जे ठरवून किंवा सांगून घडत नाही, त्याला योगायोग म्हणतात. विनिता क्रिएशन्सची निर्मिती तसेच मिलिंद देविदास पाटील यांच्या एच. डी. मुव्हीजची प्रस्तुती असलेल्या ‘योगायोग’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल नुकतेच पूर्ण करण्यात आले.
‘योगायोग’ मध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री सिया पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच दीपक शिर्के, विजू खोटे, विकास समुद्रे, अंजली उजवणे, ज्योत्स्ना आदी कलाकारांच्या ‘योगायोग’मध्ये मुख्य भूमिका आहेत.
भरतराज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात रसिकांना मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज मिळणार आहे. प्रशांत शिंदे या चित्रपटाचे दुसरे दिग्दर्शक आहेत. बी. राज या चित्रपटाचे लेखक आहेत तर साईदास यांची पटकथा आहे. सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. जाफर सागर यांच्या गीतरचना असून चिनार-महेश ही मराठीतील आघाडीची संगीतकार द्वयी स्वरसाज चढवणार आहे. कमलेश मौर्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत तर शेखर नागवेकर प्रॉडक्शन डिझायनर आहेत. सुंदर शेट्टी संकलनाची बाजू सांभाळणार आहेत तर क्रिएटिव्ह हेड साजना सरगम आहेत. ‘योगायोग’च्या निमित्ताने दक्षिणेकडील सुप्रसिद्ध कॅमेरामन रामजी यांच्या कॅमेऱ्यातून महाबळेश्वर मधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी मराठी रसिकांना मिळणार आहे.
सात दिवसांच्या पहिल्या शेड्युलमध्ये या चित्रपटाचे आऊटडोअर तसेच काही इनडोअर चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या एका तरुणीची ही कथा आहे. कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स, इमोशन आणि गीत-संगीताचा बहारदार नजराणा ‘योगायोग’च्या निमित्ताने रसिकांसमोर सादर करण्याचा भरतराज यांचा मानस आहे.
लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसऱ्या शेड्युलची सुरुवात होणार असून या चित्रपटाद्वारे एक नवे व्यावसायिक गणित मांडताना रसिकांसमोर उत्तम कलाकृती सादर करण्याचा निर्माते-दिग्दर्शकांचा मानस आहे. प्रत्येकाने योगायोगाची जादू आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवली असेलच. आता ही जादू या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरही अनुभवायला मिळणार आहे. आजच्या युगात आपले दुःख विसरायला लावून रसिकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सिनेमांची आवश्यकता आहे. ‘योगायोग’ या व्याखेत अगदी फिट बसत असल्याने इतरांपेक्षा वेगळा मसाला यात पाहायला मिळेल.
No comments:
Post a Comment