वास्तुयोगी श्री. हरीभाऊ लिमये यांच्या ‘जीवनप्रकाश’ कादंबरीवर आधारित ‘याला जीवन ऐसे नाव’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः लिमये यांनीच उचलली आहे. प्रमोद प्रभाकर समेळ यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्याच्या फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्युटच्या सभागृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (FTII) राजेंद्र पाठक, लेखक-निर्माते श्री. हरिभाऊ लिमये, दिग्दर्शक प्रमोद प्रभाकर समेळ, आमदार श्री. उल्हासदादा पवार, अभिनेते विलास उजवणे हे मान्यवर उपस्थित होते. अभिनेते विलास उजवणे आणि चेतन क्षीरसागर यांच्यावर मुहूर्त दृश्य चित्रित करण्यात आले.
या चित्रपटाची निर्मिती ‘लिमये विश्वप्रकाश प्रॉडक्शन्स’च्या वतीने करण्यात येत आहे. दोन मित्रांच्या भावनिक, वैचारिक प्रवासावर हरिभाऊ लिमये लिखित ‘याला जीवन ऐसे नाव’ची कथा बेतलेली असून पटकथा-संवाद लक्ष्मीकांत विसपुते यांनी लिहिले आहेत. संगीतकार लहू माधव यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटात आनंद अभ्यंकर, विलास उजवणे, चेतन क्षीरसागर, किशोर नांदलस्कर, तेजस्विनी पाटील, किरण रोंगे, ईशा केतकर, सई कल्याणकर यांच्या भूमिका आहेत.
कामाव्यतिरिक्त आज कोणालाही कोणाशी संवाद साधायला फारसा वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसं नैतिक मूल्य विसरत चालली आहेत. जो तो स्वतःच्या व्यापात मग्न आहे. अशावेळी जीवाला जीव देणारी नाती आणि मैत्री जपणं किती महत्त्वाचं आहे हा संदेश या मराठी चित्रपटातून देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment