व्ही. शांताराम फाऊंडेशन, प्रभात चित्र मंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशन अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष, तसेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण व्ही. शांताराम यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रभात चित्रमंडळाच्या वतीने त्यांचा कर्तृत्व गौरव सोहळा अयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते मुंबईत किरण शांताराम यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास किरण शांताराम यांच्या पत्नी ज्योती शांताराम, प्रभात चित्रमंडळाचे सुधीर नांदगावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर, गोविंद निहलानी, अशोक सराफ, सुलोचना दिदी, सतीश शहा आदि मान्यवर उपस्थित होते. या हृद्य सोहळ्याचं सूत्र संचालन प्रभात चित्रमंडळाचे सरचिटणीस संतोष पाठारे यांनी केले.
निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अनन्यसाधारण कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा किरणजींनीही पुढे जपला आणि वाढवलाही. याप्रसंगी सचिन पिळगांवकर यांनी किरणजींची निर्मिती असलेल्या ‘अशीही बनवाबनवी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितल्या. श्याम बेनेगल यांनी किरण शांताराम आणि प्रभात चित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा उंचावत असून त्यासाठी प्रभात चित्र मंडळाचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.जब्बार पटेल यांनीही राजकमल स्टुडिओ, शांताराम अण्णांबरोबर काम करताना आलेले अनुभव, मंगेश देसाई आणि किरण शांताराम यांची त्यांना मिळालेली सोबत अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना किरण शांताराम यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी जीवनात आलेले चढ उतार आणि आपल्या वडिलांच्या आठवणीही सांगितल्या. तसेच चित्रपट सृष्टीची सेवा करण्यासाठी शांताराम घराण्याची पुढची पिढीही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली. संतोष पाठारे यांनी आभार प्रदर्शन केले.
राजकमल स्टुडिओ, प्लाझा चित्रपटगृह, व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स, प्रभात चित्रमंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून किरण शांताराम चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
No comments:
Post a Comment