कोणत्याही कलाकृतीत जर रंग भरायचे असतील तर बदल आणि नाविन्य या दोन गोष्टींची साथ ही असावीच लागते. आणि याच दोन गोष्टींचा अंमल सध्या मराठी चित्रपटांवर आहे. विषयातील नाविन्य, सादरीकरणातील बदल, लोकेशन्सची टूर तसेच आधुनिक तंत्रज्ञान यांच्या जोरावर मराठी चित्रपट अधिक आकर्षक करून, प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच भाग म्हणजे ‘गोवर्धन चित्र’, या निर्मिती संस्थेद्वारे करण्यात आलेला एक नवा प्रयोग. गोवर्धन चांगो भगत निर्मित, कमलाकर गुंजाळ दिग्दर्शित आगामी ‘नवरा माझा भवरा’ या मराठी चित्रपटात तब्बल दहा अप्सरा एकाच वेळी एकाच गीतावर आपली अदाकारी सादर करणार आहेत. मराठी चित्रपट – मालिकातील आघाडीच्या दहा नायिका या गीतामध्ये एका नायकाची चेष्टा मस्करी करत आहेत, असे हे गीत चित्रीत करण्यात आले आहे. नायिकांच्या वैविध्याबरोबरच हिप-हॉप, लावणी, भांगडा तसेच आदिवासी नृत्यशैलीतील ‘तारपा’ अशी नृत्यकलेतील विविधता सुद्धा प्रेक्षकांना या गीतात पाहता येईल.
युवा अभिनेता निलेश साबळे याची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात असून ‘बाई बाई लाजाळू बाई…..’ असे बोल असणारे हे गीत त्याच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. निलेश साबळे यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांच्या बरोबर मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, शर्मिष्ठा राऊत, गिरीजा ओक, शर्मिला शिंदे, अदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले, माधवी निमकर, मेघा घाडगे, सोनाली खरे या अभिनेत्रींनी त्यांच्या ग्लॅमरस लूक बरोबर धमाकेदार नृत्यांचा खजिनाच प्रेक्षकांना दिला आहे. दिपाली विचारे यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात दहा नायिकांनी वेगवेगळी नृत्य
झलक दिली आहे.
मुख्य नायिकेच्या भूमिकेत तमन्ना नायर हि अभिनेत्री असून विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, सतीश तारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे यांच्या महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. बाह्य रूपापेक्षा आंतरिक सौंदर्य नेहमीच महत्वाचे असते हे विनोदी शैलीत या चित्रपटात मांडले गेले आहे. धम्माल विनोदी कथानक, सुमधुर संगीत, आणि लोकप्रिय कलाकारांच्या रंगात रंगलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद नी गीतलेखन राजेश बमू गडे यांचे असून अशोक वायंगणकर यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, आनंद शिंदे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरेल आवाजांची साथ गीतांना लाभली आहे. जयंत घोष हे चित्रपटाचे छायांकन करत आहेत.
दहा सौंदर्यवतींच्या घोळक्यात रमलेला निलेश साबळे यांचा हा ‘नवरा माझा भवरा’ प्रेक्षकांना खळखळून हसवेल अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment