Saturday, June 30, 2012

अनमोल महत्त्व ‘साहित्याचे’

मातृभाषेला परिपूर्ण ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करायचं असेल तर इंग्रजी बरोबरच अन्य भाषातलं ज्ञान, तंत्रज्ञान आणि साहित्य मराठीत आणलं पाहिजे कारण मराठीकडे ज्ञानभाषा म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा ती कुठेतरी अपूर्ण दिसते. हिंदी आपल्या देशाची अधिकृत राष्ट्रभाषा आहे. आपल्या राजकीय इतिहासाने आपल्या आंतरराष्ट्रीय भाषेतल्या व्यवहाराची गाठ इंग्रजीशी घालून दिली कारण इंग्रजी ही जगाची मूकसंमत व्यवहार भाषा आहे. दीडशे वर्षं इंग्रजी भाषा शिकण्याचा अनुभव असूनही ना धड इंग्रजी ना धड मराठी अशी आपली स्थिती आहे. कारण इंग्रजीचा योग्य वापर करून घेण्यात आपण कमी पडलो, विशेषतः मराठी माणसाच्या बाबतीत हे सत्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे मराठी तरुण मागे पडतात. इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध आहे, या महान तत्वाचा साक्षात्कार होऊनही त्याचा सखोल अभ्यास आपल्या भाषा विषयक संवेदनशीलतेला यथार्थपणे करता आलेला नाही. त्यामुळेच इंग्रजीतलं अनेक विषयांमधलं साहित्य मराठीत आलं नाही आणि जागतिक दर्जाचं मराठी साहित्यही इंग्रजीसह इतर भाषांमध्ये जाऊ शकलं नाही.
कोणत्याही समाजाची मातृभाषा ही त्या समाजाच्या सर्जनशीलतेची आणि सर्जनशील संचिताची वाहक आणि रक्षक असते, पण अन्य भाषा जेव्हा आपल्या कक्षेत प्रवेश करतात, तेव्हा त्या भाषाही समाजाच्या सर्जनशीलतेला आणि संचिताला श्रीमंत करणारी साधनं ठरतात. हा भाषिक दृष्टीकोन जणू आपल्या लक्षातच आला नाही. म्हणूनच बहुभाषिक वारसा आपण उपेक्षाबुद्धीने उधळून दिला. नाहीतर गोव्यातील पोर्तुगीज भाषेतील साहित्याची दालनं आपण बंद केली नसती. तसेच निजामाच्या राजवटीतील मराठवाड्यातील उर्दू भाषा शिक्षणाची आणि संपादनाची परंपरा आपण कटाक्षाने जपली असती. महाराष्ट्रातील हिंदी आणि इतर भारतीय भाषांची केंद्रं मराठीच्या मध्यधारेला जोडून घेण्याचंही टाळलं नसतं.
दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जपान बेचिराख झाला, युद्धात सैनिक आणि पुरुष मारले गेल्याने पुरुषांची संख्या घटली, परंतु अनाथ झालेल्या अनेक मुलांचं संगोपन महिलांनी स्वहिंमतीवर केलं. विविध भाषांमधील अनेक पुस्तके जपानी भाषेत अनुवादित केली. ती अगदी तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत नेली. मुलांना आणि युवकांना इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवली. त्या भाषांमधील विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचं तत्वज्ञान जपानी भाषेत आणलं. त्यामुळेच जपानला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा आकाशात झेप घेता आली कारण त्यात जपानी भाषेत आणलेल्या इतर भाषेतील पुस्तकांची भूमिका अनन्यसाधारण होती.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांना संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यांनी संस्कृत वाङमयातील
अध्यात्म भाषा, वर्णनं आणि प्रतिमा आत्मसात करून त्याला अभिनव रंगरूप देण्याचं काम केलं. त्यांनी प्रसंगी हिंदी भाषेतही रचना केल्या. अन्य भाषांशी देवाणघेवाण करण्याची एक उन्नत आणि स्वागतार्ह भाषादृष्टी आणि भाषाविवेक असतो, तो आपल्या संतांनी दाखवून दिला. साने गुरुजींनी दिलेला ‘आंतरभारती’ हा एक राष्ट्रीय एकात्मतेचा सुविचार आहे. जगातील सर्व भाषा एकमेकींच्या भगिनी आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु, संतांनी दिलेली शिकवण मराठी आधुनिकांनी पुरेशी लक्षात घेऊन जपल्याचं दिसत नाही.
भाषा आणि त्या भाषेतील पुस्तके हे समाज आणि संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम करतात. इंग्रजी भाषा आत्मसात करून मातृभाषेला समर्थ आणि संपन्न करणं हे खरं तर आव्हान आहे. ते पेलण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात अधिक काळ घालवला पाहिजे. पुस्तकं विचार देतात आणि विचार कृती करायला भाग पाडतो आणि म्हणूनच पुस्तकांचं, पर्यायाने, साहित्याचं महत्त्व अनमोल आहे.

No comments:

Post a Comment