Friday, July 27, 2012

‘सत्य, सावित्री, सत्यवान’ आजच्या सावित्री – सत्यवानाची कथा

शामल परब आणि सर्वेश परब दिग्दर्शित ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ हा चित्रपट आज २७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. गेली १४ वर्षे संकलनाच्या क्षेत्रात कामाचा मोठा अनुभव असणारे सर्वेश परब या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाउल ठेवत आहेत. चित्रपटाचे कथानक हे राजकारणाच्या गोतावळ्यात गुंतलेलं असणार आहे. या आधी प्रदर्शित झालेल्या राजकारणावरील चित्रपटाहून वेगळा विषय असणारा हा सिनेमा असल्याचं सर्वेश परब यांनी सांगितलं.
चित्रपटात घडलेल्या तीन खूनांवर होत असलेल्या राजकारणाच्या भोवती चित्रपट फिरतो. एका जिल्हा परिषद अध्यक्षाची हत्या होते आणि त्या हत्येचा तपास करण्याकरता एक सीआयडी इन्स्पेक्टर गावात दाखल होतो असं हे कथानक आहे. एकूणच चित्रपट खुना संदर्भात असल्याने आपण या चित्रपटाला ‘पोलिटिकल मर्डर मिस्ट्री’ म्हणू शकतो असं सर्वेश परब यांनी सांगितलं.
सध्याच्या या फास्ट रनिंग जगामध्ये राजकीय वर्तुळातल्या घटना तर अत्यंत वेगात घडत असतात. एकमेकांचे पाय खाली खेचण्यासाठी त्यांच्यामध्ये लागलेली चढाओढ, सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर केल्या जाणा-या कुरघोडी यांचे चित्रण सिनेमात केले आहे. या सत्ताकारणात लपलेली राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य कशी असतात हेही या चित्रपटात पाहता येईल. राजकीय शक्तीचा एक वेगळा विचार या चित्रपटातून मांडण्यात आल्याचंही सर्वेश परब यांनी सांगितलं.
सत्यवान सावित्रीची कथा आत्तापर्यंतची पिढी लहानपणापासून ऐकत आली आहे. पण आताच्या नवीन पिढीला ती तेवढी माहिती नाही. आजच्या आधुनिक जगातील सावित्रींना त्यावेळच्या सावित्रीची मेहनत, तिची निष्ठा माहिती नाही आणि कदाचित ती त्यांना कळणार ही नाही, कारण आजच्या सावित्रीच्या संकल्पना फार बदलल्या आहेत. त्यामुळे एका बदललेल्या ढंगातच आजच्या सत्यवान सावित्रीची कथा चित्रपटात रेखाटली आहे. चित्रपटाचे नाव ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ असं ठेवण्यात हेच गुपित असल्याचं सर्वेश परब म्हणाले.
दिग्दर्शक सर्वेश परब १३-१४ वर्ष संकलन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी दिग्दर्शनासाठी आजपर्यंत कोणालाही असिस्ट केलेलं नाही. त्यामुळे एडिटिंगचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. गेली १४ वर्षे एडिटिंग मध्ये शिकलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी ब-याच नवीन गोष्टी या सिनेमासाठी ट्राय आउट केल्या आहेत.
लहानपणापासून रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करणा-या सर्वेश परब यांनी आतापर्यंत अनेक एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे. पण मुळात कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान त्यांना एडिटिंग मुळे कळल्यामुळे त्याचा फायदा त्यांना दिग्दर्शन करताना झाला. ” मी माझ्या परीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे” असं त्यांनी सांगितलं.
चित्रपटात सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका करणारे सचित पाटील यांची भूमिका अतिशय वेगळी असून तिला अनेक कंगोरे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पत्नीचा रोल अमृता पत्की करत आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या अंगरक्षकाच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती मराठे असणार आहे. चित्रपटातील इतरही सर्व भूमिका अतिशय महत्वाच्या असून त्या चित्रपटाचा अविभाज्य भागच आहेत. सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहे.
आपल्या आजूबाजूला घडणा-या ब-याच गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे ‘सत्य, सावित्री, सत्यवान ‘ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टी ज्या समजातच घडतात पण समाजापर्यंत पोहोचत नाहीत त्या गोष्टी या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment