‘मातृभूमी प्रॉडक्शन्स’ आणि ‘कटिंग चाय प्रॉडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली असून जुलै मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ऐक’ची निर्मिती प्रदीप गर्ग यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतिक कदम यांनी केले आहे.
मराठीत ज्या प्रमाणात विनोदी आणि कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती झाली, त्या प्रमाणात रहस्यमय भयपटांची निर्मिती झाली नाही. असे फार मोजके चित्रपट आहेत. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं कथानक, क्षणोक्षणी गडद होत जाणारं रहस्य, थक्क करणाऱ्या तांत्रिक कौशल्याची भक्कम तटबंदी आणि सफाईदार अभिनय-दिग्दर्शनाची जोड असेल तर नक्कीच दर्जेदार कलाकृती निर्माण होते. भय, रहस्य, उत्कंठा यांनी खिळवून ठेवणारा ‘ऐक’ हा असाच एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा तसेच संवाद जन्मेजय पाटील व स्वप्निल जाधव यांनी लिहिले असून गीते जन्मेजय पाटील यांचीच आहेत. ‘ऐक’ चित्रपटाचे संगीत राजेश सावंत यांनी दिले असून ते कथानकाला अधिक गहिरं करणारं आहे. चित्रपटातील गीते स्वप्निल बांदोडकर, नेहा राजपाल, सुमित्रा अय्यर, राजेश सावंत, श्रुती सावंत या गायकांनी गायली आहेत. नृत्य दिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांनी केले असून साहस दृश्ये स्टंट मास्टर हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित झाली आहेत. पार्श्व संगीत महेश नाईक यांचे असून कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे आहे. संकलन हर्षद वैती यांचे आहे तर छायाचित्रण अनिकेत के. यांनी केले आहे.
या चित्रपटात स्वप्निल जाधव, आदिती सारंगधर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, सुहास पळशीकर, शेखर फडके, भूषण घाडी, प्रशांत नेमण, हृषिकेश गुजर, मौसमी हडकर, पूनम जाधव, शिल्पा कांबळे, बाल कलाकार स्वरांगी करंदीकर, तनिष सोनावणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘ऐक’ या चित्रपटाची कथा एका रचलेल्या खेळाची, अकल्पित मानवी सावल्यांची आहे. चित्रपट नायक ऋषी, त्याची पत्नी आदिती आणि मुलगा विवान या त्रिकोणी कुटुंबावर आधारित आहे. एका चॅनेलसाठी काम करणारा ऋषी त्याचा बॉस सॅंडीबरोबर एक हॉरर शो करण्याचे ठरवतो. स्पर्धकांसाठी रचलेल्या या खेळाचा डाव ऋषीच्या वैयक्तिक आयुष्यात थरार उडवून देतो. अमानवी सावल्यांचे भास, आभास, भीती, प्रेम, आक्रोश, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा भयपट म्हणजे ‘ऐक’ हा चित्रपट येत्या १३ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
No comments:
Post a Comment