मातीत जन्मतो, मातीत खेळतो, मातीतच रमतो मी,
धरणीमायेच्या अंगावर कष्टाळू घडतो मी…….
असे ब्रीद वाक्य असलेला आपला सर्वांचा अन्नदाता म्हणजेच भलरी दादा, आयुष्यभर धरणीमातेची सेवा करत असतो. त्याच्या पोटात जरी भूकेने कल्लोळ माजवला तरी आपल्या सगळ्यांची पोट भरण्यासाठी तो मात्र न थांबता त्याचं काम करत असतो. आज काळ बदलला, समाज बदलला, विकासाच्या नावाखाली माणूस देखील बदलला पण माणसाची भूक आणि ती भागवणारा शेतकरी मात्र बदलला नाही.
‘सुजलाम सुफलाम’ अशा भारताचा ‘शेती’ हा प्राथमिक व्यवसाय. ‘शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.’ शाळेत असताना हे वाक्य सगळ्यांनीच घोटलेले आहे. पण आज हाच कणा ताठ न राहता तो वाकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, अपुरा पाणी पुरवठा, कर्जाचे डोंगर या सगळ्या दुष्टचक्रात आजचा शेतकरी अगदी गुदमरून गेला आहे. कोट्यावधी जीवांना खाऊ घालणारा हा शेतकरी स्वत: मात्र गळफास घेऊन आयुष्य संपवतो आहे यापेक्षा आणखी भयंकर चित्र ते काय असू शकणार? याच भयानक वास्तवाचा केवळ वेध न घेता त्याला सावरण्याचा मार्ग दाखवणारा ‘जागरण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश देणारा हा चित्रपट आहे. निर्माते अरविंद तावरे यांच्या ‘मुक्ती व्हिज्युअल्स’ या बॅनरद्वारे हा चित्रपट येत असून समीर रावसाहेब हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ.शरद भुताडिया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा आणि संवाद शिव कदम यांनी लिहिली असून आदी रामचंद्र यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘जागरण’ ही कथा कृषिपदवी धारण केलेल्या यशवंत या तरुणाची आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावाचा विकास करून ते समृद्ध करण्याचे स्वप्न मनात बाळगून हा यशवंत गावाला येतो आणि त्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु करतो. समविचारी विचारांच्या तरुणाच्या साथीने चाललेल्या त्याच्या प्रवासात अनेक छुप्या विरोधाचा सामना त्याला करावा लागतो. पण यशवंतराव चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर असणारा, अभ्यासातून तसेच चिंतनातून ख-या अर्थाने ज्याचे आयुष्य समृद्ध झाले आहे असा हा ‘यशवंत’ सर्व विरोधांना झुगारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागतो. सकारात्मक विचारांचा आधार घेऊन प्रस्थापित मार्गांना ओलांडून प्रत्यक्ष कृती करण्याकडे यशवंतचा कल असतो. या कार्यात त्याला समाजापासून दूर असणाऱ्या पण तात्त्विक विचारांनी प्रगल्भ असणा-या कमलाकरची साथ मिळते. आणि या सर्वांच्या आधारे यशवंतचे ‘जागरण’ सुरु होते. जागरण समाजहिताचं, जागरण आत्मसन्मानाचं, जागरण अन्नदात्याला न्याय मिळवून देणा-या प्रश्नाचं… यशवंतचा हा लढा आणि त्यातून होणारी वैचारिक त्याचबरोबर सामाजिक वाटचाल ही आजच्या तरुणांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे. आणि त्यामुळेच हे जागरण समाजासाठीचा लढा ठरणार आहे.
‘मुक्ती व्हिजुअल्स’ हि फक्त एक व्यावसायिक कंपनी नसून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. सामाजिक विषयांचे भान असणारे चित्रपटाचे निर्माते अरविंद तावरे हेदेखील मागील अनेक वर्षे शेतक-यांच्या प्रश्नांसाठी मनापासून काम करत आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांना विकासाची एक नवीन वाट त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांची ही कृती इतरांनाही प्रेरणा देणारी ठरावी आणि शेतक-यांच्या प्रश्नांची भीषणता समाजासमोर मांडली जावी हाच ‘जागरण’चा हेतू आहे. मनोरंजनाची चौकट ओलांडून सामाजिक स्तरावर करण्यात येणारं हे ‘जागरण’ म्हणजे केवळ चित्रपट नसून एक ‘सामाजिक प्रकल्प’च आहे. आणि या कार्यामध्ये सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ आपापल्या परीने योगदान देणार आहेत.
‘जागरण’ चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटाचा मुहूर्त सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते चित्रपटातील गीतांच्या डिजीटल लाँचने करण्यात आला. मराठीमध्ये सर्वात प्रथमच हा प्रयत्न केला गेला असून ‘धिंगाणा.कॉम’ या संकेत स्थळाच्या सहाय्याने हे म्युझिक लाँच करण्यात आले. शिव कदम आणि प्रसन्ना देशमुख यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण गीते लिहिली असून आदि रामचंद्र यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. सुप्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर आणि वैशाली सामंत यांनी ही गाणी गायली आहेत.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणा-या ‘जागरण’ चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment