Wednesday, July 18, 2012

कोंबडीनंतर बांग देतोय भरतचा कोंबडा: ‘शिखर’ चित्रपटाचा मुहूर्त

2 X 30 कोंबडीनंतर बांग देतोय भरतचा कोंबडा: शिखर चित्रपटाचा मुहूर्त



‘हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दिलखेच अदा, धम्माल रिदम आणि नवीन शब्दरचना यांच्या जोरावर गाजतं ते म्हणजे ‘आयटम साँग’. तरुणांच्या ओठावर अगदी सहज रुळणारं आणि त्यांच्या पायांना ठेका धरायला लावणारं हे आयटम साँग हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांनाही आकर्षित करून घेतंय. ‘कोंबडी पळाली’ या सुपरडुपर हिट झालेल्या गीतानंतर अभिनेता भरत जाधव ‘ शिखर’ या आगामी चित्रपटामध्ये अशाच एका धम्माल गीतावर थिरकले आहेत. ‘श्री रेणुका चित्र कंबाईन्स’ प्रस्तुत व्ही.अमिता निर्मित, दिग्दर्शित ‘शिखर’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच या गीताच्या चित्रीकरणाने करण्यात आला. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता भरत जाधव यांसह किरण शरद, प्रकाश भागवत, मोसमी तोंडवळकर हे कलाकारही यावेळी उपस्थित होते.
वैशाली सामंत यांनी ‘बांग देतोय कोंबडा ‘ असे बोल असणारे हे गीत गायले आहे. अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री किरण शरद या जोडीवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘कोंबडी’ नंतर भरत जाधव यांचा हा ‘कोंबडा’ सुद्धा प्रेक्षकांना आवडेल असा आहे.
‘चक दे’ फेम विद्या माळवदे हिची या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री होतेय. मनोज जोशी, पुष्कर जोग, अश्विनी एकबोटे, प्रमोद पवार, सुनील तावडे, शुभांगी लाटकर, प्रकाश भागवत, मोसमी तोंडवळकर यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे
व्ही. जगदीश यांची कथा असलेला हा चित्रपट ‘ ईश्वर हेच अंतिम सत्य’ या आशयावर आधारीत आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद व्ही.अमिता यांनी लिहिले असून गीतलेखनही त्यांनीच केले आहे. संगीतकार व्ही. जगदीश शास्त्री आणि संजयराज गौरीनंदन यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांनी केले असून ईश्वर बिद्री यांनी छायांकन केले आहे.राजू सापटे यांनी कलादिग्दर्शन केले आहे.
व्ही. अमिता यांचा पहिला चित्रपट ‘वासू’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘शिखर’ च्या या दुसऱ्या निर्मितीनंतर आगामी काळात मराठीत वैविध्यपूर्ण चित्रपट बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

No comments:

Post a Comment