Monday, April 23, 2012

‘श्यामची आई’ साठी माधुरी आणि विद्यात चुरस

साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकावर आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या चित्रपटाने इतिहास घडवला होता. ‘श्यामची आई’ अत्यंत लोकप्रिय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘सुवर्णकमळ’ पटकावले होते. निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मनात या पुस्तकावर नव्याने चित्रपट काढावा अशी इच्छा कित्येक दिवस घोळत होती. आता त्यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तरूण दिग्दर्शक सुजय डहाके यांच्याकडे सोपवली आहे. सुजय डहाके यांच्या ‘शाळा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. या चित्रपटातील स्वातंत्र्यपूर्ण काळ साकारण्यासाठी कला दिग्दर्शनाची जबाबदारी सत्यजित देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन गौरी बापट करत आहेत.
‘श्यामची आई’ ह्या चित्रपटात काम करण्यासाठी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या अव्वल अभिनेत्रींमध्ये चुरस आहे. ‘फेरारी की सवारी’मध्ये लावणीची अदा दाखवणाऱ्या विद्या बालनने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा वारंवार दर्शवली आहे. विशाल भारद्वाज यांच्या ‘देढ इश्कियाँ’मध्ये विद्याच्या जागी माधुरीची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर माधुरीला ‘खो’ देण्यासाठी विद्या ‘श्यामची आई’ बनणार अशा चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे जरी माधुरी मराठी चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक असली तरी सध्या विद्याचे पारडे जड वाटते आहे.
‘ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट’ तर्फे या दोन्ही अभिनेत्रींशी संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माधुरीचे सचिव रिक्कू राकेशनाथ यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. विद्याला मराठीत काम करायचे आहे पण ‘श्यामची आई’ बाबत आत्ता काहीही सांगू शकत नाही असे विद्याच्या सचिवांनी सांगितले. मांजरेकर म्हणाले,” या दोघींबाबत केवळ चर्चा करत आहोत. कोणाचेही आव अंतिम झालेले नाही. निर्णय झाला की नक्कीच जाहीर करू.”
त्यामुळे या स्पर्धेत कोणाची वर्णी लागते ते रसिकांना लवकरच कळेल.

No comments:

Post a Comment