वेगवेगळ्या विषयावरील मराठी चित्रपटांनी सध्या मराठी चित्रपटश्रष्टी बहरत चालली असताना त्यामानाने मराठीत रहस्यमय, तसेच भीतीदायक चित्रपटाची संख्या नगण्य होती. भूता-प्रेताचे विषय तर तसे वर्ज्यच होते. परंतु ”ऐक” या नवीन मराठी चित्रपटाने त्याला अपवाद केला आहे. भूता-प्रेताच्या विषयाला ‘हांक’ देत ‘डरना जरुरी है’ असे सांगत एक थरारक भयपट पाहिल्याचे समाधान ”ऐक” ने दिले आहे. विशेष म्हणजे लेखक-दिग्दर्शक (जनमेजय पाटील आणि प्रतिक कदम) व मुख्य नायकासह सर्वचजण नवीन असताना थरारक भयपट करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न चांगला यशस्वी ठरला आहे.
तसे पाहता चित्रपटाच्या नावावरून फारसा अर्थबोध न होणाऱ्या ”ऐक” ची कथा म्हणजे एका ‘थरारपटाचा जीवघेणा खेळ’ आहे. ऋषी मराठे ( स्वप्नील जाधव) हा एका टी. व्ही. चैनेल मध्ये काम करणारा एक कार्यक्रमप्रमुख प्रेक्षकांनी आपल्या चैनेल कडे आकर्षित व्हावे म्हणून ‘ रिअलिटी हॉरर शो ‘ ची निर्मिती करतो. मात्र या ‘लाईव्ह शो’ मध्ये निवड झालेले पहिले जोडपे ऐनवेळी ‘शो’ मध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे ‘शो’ रद्द होण्याची नामुष्की येऊ नये म्हणून स्वत: ऋषी मराठे आपल्या पत्नीलाच- आदितीला- ( आदिती सारंगधर) या ‘शो’ मध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. वास्तविक आदिती व ऋषी यांच्यामध्ये आधीच वितुष्ट निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत आलेले असते. तरीही या ‘शो’ साठी आदिती कशीबशी तयार होते. त्यांना विवान नावाचा छोटा मुलगाही असतो. ज्या बंगल्यात हा ‘हॉरर शो’ होणार असतो त्या बंगल्यात आदिती व ऋषी जातात मात्र तेथे ‘हॉरर शो’ मध्ये ठरल्याप्रमाणे गोष्टी न घडता अनेक चित्र-विचित्र घटना घडतात कारण त्या बंगल्यात एका छोट्या मुलीचे ‘भूत’ असते. हे ‘भूत’ ऋषीच्या जीवावरच उठते. ‘ती’ मुलगी कोण असते व तिचे ‘भूत’ ऋषीच्या जीवावर का उठते ? व ऋषीचे शेवटी काय होते? हे पडद्यावर ”ऐक” णेच योग्य ठरेल.
चित्रपटाचा पहिला भाग आदिती व ऋषी यांच्यातील भांडणे ”ऐक” ण्यातच जातो. ( या भांडणाची ‘कारणे’ अधिक पटण्याजोगी हवी होती ). प्रारंभी भुताची पुसटशी चाहूल दाखविण्यात आली आहे. मध्यंतरानंतर मात्र सुनसान बंगल्यातील थरारपटाचे चांगले दर्शन घडविण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅमेरा व कलाकारांचा अभिनय यांचा महत्वाचा वाटा आहे. मुख्य म्हणजे चित्रपटातील मुलीच्या भुताची कथा संयुक्तिक वाटते. मोठ्या पडद्यावरील पदार्पणात स्वप्नील जाधव याने नायकाच्या भूमिकेत चांगली रंगत आणली आहे. आदिती सारंगधर तसेच प्रसाद ओंक व चिन्मय मांडलेकर यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. राजेश सावंत यांनी संगीतबद्ध केलेली दोन्हीही गाणी श्रवणीय आहेत. थोडक्यात बऱ्याच दिवसांनी एक थरारक भयपट पाहिल्याचे समाधान ”ऐक” ने दिले आहे.
No comments:
Post a Comment