भारतावरील २६/११ च्या हल्ल्याची एन्काऊंटर स्पेशालिस् ट सचिन वाझे यांनी लिहिलेली ही सत्यकथा, नव्हे ‘सत्य’…
‘दहशतवाद’ या विषयावरील मराठीतील पहिलेच ‘ओरिजिनल’ पुस्तक
१००% डिटेक्शन रेट असणारे, ४०० आरोपींना अटक करणारे, १२० कोटींहून अधिक किंमतीच्या मुद्देमालाची जप्ती करणारे, ६३ गुंड/ दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे आपणा सर्वांनाच परिचित आहेत.२६/११ च्या हल्ल्याच्या नियोजनापासून ते कसाबला फाशी ठोठावण्यापर्यंतचा सर्व इत्यंभूत लेखाजोगा सचिन वझे यांनी ‘ जिंकून हरलेली लढाई’ या पुस्तकात सविस्तर मांडला आहे.
तपासाचे १२००० कागदपत्र, एफबीआय रिपोर्ट्स, ६५८ साक्षीदारांनी न्यायालयात दिलेले जबाब, न्यायाधीशांनी आरोपींना विचारलेले ४००० प्रश्न, ३००० पानांची निकालपत्रे या सर्वांचा सखोल अभ्यास करून सचिन वझे यांनी हा थरारपट कागदपत्र आणि छायाचित्रांसह आपल्यासमोर आणला आहे.
या सगळ्या प्रकरणात सिंहाचा वाटा असणारे काही रिअल हिरो या पुस्तकाद्वारे आपल्याला कळणार आहेत. सीएसटीवर मुकाबला करणारे सुदाम पंदरकर, गेटवेवर लढा देणारे निवृत्ती गव्हाणे, ओबेरॉय मधील कमांडो मनेश असे पोलीस आणि एनएसजीतल्या अनेक अधिका-यांच्या कार्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
नरीमन हाउस, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय, ताज, तसेच आझाद काश्मीर मध्ये घडत असलेल्या घटनांचा जिवंत अनुभव देणारे हे पुस्तक आहे.
२६/११ चा हल्ला हा फक्त एका हॉटेलवरील किंवा स्टेशनवरील हल्ला नव्हता. भारतीय अस्मितेवरील हा हल्ला प्रत्येक भारतीयाच्या अभिमानावर झालेला हल्ला होता. २० पोलीस/ सैनिकांना आणि १४६ निरपराध जीवांना या हल्याने काळाच्या तोंडी दिले. २३८ जणांना अपंगत्वाचा शाप देत कोटी रुपयांच्या मालमत्तेला राख करणारा हा अमानवी हल्ला होता.
प्रथम दर्शनी फक्त १० व्यक्तींना प्रकाशात आणणा-या या छुप्या हल्ल्यात प्रत्यक्षरीत्या १०० आणि अप्रत्यक्षपणे अनेक व्यक्तींचा सहभाग होता हे हल्ल्यानंतर दोन महिन्यातच समोर आले. प्रत्यक्ष हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या एकाला, म्हणजे पाकिस्तानी अजमल आमीर कसाब असे नाव सांगणा-याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
भारताचे सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्यावर पुढील शिक्कामोर्तब नक्की करेल अशी आशा आणि अपेक्षा ही आहेच.
२६/११ च्या भयंकर अनपेक्षित हल्ल्यानंतर या हल्ल्याची माहिती मिळवण्यात संरक्षण विभाग तसेच इतरही अनेक यंत्रणा अपयशी ठरल्या असे सगळ्यांचेच मत झाले. पण तरीही काटेकोरपणे नियोजन असलेला, जबरदस्त आखणी आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याचा मुंबई पोलिसांनी आणि नेव्ही तसेच सैन्यदलाच्या कामांडोजनी सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला. कोणतीही पूर्वकल्पना नसताना, अचानक समोर आलेल्या या हल्ल्याला प्रसंगावधान राखून निधड्या छातीने लढलेल्या लढाईला सलामच केला पाहिजे.
पुढे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने महाराष्ट्राच्या अतिरेकी विरोधी दलाच्या मदतीने या हल्ल्याची पाळेमुळे खणून काढली.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले. आज आपल्याही डोक्यावर ही दहशतवादाची टांगती तलवार लटकते आहे. अशा कित्येक छुप्या हल्ल्याच्या सावटाखाली आपण सवयी नुसार वावरतो आहे. अमेरिकेने त्यांच्या बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली, आता आपलं सरकार हे काम कधी करणार या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत लक्षात ठेवूया ही-
‘ जिंकून हरलेली लढाई’