Sunday, July 29, 2012

‘आम्ही चमकते तारे’

616596 390250444367347 399158093 o  आम्ही चमकते तारे

आज एकविसाव्या शतकात बहुतेक सर्व रोगांवरील औषधं उपलब्ध आहेत. रुग्णाचे मानसिक धैर्य आणि उचित औषधांच्या ट्रीटमेंटमुळे प्रत्येक माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो आहे. पण कॅन्सर आणि एचआयव्ही सारखे रोग झालेल्या रुग्णांना मात्र त्यांच्या आजारापेक्षा समाजाकडून होणारा त्रास जास्त सहन करावा लागतो. याच आशयावर आधारलेला ‘श्री साईनाथ’ निर्मित ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
चित्रपटातील एका जोडप्याला मूल होत नसल्यामुळे ते एका अनाथ मुलाला म्हणजे सचिनला दत्तक घेतात. पण ह्या दत्तक घेतलेल्या निष्पाप जीवाला पुढे दुर्दैवाने एचआयव्हीची बाधा झाल्याचे लक्षात येते. एचआयव्ही म्हणजे एड्स नव्हे आणि यावर व्यवस्थित उपचार केले तर रुग्ण पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो असा दिलासा डॉक्टर या जोडप्याला देतात. ह्या आजाराचा संसर्ग खोकला, शिंकणे, एकत्र खेळणे, एकत्र राहणे या कारणांमुळे होत नसल्यामुळे सचिनला नियमित शाळेत जाण्याला कोणताही अडथळा येत नाही.
एक दिवस शाळेत होणा-या आरोग्य तपासणी मध्ये सचिनचा हा रोग सर्वांना समजतो. शाळेच्या प्रिन्सिपल सचिनच्या पालकांना आधार देतात आणि त्याचबरोबर त्याला नियमित शाळेत पाठवण्याचा सल्ला देतात. पण शाळेतील इतर मुलांकडून मात्र सचिनला त्रास होऊ लागतो. बाकी मुलांचे पालक सचिनला शाळेतून काढून टाकण्यासाठी प्रिन्सिपलवर दबाव आणतात आणि सचिन ला शाळेतून काढण्यात येते.
या सर्व परिस्थितीत सचिन मात्र पूर्णपणे गोंधळून जातो. “आपल्याला कोणता रोग झाला आहे? आपल्याला शाळेतून का काढण्यात आले? सगळेजण माझ्याशी इतकं वाईट का वागतात? मला खरच दत्तक घेतलं आहे की या आजारामुळे आपले पालक तसं सांगत आहेत?” अशा अनेक प्रश्नांनी सचिन अगदी त्रस्त होतो…
अभ्यासातल्या हुशारीबरोबरच सुरेल गळ्याची दैवी देणगी लाभलेला हा सचिन पुढे या सर्व परिस्थितीवर कशी मात करतो आणि त्याचे आयुष्य कशा प्रकारे सुदृढ बनवतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
दीपक एस. चौधरी आणि प्रकाश आ. जाधव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची संवेदनशील कथा अनंत सुतार यांची तर पटकथा दीपक एस. चौधरी आणि प्रकाश आ. जाधव यांचीच आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन प्रकाश आ. जाधव करत असून संवाद अनंत सुतार, अशोक मानकर आणि महेंद्र पाटील यांचे आहेत. सागर पवार, रवींद्र आवटी यांनी लिहिलेल्या गीतांना श्रीरंग आरस यांनी संगीत दिले आहे. साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, संजीवनी भेलांडे, अवधूत गुप्ते, स्वनिल बांदोडकर, बेला शेंडे, सजनी आरस या संगीतातील चमकत्या ता-यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. नरेंद्र पंडीत, फुलवा खामकर, डॉमनिक, राजेश बिडवे, बिपीन शेट्ये यांचे नृत्य दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
समाजातील माणुसकीची व्यापकता वाढावी आणि अशा रोगांनी ग्रासलेल्या रोग्यांना मानसिक बळ मिळून त्यांचेही आयुष्य सुदृढ व्हावे यासाठी हा चित्रपट नक्कीच सहकार्य करेल अशी अशा आहे.

No comments:

Post a Comment