संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत आणि बहुतांशी लोकांच्या कुलांचा कैवारी असलेला, पिवळा भंडारा उधळत सोनेरी रंगात रंगून जाणारा मल्हारी म्हणजेच ‘श्री ज्योतिबा’. डोंगराच्या माथ्यावर निवास करणा-या या ज्योतिबाच्या दर्शनासाठी भक्तजनांची सदैव रीघ लागलेली असते. ‘चांगभलं’ चा गजर करीत आणि भंडारा उधळीत भाविक भक्तीरंगात न्हाउन जातात आणि संपूर्ण वातावरण प्रसन्न, निर्मळ होऊन जाते. प्रकाश भालेकर दिग्दर्शित ‘ज्योतिबाच्या नावान चांगभलं’ या आगामी चित्रपटात याच ज्योतिबाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा महिमा वर्णन केला आहे.
‘वैजयंता प्रोडक्शन’ च्या सविता सुरेश डाळे,शीला प्रशांत सावंत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच गीतध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. विजय देसाई यांनी संगीत दिलेली दोन गाणी वैशाली भैसने- माडे आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात यावेळी ध्वनी मुद्रित करण्यात आली. ‘डोंगर माथ्यावरी गडावर ज्योतिबा नांदतो’ असे बोल असणारे जोशपूर्ण गीत आनंद शिंदे यांनी तर ‘गेला जन्म हा वाया, तुझ्या पडण्यात पाया’ हे भावपूर्ण भक्तीगीत वैशाली भैसने- माडे यांनी गायले आहे. आयटम साँग आणि प्रेमगीत देखील चित्रपटात समाविष्ट आहेत.
दिग्दर्शक प्रकाश भालेकर यांनीच चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे. ज्योतिबा देवस्थानाचे महात्म्य सांगणारी हि कथा आहे. यातील सर्व गाणी सावता गवळी यांनी लिहिली असून विजय देसाई यांनी ती संगीतबद्ध केलेली आहेत. चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे करत असून रंगभूषा नितीन दांडेकर यांची असणार आहे.
अशोक शिंदे,सतीश तारे,सुरेखा कुडची,सुरेश डाळे, राजू कदम, अॅड. प्रशांत सावंत या कलाकारांसोबत मंगेश कदम आणि गणेश कदम हे दोन नवोदित कलाकार चित्रपटात प्रवेश करत आहेत.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
No comments:
Post a Comment