Tuesday, July 24, 2012

नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत ‘बाबांची शाळा’

08 नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत  बाबांची शाळा

लेखणीच्या साथीने साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या, आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणा-या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नीला सत्यनारायण आता एक वेगळ्याच रुपात आपल्यासमोर येणार आहेत. आजपर्यंत नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके तसेच पुस्तकांच्या साथीने साहित्यजगताला समृद्ध करणा-या नीला सत्यनारायण आता चंदेरी दुनियेत प्रवेश करत आहेत. त्यांच्याच एका कथेवर आधारीत असलेला ‘बाबांची शाळा’ हा त्यांचा चित्रपट रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोमवार, दिनांक १६ जुलै २०१२ रोजी, सकाळी ११ वाजता, आजीवासन स्टुडीओ,जुहू- तारा रोड, सांताक्रूझ येथे गीतध्वनीमुद्रणाने संपन्न झाला.
‘दे भरूनी मला किरणांनी, हे हृदय जरा सोनेरी, अन काजळला अंधार, दे पुसून मला किरणांनी….’ या नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या गीताच्या ध्वनीमुद्रणाने ‘बाबांची शाळा’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. रवींद्र साठे आणि देवकी पंडीत या दोन्ही अभिजात गायकांनी हे गीत गायले आहे. ‘दत्तविजय प्रोडक्शन’ च्या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटात एकूण सात गाणी असून सर्व गाणी नीला सत्यनारायण यांनीच लिहिलेली आहेत. संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या साथीने या गीतांना सुरावटीने सजवण्याचं संगीत दिग्दर्शनाचं कामंही नीला सत्यनारायण करणार आहेत. सुरेश वाडकर,अमृता नातू, हृशिकेश रानडे तसेच हंसिका अय्यर अशा सर्व आघाडीच्या गायकांनी चित्रपटातील इतर गाणी गायली आहेत.
साहित्याची सेवा करताना नीला सत्यनारायण यांनी आजवर अनेक कथा वाचकांपर्यंत पोहोचवल्या.पण एका कथेने त्यांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि ही कथा रुपेरी पडद्यावर झळकावी असे त्यांना वाटले. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तीनही कलाक्षेत्रांमध्ये आपल्या ठसा उमटवणा-या संपदा जोगळेकर प्रथमच दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
नीला सत्यनारायण यांच्या मते परिस्थितीच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे समाजाच्या एका चौकटीत बंदिस्त किंवा कैद झालेल्या समस्त पुरुषांमधला ‘बाबा’ हा घडवावा लागतो. ‘बाबांची शाळा’ च्या कथेमधून याचेच महत्व विषद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कामानिमित्त फिरताना लक्षात आलेल्या, त्यांनी निरीक्षण केलेल्या व्यथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात अशा उद्देशाने हा चित्रपट बनवण्याचे त्यांनी ठरवले. सिनेमासारख्या प्रभावी माध्यमातून ही कथाही तितक्याच प्रभावीपणे जगासमोर येईल असा नीला सत्यनारायणयांचा मानस आहे. त्यानुसार चित्रपटाची निर्मिती सुरु झाली आहे.
‘बाबांची शाळा’ चित्रपटाची कथा एका कैद्याच्या जीवनावर आधारलेली आहे. जन्मठेप झालेल्या पुरुषाच्या निश्चल आयुष्यात होणारे चढउतार या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत. तुरुंगातली शिक्षा भोगून झाल्यानंतर आयुष्यात भोगाव्या लागणा-या शिक्षेचे चित्रण चित्रपटात करण्यात आलेले आहे.
आजपर्यंत रसिकांना सशक्त अभिनयाचे दर्शन घडवत असतानाच दिग्दर्शन क्षेत्राच्या कक्षा सुद्धा संपदा जोगळेकर यांना खुणावत होत्या. त्यानुसार ‘बाबांची शाळा’ या सिनेमाद्वारे त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. उत्तम दिग्दर्शनासाठी कराव्या लागणा-या अभ्यासाची संपदा जोगळेकर यांना आधीपासून जाणीव असल्याने त्यासाठी मेहनत घेण्याचीही त्यांची पूर्ण तयारी होती. योग्य संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपदा जोगळेकर यांना नीला सत्यनारायण यांच्या ‘बाबांची शाळा’ या कथेने ती संधी उपलब्ध करून दिली आणि त्या दिग्दर्शनाकडे वळल्या. दिग्दर्शन आपल्याला आवडणारे भावविश्व असल्याचं संपदा जोगळेकर मानतात. आजवरचा अभिनयातील अनुभव आणि दिग्दर्शनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या अभ्यासाच्या बळावर ‘बाबांची शाळा’ च्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे. कलाकारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment