
निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर एकाहून एक सरस मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. ‘काक स्पर्श’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकावरूनच विषयाचे गांभीर्य आणि काळाचा संदर्भ लक्षात येतो. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण नुकतेच मा.राजसाहेब ठाकरे, प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ब्ल्यू सी येथे संपन्न झाले. यावेळी मा. किरण शांताराम व पार्श्व पब्लिकेशन्सचे राहुल मेहता यांच्या हस्ते ‘काकस्पर्श’ या चित्रपटाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. ‘काकस्पर्श’ च्या निमित्ताने मराठी कॉफी टेबल बुकची ही पहिलीच निर्मिती आहे. या चित्रपटाशी निगडीत छायाचित्र, चित्रीकरणप्रसंगीच्या घटना, गमतीजमती , कलाकारांच्या मुलाखती आणि चित्रपट करताना आलेले अनुभव यात मांडण्यात आले आहेत. या प्रसंगी श्यामची आई आणि बुद्धिबळ या दोन आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली. ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट एल. एल. पी. प्रस्तुत मेधा मांजरेकर, अनिरुद्ध देशपांडे निर्मित ‘काकस्पर्श’ची कथा उषा दातार यांची आहे. तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन गिरीश जोशींनी आपल्या लेखन कौशल्याने पटकथा-संवादरूपात उत्तमरित्या साधले आहे. चित्रपटाच्या मागणीनुसार, साधारण पन्नास वर्षांपूर्वीचा काळ तंतोतंत उभारण्याचा कलादिग्दर्शक प्रशांत राणे आणि अभिषेक विजयकर यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते श्रीपाद पद्माकर आहेत तर राहुल भातणकर संकलक आहेत. पारंपारिक गीतांबरोबरच किशोर कदम यांच्या गीतांना राहुल रानडे आणि अजित – समीर यांचे कर्णमधूर संगीत लाभले आहे. सोनिया परचुरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून अजित रेड्डी यांचे छायांकन आहे. कोकणातील ब्राम्हण कुटुंबात घडलेल्या विविध घटना, तत्कालीन ब्राम्हणी रीतीरिवाज, समाजव्यवस्था आणि ‘वाडा’ संस्कृतीवर, प्रस्थापितांच्या दांभिक वृत्तीवर प्रकाश टाकणारी ‘काकस्पर्श’ची कथा आहे. १९३० ते १९५५ अशा २५ वर्षांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील हृदयस्पर्शी, वास्तवदर्शी चित्रपट म्हणजे ‘काकस्पर्श’. रूढी – परंपरांच्या विळख्यात गुरफटून मानवतेला काळीमा फासणारी, स्त्रीला शूद्राहून – शूद्र लेखून तिच्या जगण्याच्या मुलभूत जन्मसिद्ध हक्कांवर गदा आणणारी, पाखंडी लोकांच्या अत्याचार व दुराचाराची कहाणी या चित्रपटात रेखाटली आहे. आजच्या पिढीला आणि प्रेक्षकांना रुचेल अशीच ही कथा आहे. आपला इतिहास, धर्म कुणी विसरू शकत नाही. इतिहासाचे दाखलेच पुढील सुधारणांचे खरे आधार ठरतात. त्यामुळे जुन्या पिढीला या चित्रपटामुळे पुनःप्रत्यय येईल तर नव्या पिढीला आपल्या इतिहासात डोकावता येईल. विषयांचे वैविध्य, आशयाचे गांभीर्य यांच्या जोडीला उत्कृष्ट पटकथा – संवाद आणि अनुभवी दिग्दर्शन अशी चांगल्या मनोरंजक चित्रपटासाठीची खास जमलेली भट्टी ‘काकस्पर्श’द्वारे लवकरच पाहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment