
सुदर्शन रंगमंचापासून बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत नाटकांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या पुणे शहराने आज मल्टिप्लेक्स कल्चरही तितक्याच आत्मियतेने स्विकारले आहे. जुन्या पेठांमध्ये असणाऱ्या दुकानांवरील गर्दीचा ओघ शहरामधील विविध मॉल्समुळे कमी झालेला नाहीये. थोडक्यात कलाप्रकार, संस्कृती ते दैनंदिन जीवनातील सवयींपर्यंत पुणेकरांनी नाविन्याची कास धरली असली तरी परंपरेची कासही तेवढीच घट्ट धरून ठेवली आहे. पुण्याच्या याच सांस्कृतिक परंपरेच्या इतिहासापासून आजच्या प्रगतीचा ताळेबंद गौतम जोगळेकर निर्मित-दिग्दर्शित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या आगामी चित्रपटातील ’धन्य ती पुण्यनगरी’ या गीतामधून बघायला मिळणार आहे. परदेशात राहणारी एक तरुणी अभ्यासानिमित्त महाराष्ट्रात येते आणि पुणे शहराच्या प्रेमात पडते ही या गाण्याची पार्श्वभूमी आहे. पुण्याचं हे गौरवगीत प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर व नायिका अनुषा दांडेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गीताला संगीतबद्ध केलं आहे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी तर नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात ते गायले आहे. गाण्याचे शब्द गौतम जोगळेकरांचेच आहेत. धन्य ती पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान जी परंपरेने सजली तरी नाविन्याची खाण असे शब्द असणारे हे गाणे पुण्याचे गर्वगीतच बनले आहे. शिवकालापासून – पेशवाईपर्यंत आणि इंग्रजी राजवटीविरुद्ध बंड करणाऱ्या क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिकांपासून समाजसुधारक , विचारवंतांपर्यंत विविध प्रकारचे योगदान पुण्याने देशाला दिले आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती पुणेकरांनी प्राणपणाने जपली आहे. कला, साहित्य, संस्कृती, नाटक, संगीत, चित्रपट ते आजच्या युगातील परम संगणकापर्यंत सर्वांवर ‘मेड इन पुणे’चा शिक्का आहे. पूर्वी पेन्शनरांचे आणि सायकलींचे म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता चारचाकी चालवणाऱ्या आयटी, बीपीओ क्षेत्रातील तरुणांच्या कामाने ओळखले जाऊ लागले आहे. पुण्याची हीच महती ‘धन्य ती पुण्यनगरी’ या गीतातून बघायला मिळणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता या शहरांसाठी बनलेली गाणी आजपर्यंत विविध हिंदी चित्रपटांमध्ये आपण बघितली किंवा ऐकली आहेत. अशाच प्रकारचे पुणे शहराचे, इथल्या संस्कृतीचे आणि पुणेकरांच्या स्वभावाचेही वर्णन या सर्वांचा समावेश या गाण्यात आहे. महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’, ‘विद्येचे माहेरघर’ अशी परंपरागत ओळख पूर्वापार जपत आलेल्या ,तसेच आताही ‘आयटी हब, बीपीओ सिटी’ अशा नव्या ओळखीची बिरुदावली तेवढ्याच मानाने मिरवणाऱ्या पुणे शहराबरोबरच महाराष्ट्राच्याही परंपरा, संस्कृतीची गाथा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. जी जे क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
No comments:
Post a Comment