Sunday, July 15, 2012

खिलाऱ्या : वास्तववादी कथासंग्रह

मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात नुकतेच ग्रामीण कथाकार प्रा. डॉ. भास्कर बडे यांच्या ‘खिलाऱ्या’ या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी प्रसिद्ध समीक्षक प्रा.बाळकृष्ण कवठेकर म्हणाले की प्रा. डॉ. भास्कर बडे हे स्वतः गावशिवारातील अनुभव घेऊन, प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या घटनांचे वास्तवदर्शन आपल्या कथालेखनात घडवतात. तसेच ‘खिलाऱ्या’तील कथा वाचकांना विचार करावयास लावणाऱ्या आहेत.
प्रकाशनसमयी ज्येष्ठ साहित्यिक हृषीकेश कांबळे म्हणाले, “कथालेखक बडे यांचे साहित्य या दशकातील ग्रामीण दलित सीमारेषा धूसर करणाऱ्या कथा आहेत. यामध्ये ‘यमादादा’ ही कथा ग्रामीण दलित साहित्याचा एक सुंदर नमुना आहे. बडेंची कथा ही बदलत्या सांस्कृतिक जीवनाचा पट चित्रित करते.”
साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री. के एस. अतकरे म्हणाले, “बडे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. गाव पातळीवरील अनुभव घेत शेतीशी निगडीत असल्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यात शेतीतील दुःख, दारिद्र्य, त्यातील विविध प्रश्न कथालेखनाचे विषय केले आहेत. म्हणून श्री. बडेंच्या कथा ह्या साहित्यात दखलपात्र झाल्या आहेत.
या प्रसंगी प्रसिद्ध कवयित्री सौ. रंजन कंधारकर आणि प्राध्यापक केशव अलगुले यांनी ‘खिलाऱ्या’ कथा संग्रहातील कथेचे वेगळेपण आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाई ज्ञानोबा मुंढे समारोपाच्या वेळेस म्हणाले ,”खिलाऱ्यातील कथा ह्या वास्तववादी आहेत. त्या माणसांच्या कथा आहेत. विदारक अनुभव मांडणे हे बडेंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. म्हणून बडेंची कथा ही वाचकांना वाचनाचा आनंद देते.”
याप्रसंगी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे. डॉ. दासू वैद्य, डॉ. महेश खरात, श्री. अजय अंबेकर, डॉ. गणी पटेल, पोलीस उपाधीक्षक बाबाराव मुसळे, प्रभाकर सानप, उत्तम बावस्कर, अंबादास केदार, प्रा. राजेश्वर पाटील, प्रा. राजेंद्र औरंगे, निवृत्त न्यायाधीश कांगणे, अमित बडे इ. मान्यवर उपस्थित होते. प्रसाद प्रकाशनचे श्री. सूर्यकांत शिरसे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, तर आभार प्रदर्शन श्री. अनंत कराड यांनी केले.

No comments:

Post a Comment