Monday, April 23, 2012

हरहुन्नरी मंगेशने खेळ मांडला

  हरहुन्नरी मंगेशने खेळ मांडला
मिराह एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘खेळ मांडला’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये मंगेश देसाई आपल्याला एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटात तो दासू नावाचा एक कळसूत्री बाहुलीवाला साकारत आहे. आत्तापर्यंत त्याने विविध भूमिका केलेल्या आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना मंगेश गंभीर भूमिकेत दिसणार आहे.’खेळ मांडला’ हा वडील आणि मुलीच्या हृदयस्पर्शी नातेसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट आहे.मराठी प्रेक्षकांना ‘शहाणपण देगा देवा’ सारखा धमाल विनोदी चित्रपट , ‘मुंबई – पुणे – मुंबई’ सारखी तरल प्रेमकथा तसेच ‘फक्त लढ म्हणा’ सारखा थ्रिलर चित्रपट देणाऱ्या मिराह एन्टरटेनमेंटची ‘खेळ मांडला’ ही नवी नवी निर्मिती आहे. हा चित्रपट त्यांनी उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये राखत बनवला आहे. प्रेक्षकांना ‘शर्यत’ सारखा वेगळा चित्रपट देणारे दिग्दर्शक ‘विजू माने’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी मंगेशवर विश्वास दाखवला व मंगेशनेही तो विश्वास सार्थ ठरवत कसून तयारी केली. त्याकरिता त्याने आपला लूक बदलला. ‘खेळ मांडला’ मध्ये तो डोक्यावर विरळ केस आणि वाढलेली दाढी अशा रुपात दिसणार आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या दासूची भूमिका असल्याने मंगेशने ह्या खेळासाठी विशेष प्रशिक्षण घेतलं. जवळजवळ दोन महिने सराव करून त्याने ह्या खेळातील बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या व पडद्यावर हा बाहुल्यांचा खेळ मांडण्यात तो यशस्वीही झाला. मंगेशने आजपर्यंत मालिका, रिआलिटी शोज, नाटक, कॉमेडी शोज अशा मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात मनसोक्त संचार केला पण या सगळ्यात त्याला विनोदी भूमिकाच जास्त मिळत गेल्या. त्यामुळे विनोदी भूमिकांच्या चौकटीत तो अडकून पडला पण आता ‘खेळ मांडला’च्या निमित्ताने ही चौकट मोडीत काढत तो आपली नवी इमेज घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या २७ एप्रिलला ‘खेळ मांडला’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची आणि मंगेश देसाई या हरहुन्नरी अभिनेत्याच्या अभिनयाची दखल यापूर्वीच चित्रपट महोत्सवांनी व समीक्षकांनी घेतली आहे . आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकही त्यांना नक्कीच दाद देतील.

No comments:

Post a Comment