खेळ मांडला’ हा कळसूत्री बाहुल्यांच्या खेळावर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे खास आकर्षण आहे मंगेश देसाईचा अभिनय. मंगेश देसाईने यावेळेस त्याची विनोदी अभिनेत्याची इमेज मोडून , एक वेगळी, गंभीर भूमिका केली आहे. मंगेशने या चित्रपटात ‘धासू’ नावाच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या माणसाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला धासू आपल्या वडिलांपाशी मुंबईला जाऊन काही वेगळं काम करण्याची इच्छा व्यक्त करतो, त्यामुळे ते दोघेही मुंबईला येतात. धासूला आपली स्वप्ननगरी सुंदर आणि सरळ वाटत असते, पण प्रत्यक्षात मात्र ती मायानगरी अगदी उलटी असते. कामाच्या शोधात धासू खूप जणांकडे जातो पण त्याला कोणीही काम देत नाही. शेवटी एक दिवस धासू आपला पिढीजात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करायला लागतो, जे बघून त्याचे वडील खुश होतात. परंतु, एका भरधाव ट्रकच्या धडकेने त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो व त्यामुळे सगळ्या आनंदाचे दुःखात परिवर्तन होते. पुढे एका दंगलीत चित्रपटाची कहाणी एक वेगळेच वळण घेते. धासूला रस्त्यात एक अनाथ मुलगी मिळते. धासू सगळ्यांकडे चौकशी करतो पण तिला कोणीच स्वीकारत नाही. हे बघून धासू स्वतः तिचं पालनपोषण करायचं ठरवतो. अशाप्रकारे धासू आपल्या वडिलांच्या मृत्युच्या धक्क्यातून सावरून एका नवीन आयुष्याची सुरुवात करतो. परंतु, धासूला आणखी एक धक्का बसतो, जेव्हा त्याला समजतं की ती मुलगी आंधळी, बहिरी आणि मुकी आहे. आता धासू तिच्या पालनपोषणाची एक नवीन पद्धत अवलंबतो. तो तिला कळसूत्री बाहुलीसारखं तयार करतो आणि त्यानंतर जिवंत कळसूत्री बाहुलीचा खेळ करायला लागतो. धासू या मुलीचं नावही बाहुली ठेवतो. इथे चित्रपटाची कहाणी परत एक वेगळं वळण घेते. एक वार्ताहर धासूचा हा खेळ आपल्या वाहिनीवर दाखवते, त्यामुळे धासू प्रसिद्ध होतो. याच बातमीला बघून एक कुटुंब बाहुलीचे आई वडील असल्याचा दावा करते. ते वार्ताहरच्या मदतीने बाहुलीला शोधायचा प्रयत्न करतात. धासूला हे अजिबात पटत नाही, त्यामुळे तो बाहुलीला घेऊन पळून जातो. शेवटी खूप विचारांती धासू बाहुलीला तिच्या कुटुंबीयांकडे द्यायला तयार होतो आणि चित्रपट संपता संपता आपले डोळे पाणावतात.
खेळ मांडला ३.५ स्टार्स
No comments:
Post a Comment