आणखी आगळा वेगळा प्रयोग केदार शिंदे करत आहे. 

मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आगळ वेगळ प्रमोशन होणार आहे. त्यासाठी मराठीतले जुने-नवे असे तब्बल २० कलाकार या प्रमोशनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात आत्माराम भेंडे, किशोर प्रधान, रामदास पाध्ये, अलका कुबल, भरत जाधव, संदिप कुलकर्णी, अशोक शिंदे, अंकुश चौधरी, सुमित राघवन, प्रसाद ओक, विजय पाटकर आणि श्रेयस तळपदे यांच्यासह अनेक कलाकारांचा सहभाग असेल.

Monday, January 4, 2010

१२ जानेवारीपासून पुण्यात 'अंतर्नाद'.

दिल्ली, लखनौ, मुंबई, बंगळूर यांसह विविध शहरांतील तब्बल २०००हून अधिक गायकांचा समावेश असलेला, 'अंतर्नाद' हा भव्य महोत्सव 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन' तर्फे १२ जानेवारीला पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची गायिका चित्रा रॉय, प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, संगीतकार- गायक शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ही मैफल रंगणार आहे. 

पं. श्री रविशंकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. मैफलीसाठी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील राग श्री, पूरिया धनाश्री, देस, बसंत बहार या रागांची निवड केली असून मैफिलीची रंगीत तालीम सध्या सुरू असून, एक ते तीन जानेवारीदरम्यान दुसरी सराव फेरी होणार आहे.

Saturday, January 2, 2010

'सारेगमप'ची लिटील चॅम्प कार्तिकी आता पार्श्वगायन करणार.

Kartiki Gaikwad
'झी मराठी' वरील 'सारेगमप....लिटील चॅम्पसच्या अंतिम फेरीत कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे हे लिटील चॅम्पस पोहचले होते. त्यामध्ये आपल्या वेगळ्या गायन शैलीने परिक्षकांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला वेड  लावून लिटील चॅम्पचा किताब पटकावणारी, आळंदीची कार्तिकी गायकवाड आता मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणार आहे. 

'यमाच्या गावाला जाऊया या सामाजिक संदेश देणार्‍या विनोदी चित्रपटातील 'घोर मनाला लाऊ नका...तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा.....जहर खाऊ नका' असे हे गाणे शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये याकरीता निर्माते ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहीले असून सुप्रसिद्ध संगीतकार मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केले आहे.