Monday, April 23, 2012

मराठी रसिकांच्या भेटीला आशुतोष राणा

 मराठी रसिकांच्या भेटीला आशुतोष राणा
सध्या हिंदीतील बडे कलाकार मराठीकडे वळत असून आशुतोष राणाही त्याला अपवाद नाही. ‘स्वाभिमान’, ‘वारिस’, ‘फर्ज’, ‘काली’ यासारख्या मालिकांमधून नावारूपाला आल्यानंतर ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ यासारख्या सिनेमात त्याने पारितोषिक विजेता अभिनय केला आहे. अस्खलित हिंदी बोलण्याला आशुतोषने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचे मराठीशी तसे फार जुने नाते आहे कारण मराठीतील गुणी अभिनेत्री रेणुका शहाणे त्याची धर्मपत्नी आहे. आशुतोष मराठीत पदार्पण करत आहे ते राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा ‘धुडगुस’ सारखा सिनेमा प्रस्तुत करणाऱ्या मैत्र एन्टरटेनमेंटच्या आगामी सिनेमातून. या सिनेमाचे नाव ‘येडा आप्पा’ असून त्याचे निर्माते सतीश मोरे, स्नेहा तांबे, गिरीश साळवी , लक्ष्मण साळुंखे व आदित्य शर्मा आहेत तर सहनिर्मिती हनुमानजी रॉक्ज एन्टरटेनमेंटची आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन किशोर पांडुरंग बेळेकर हे करणार आहेत. त्यांनी हिंदीतील नामवंत दिग्दर्शकांना साथ केल्यानंतर ‘स- सासूचा’ हा मराठी सस्पेन्स सिनेमा दिग्दर्शित केला. ‘येडा आप्पा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षक भूमिकेसाठी त्यांनी आशुतोष राणाची निवड केली आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या एका विक्षिप्त व खुनशी व्यक्तीची ही गोष्ट आहे. या सिनेमात आशुतोष बरोबर रिमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर व अनिकेत विश्वासराव यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शनाबरोबरच या सिनेमाची कथा, पटकथा व संकलन किशोर पांडुरंग बेळेकर यांचेच आहे तर संवाद गिरीश साळवी यांनी लिहिले आहेत. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते पवन वैद्य आहेत तर कॅमेरामन रईस अन्सारी आहेत. हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी झाल्यानंतर तेलुगु सिनेमांची चव चाखणाऱ्या आशुतोषने ‘दुश्मन’ सिनेमात साकारलेला गोकुळ पंडित व ‘संघर्ष’मध्ये साकारलेला लज्जा शंकर पांडे यांचे सर्वच स्तरातून खूपच कौतुक झाले. आता मराठी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेऊन आशुतोषने खऱ्या अर्थाने मराठीवरील आपले प्रेम दाखवून दिले आहे. ….

No comments:

Post a Comment