Showing posts with label Theater. Show all posts
Showing posts with label Theater. Show all posts

Friday, August 31, 2012

‘वैशाली कॉटेज’ : वास्तविक अस्तित्वाची रहस्यपूर्ण खेळी

vaishali cottage वैशाली कॉटेज : वास्तविक अस्तित्वाची रहस्यपूर्ण खेळी



1972 साली अमेरिकेत ब्रॉडवेवर आलेलं ‘व्हेरोनिकाज रूम’ हे इरा लेविन या नाटककाराचं नाटक अत्यंत लोकप्रिय झालं होतं. याच नाटकाचं मराठी रूपांतरण रंगभूमीवर साकारत आहे. ‘नाट्यमंदार’ प्रस्तुत, रहस्यमय कथानक असलेल्या या नाटकाचे मराठी रूपांतरण सुरेश जयराम यांनी उत्कृष्टरित्या केले आहे.
‘वैशाली कॉटेज’ या नाटकातील नायिका आणि नायक या दोघांच्याही आयुष्यात आलेल्या एका थरारक आणि अकस्मात वळणावर आधारित हे नाटक आहे. एका मॉलमध्ये फिरत असताना एका प्रौढ जोडप्याला ही नायिका म्हणजे ते ज्या बंगल्याचे केअर टेकर आहेत त्या घरातल्या वैशालीसारखी दिसते आहे असे वाटते. त्यामुळे थोड्यावेळासाठी त्यांच्या बंगल्यावर येऊन जाण्याची विनंती ते शिवानीला (नायिकेला) करतात. बंगल्यावर गेल्यावर वैशाली ही पूर्वीच मेलेली आहे पण तिची बहीण माधवी मात्र तिच्या अस्तित्वात अजूनही गुंतलेली असून वैशाली जिवंतच आहे या भ्रमात आयुष्य जगत असल्याचं शिवानीला सांगितलं जातं. अंथरुणाला खिळलेल्या माधवीसाठी शिवानीने वैशाली बनावं अशी विनंतीपूर्ण मागणी हे जोडपे शिवानीकडे करते. शिवानीचा मित्र समीरचा विरोध असतानाही थ्रील म्हणून आणि माधवीची दया येऊन शिवानी या खेळाला सुरुवात करते. असा हा नियतीच्या विरुद्ध चाललेला अस्तित्वाचा खेळ शेवटी एका खुनाच्या घटनेने रक्तबंबाळ होतो.
अमिता खोपकर, तेजस्विनी पंडित, शिरीष घाग आणि संकर्षण क-हाडे यांच्या सरस भूमिकांचा मेळ या नाटकात प्रेक्षकांना पाहता येतो. रहस्यमय कथानकाची यशस्वी पकड साधण्यात दिग्दर्शकाचा मोठा वाट असतो आणि मंगेश कदम यांनी ही जबाबदारी नेटाने पार पाडल्याचं लक्षात येतं. प्रदीप पाटील यांचे उठावदार नेपथ्य, राहुल रानडे याचं सुयोग्य पार्श्वसंगीत आणि शीतल तळपदे यांची थरारक प्रकाश योजना अशी सर्वांगसुंदर कलाकृती म्हणून या नाटकाकडे पाहता येईल.
अनपेक्षित प्रसंग, कुठेच नसलेली अतिशयोक्ती, सर्वच पात्रांचे अनोखे रंग या सर्वातून हे रहस्य अधिक गडद होत जातं आणि प्रेक्षकांना त्यांचं अस्तित्व विसरायला लावतं.

Monday, August 27, 2012

‘टॉम आणि जेरी’ : नात्यांमधली पकडापकडी

अश्वमी व अद्वैत थिएटर्स निर्मित ‘टॉम आणि जेरी’ हे एका वेगळ्याच वळणाचं नाटक रंगभूमीवर साकारत आहे. आजच्या घड्याळाच्या सेकंदावर धावणारी माणसे, त्यांच्या न संपणा-या महत्वाकांक्षा, स्वत:बद्दल असलेला स्वाभिमान, आणि त्यातून उद्भवलेला आत्मकेंद्री स्वभाव हे सध्याच्या पिढीचं समीकरण बनलं आहे. जगण्यासाठी महत्वाकांक्षेपेक्षाही नाती महत्वाची असतात, कारण या नात्यातून मिळणा-या प्रेमातूनच आपल्या आयुष्यात स्थैर्य येत असतं. पैसा आणि यशाची धुंदी नात्यांच्या मर्यादेत राहूनच नियंत्रित राहू शकते.
आज कामानिमित्त अनेकजण आपली माणसं सोडून, टार्गेट पूर्ण करता यावं यासाठी परदेशात जाऊन राहतात. पण नवरा बायकोच्या नात्यांमध्ये असा प्रसंग येऊन, नुकताच सुरु झालेला संसार या कामाच्या रगाड्यात पुरता होरपळून निघतो. नवरा एका देशात तर बायको दुस-या देशात अशी परिस्थिती असताना मग संपर्क काय तो मोबाईलसारख्या कृत्रिम यंत्रांच्या माध्यमातूनच. थोड्या दिवसाचं ठीक आहे पण ‘आपण ज्याच्याशी संपर्क ठेऊन आपलं नात टिकावं यासाठी प्रयत्न करतोय ते नातं आधी परिपक्व तरी आहे का?’ असा प्रश्न दोघांच्या मनात निर्माण होतो आणि मग सुरु होते सहन न होणारी चलबिचल, चिडचिड आणि अनियंत्रित संभाषण. पण मग या अशा शारिरिकच नाही तर मानसिक नात्यातलं अंतर जास्त असताना ते जवळ यावं किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावावा या एका समान मुद्द्यावर होणारी दोघांची भेट आणि त्या नात्याचे ठरणारे भविष्य. अशा वास्तव परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य करणारी कथा असलेले हे नाटक आहे.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका अशी चतुरस्त्र जबाबदारी अत्यंत गुणवान रंगकर्मी निखिल रत्नपारखी यांनी निभावली आहे. यापूर्वी ‘साठेचं काय करायचं?’, ‘मसाज’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे. कादंबरी कदम हिनेदेखील आपल्या सरस अभिनयाचे कसब नायकाच्या पत्नीच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. मिलिंद जोशी यांचे पार्श्वसंगीत, शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, गीता गोडबोले यांची वेशभूषा अशोक राऊत यांची रंगभूषा या सर्व रसायनातून हे नाटक सगळ्याच बाबतीत दर्जेदार ठरत आहे. केवळ दोनच पात्रांच्या ताकदीच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कमाल तर या नाटकाने नक्कीच केली आहे…

Monday, August 20, 2012

सुयोग निर्मित ‘केशवा माधवा’

383909 479463868739154 383514778 n सुयोग निर्मित केशवा माधवा



गुजराती आणि हिंदी रंगमंच गाजवल्यानंतर ‘केशवा माधवा’ हे नाटक आता मराठी रूपांतरण होऊन ‘सुयोग’ तर्फे मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाची मूळ कथा गुजराती लेखक भावेश मंडालिआ यांनी लिहिलेली असून याचा मराठी अनुवाद चारुदत्त भागवत आणि अरविंद जगताप यांनी केला आहे. ‘देव’ या संकल्पनेबाबत प्रत्येकच पिढीमध्ये नव्याने वाद- प्रतिवाद होत असतात. आस्तिक आणि नास्तिक या दोन मोठ्या गटांमध्ये अगदी न संपणारे द्वंद्व चालू असते.
‘केशवा माधवा’ या नाटकामधील नायक केशव पाडळशिंगीकर हा नास्तिक, देवावर विश्वास न ठेवणारा आहे. पण उदरभरणासाठी म्हणून देवांच्याच मूर्त्या घडवून त्या विकणे असा त्याचा व्यवसाय आहे. अर्थात नाटकाच्या अखेरी देवाचे अस्तित्व मान्य न करणा-या केशवला ते मान्य करायला लावायचे याच अनुषंगाने संपूर्ण नाटक लिहिलेले आहे.
नायकाच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे असून हेमंत भालेकर, अरुण शेलार, दीपक कदम, भरत शेलार, अतुल अभ्यंकर, निलेशसावे, धनश्री क्षीरसागर, विनिता काळे यांच्याही भूमिका या नाटकात आहेत. नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. अशोक पत्की यांनी नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे आहे.
आता नास्तिक केशवला आस्तिक बनवणारी अशी कोणती घटना त्याच्या आयुष्यात घडली आहे हे समजण्यासाठी प्रेक्षकांना नाटक पाहावेच लागेल.

Tuesday, July 3, 2012

सत्यशोधक : एक प्रांजळ नाट्यानुभव

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या सफाई कामगारांना घेऊन अतुल पेठे यांनी गो.पु.देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ या नाटकाचा अत्यंत रेखीव प्रयोग पेश केला आहे. रंगभूमीच्या मुख्य धारेपासून आजवर शतयोजने दूर असलेले कामगार निर्भीडपणे रंगमंचावर उभे राहण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गो. पु . देशपांडे हे देखील असं म्हणाले की ज्योतीराव फुले यांचे चरित्रनाटय सादर करण्यासाठी श्रमिक वर्ग पुढे झाला हे राजकियीकरण एकविसाव्या शतकातील आधुनिक मराठी प्रेक्षकाला, कदाचित एकंदरीत भारतालाही नवे आहे.
दोन वर्षांपूर्वी जालन्यातल्या जांबसमर्थ या दूरच्या गावातल्या कलावंतांना घेऊन नाटक केल्यानंतर पेठेंनी शहरातला कामगार वर्गच निवडला. त्यांनी नाटकाचा अनुभव नसलेल्यांकडूनही गुणवत्तेची किमान रेषा ओलांडणारं काम करवून घेतलं आहे. गो. पु. देशपांडेंचं हे सुमारे वीस वर्षांपूर्वीचं नाटक आहे. महात्मा फुले यांचं चरित्रनाट्य असं त्याचं ढोबळमानाने वर्णन करता येईल. मात्र त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास नसून फुले चरित्रातला आपल्याला हवा तो भाग निवडून त्याची फेरमांडणी केलेली आहे. भारतीय समाजात फुले यांचं चरित्र पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज निर्माण होते आणि आज तर ती वीस वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक आहे. भारतीय समाज जात, वर्ण यात कायम विभागलेला आहे. अगदी आज एकविसाव्या शतकातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे फुले यांनी केलेला ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यातला फरक, शुद्रातिशुद्राची व्याख्या आणि स्त्रीदास्यांतकाचा केलेला विचार यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे चरित्रनाट्य असूनही त्याचा गाभा विचारप्रधान आहे. यातील पात्रं व्यक्तिरेखा म्हणून नाही, तर विचार म्हणून येतात. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तीचं दिसणं, त्यांची स्वभाववैशिष्ट्य, लकबी यांच्या फंदात कोणी पडत नाही. नाटकाची संवादरचनाही तशीच असून सर्व कलावंत तिला काटेकोरपणा सांभाळतात. संगीताचा भाग श्रवणीय झाला आहे आणि कलावंतही तो मनापासून सादर करतात. वादकांचा वाटाही लक्षणीय आहे. यातल्या दृश्य भागाला उठाव येण्यासाठी प्रदीप वैद्य यांनी केलेली प्रकाशयोजना नाटकाला छायाचित्रात्मक पोत प्राप्त करवून देते आणि फोटो अल्बम बघितल्यासारखे एकामागून एक प्रसंग उलगडत जातात.
महात्मा फुलेंची भूमिका ओंकार गोवर्धन याने प्रभावी केली आहे. विशेष करून वैचारिक भाग त्याने उत्तमरितीने पोहोचवला आहे. पर्ण पेठेनेही सावित्री बाई तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. हे दोन्ही कलावंत गुणी असले तरी त्यांच्या जागी कामगार कलावंतंच असते तर नाटकाचा पोत अधिक रांगडा झाला असता. तरी एक मात्र नक्की की सगळ्यांनी एक थेट भिडणारा प्रांजळ नाट्यानुभव मराठी प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. श्रमिकांना घेऊन नाटक करण्याची कल्पना अतुल पेठे यांची असून, ते नाटक महात्मा फुले यांच्यावरच असावं ही कल्पनाही त्यांचीच असल्यामुळे या योजकतेचं किंवा गो. पु. देशपांडे म्हणतात त्या नवेपणाचं श्रेय पेठेंना द्यायला हवं.

Friday, June 29, 2012

लेकुरे उदंड जाहली

Sumeet Raghavan with wife3 240x300   लेकुरे उदंड जाहली



नाट्यसंपदातर्फे ‘लेकुरे उदंड जाहली’ हे नाटक रंगभूमीवर येतंय. २ जूनला त्याचा मुहूर्त करण्यात आला. विशेष गोष्ट अशी की प्रेक्षकांसमोरच या नाटकाचा मुहूर्त झाला.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांची ही अजरामर कलाकृती. काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी ‘लेकुरे उदंड जाहली’चे प्रयोग केले होते. आता पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला हे लोकप्रिय नाटक सज्ज होतंय. टीव्हीवर मालिका आणि शोज मध्ये बिझी असलेला सुमीत राघवन जवळजवळ वीस वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुनरागमन करतोय. या नाटकात प्रमुख भूमिकेत सुमीत आणि त्याची पत्नी चिन्मयी ही जोडी चमकणार आहे. त्याचबरोबर उदय सबनीस, शिवानी, सुनील गोडबोले ह्या कलाकारांच्याही या नाटकात भूमिका आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की या नाटकाला संगीत देत आहेत.
या नाटकाबाबत सुमीत म्हणाला, “नाटकात एकत्र काम करायला मिळाल्याने मी आणि चिन्मयी खूप एक्साईटेड आहोत. १९९३ मध्ये आम्ही दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही अशा संधीच्या शोधात होतो. ऑफर्स येत होत्या, पण दोघांना एकत्र काम करण्याची ऑफर काही हाती येत नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक बघायला गेलो होतो. तेव्हाच ‘लेकुरे उदंड जाहली’ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाटकातले राजा आणि राणी ज्या वयोगटातले आहेत त्याच वयोगटात आम्ही दोघंही सध्या आहोत. त्यामुळे हे करायला खूप मजा येणार आहे. तालमींपूर्वीच आम्हा दोघांची तयारी मात्र सुरु झाली आहे.”
लवकरच ‘लेकुरे…’च्या तालमी सुरु होणार असून २८ जुलैला नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

Saturday, June 23, 2012

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’

नंदू माधव यांचे दिग्दर्शन असलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सध्या खूप चर्चेत आहे. सिनेमा तयार करतानाच त्याच्या प्रमोशनची सुरुवात होते, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखले जातात. पण नाटकाच्या बाबतीत तसं होत नाही. नाटकाच्या जाहिराती आणि नाटकाबद्दलच्या बातम्या यातून होईल तेच प्रमोशन, त्यासाठी वेगळे उपक्रम वगैरे नसतात. त्यामुळे नाटकाचं फारसं प्रमोशन होत नाही. परंतु, नंदू माधव यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत हे नाटक पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाटकाच्या टीमने कंबर कसली. शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर नाटकाच्या प्रमोशनची सुरुवात करून, या नाटकासंबंधी माहिती देण्यासाठी ह्या कलाकार मंडळींनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं. त्यासाठी ठिकठिकाणी त्याची पथनाट्यही सादर केली जातील. अशा प्रकारचे प्रमोशन मराठी नाट्यसृष्टीत पहिल्यांदाच होत आहे. नंदू माधव यांच्या मते मुळात हे नाटक सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे नाटकात मांडलेला विचार, या नाटकाची आजची गरज ही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी थेट रस्त्यावरच उतरायचं ठरलं.
‘अद्वैत थिएटर्स’ च्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाच्या प्रमोशनची ही आगळीवेगळी कल्पना नाट्यसृष्टीतील अनेकांना आवडली आहे, अनेकांनी यात सहभागी व्हायची तयारीही दर्शविली आहे. प्रयोगांमध्ये अंतर असेल तर नाटकातील मुलेच पथनाट्य सादर करतील, पण प्रयोग सलग असतील तर नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस मुलांच्या आवाजावर ताण पडू नये म्हणून नाटकाबाहेरची काही मंडळी पथनाट्य सादर करतील. नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रातील ज्या थिएटरमध्ये असेल त्या परिसरात नाटकाच्या दिवशी पाच ठिकाणी पथनाट्यातून नाटकाचे प्रमोशन करण्यात येईल. त्यावेळेस नाटक कुठे आणि किती वाजता आहे, याचा बोर्डही असेल. या पथनाट्यासाठी संभाजी भगत यांनी गाणी लिहिली आहेत.

Tuesday, June 19, 2012

सी यू अगेन

03 300x225 सी यू अगेन
सिनेनिर्मितीचे शिवधनुष्य उचलल्यानंतर निर्माते सचिन पारेकर आता नाट्य निर्मितीकडे वळले आहेत. ‘अमोल प्रॉडक्शन’ बॅनरचे ‘सी यू अगेन’ हे अनोखे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा मुहूर्त नुकताच माहीम येथील रंगशारदा हॉलमध्ये कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सचिन पारेकर म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून एखादे नाटक करण्याची इच्छा होती, पण बऱ्याच स्क्रिप्ट वाचूनही कोणतीही कथा मनाला भिडत नसल्याने ते थांबले होते.
सिनेमा, नाटक आणि जाहिरात अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा निखिल रत्नपारखी आता दिग्दर्शनाकडे वळला आहे. ‘सी यू अगेन’चे दिग्दर्शन तसंच लेखनही निखिलने केले आहे. त्याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ‘सी यू अगेन’ बद्दल एका वाक्यात बोलायचे तर…भविष्याची चाहूल देणारे नाटक. निखिल बद्दल सचिन पारेकर म्हणाले की निखिल त्यांचा खूप जुना मित्र असल्याने त्याच्याशी गप्पा मारताना बोलण्याच्या ओघात त्याने एक विषय सांगितला आणि तो मनाला भावला. त्यानंतर निखिलने पटकथा लिहिली आणि पटकथा इतकी सुटसुटीत आणि मुद्देसूद होती की त्यांनी लगेच त्यावर नाटक करण्याचा निर्णय घेतला.
‘सी यू अगेन’ची कथा केवळ दोन पात्रांभोवतीच फिरते, एक पात्र निखिल साकारणार आहे, तर दुसरे कादंबरी कदम. नाटकाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे. हे नाटक नवरा-बायकोमधील नाते-संबंधांवर आधारित आहे. भविष्यात हे नाते कोणत्या थराला जाऊ शकते याची झलक ‘सी यु अगेन’मध्ये पाहायला मिळेल. नवरा-बायकोच्या नात्यातील अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात येईल. हे नाटक सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. प्रत्येकासाठी त्यात संदेश आहे.
‘सी यू अगेन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येईल