चित्रपटसृष्टीच्या शतक महोत्सवी वर्षात मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला सातासमुद्रापार मानाने मिरवत नेणारा ‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ यंदा सिंगापूर मध्ये रंगणार आहे. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा हा लखलखता सोहळा, दिनांक – ४ ऑक्टो. ते ७ ऑक्टो. असा चार दिवस रंगणार आहे. यावर्षीचे ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या सहयोगाने पुरस्काराच्या तिसऱ्या वर्षाची सफर परदेशी निघणार आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मिफ्टाचे आयोजक महेश मांजरेकर आणि केसरी टूर्स अॅन्ड ट्रव्हल्सच्या वीणा पाटील यांनी ही माहिती दिली. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि सोहळ्यास हातभार लावणारे प्रायोजक या परिषदेत आवर्जून उपस्थित होते.
ज्या सोहळ्याने केवळ कार्यक्रमाचे स्वरूप न बदलता मराठी नाटक आणि चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लामरबरोबरच दर्जाही मिळवून दिला असा हा – Mifta ( Marathi International Film and Theatre Awards ). दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञाबरोबरच सामान्य प्रेक्षकही या सोहळ्याच्या प्रतीक्षेत असतो. मिफ्टाच्या मुख्य सोहळ्याबरोबरच मिफ्टाचे पूर्वरंग मांडणारा सोहळा आणि नाट्य चित्रपट महोत्सव सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करून घेतो. यावर्षी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार आहे. २ सप्टें . ते ९ सप्टें. दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवामध्ये दहा नाटके आणि दहा चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना अतिशय माफक दरात घेता येईल. चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या जोडीला खाद्य महोत्सवाची एक वेगळीच चव यावर्षी अनुभवता येईल. मिफ्टा पुरस्काराची नामांकने महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ सप्टें. ला जाहीर करण्यात येतील, अशी माहिती महेश मांजरेकर यांनी दिली.
‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ बद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, ” दोन वर्षे मिफ्टाचे आयोजन आम्ही यशस्वीपणे केलंय. यासाठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेकांची आम्हाला मनापासून साथ लाभली. याही वर्षाचा सोहळा असाच रंगतदार होईल, तसेच मागील दोन वर्षापेक्षा अधिक सरस असेल अशी ग्वाही मी देतो.” सिंगापूरमध्ये ‘काकस्पर्श ‘ या चित्रपटाला तेथील रसिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाच्या आधारावर म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२ सुद्धा तिथे चांगलाच गाजेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
या वर्षीपासून मिफ्टा परिवाराच्या शुभ यात्रेची जबाबदारी केसरी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सने घेतली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल पार्टनर म्हणून प्रवास, वास्तव्य आणि ट्रान्स्फरची व्यवस्था आम्ही आपल्यासाठी करणार असून, मिफ्टा परिवारासोबत जोडले गेल्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे, अशी भावना केसरी टूर्सच्या वीणा पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ साठी नामांकने भरण्याचे अर्ज www.miftaawards.com या संकेत स्थळावर १६ जुलैपासून उपलब्ध होणार आहेत.
No comments:
Post a Comment