सीएस फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या आगामी सिनेमात दक्षिणेकडच्या मेघना नायडूचा मोहक चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सीएस फिल्म्सची ही दुसरी निर्मिती आहे. ‘कलियों का चमन’ फुलताना काय काय घडते त्याचे वर्णन आपल्या मादक अदांच्या आधारे करत थेट बॉलीवूडपर्यंत भरारी घेतल्यानंतर ‘हवस’, ‘एके ४७’, ‘क्लासिक डान्स ऑफ लव’ यासारख्या हिंदी सिनेमांसोबतच तेलुगु, तमीळ, बंगाली, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम करणारी मेघना आता या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहे.
सुवर्णा बांदिवडेकर यांची निर्मिती असलेल्या ‘करून टाक गोलमाल’ या सिनेमात मेघना एक आयटम साँग करणार आहे.बॉलीवूडमध्ये ‘मुन्नी’ आणि ‘शीला’चा बोलबाला झाल्यावर मेघना आता मराठीत ‘शैला’ बनून दाखवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक राजेंद्र बांदिवडेकर यांनी मेघनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. मेघना एक उत्तम नृत्यांगना असून ती या गीताला योग्य न्याय देईल असा विश्वास असल्यानेच आपण या गाण्यासाठी तिची निवड केल्याचे मत राजेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केले आहे. ते असेही मानतात की या गाण्याला त्यांना सुंदर चेहऱ्याबरोबरच उत्तम नृत्यांगना हवी होती आणि मेघानावर येऊन त्यांचा शोध संपला. अभिनयासोबत नृत्यातही पारंगत असलेल्या मेघानावर चित्रीत करण्यात येणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचे बोल ‘शैला मी शैला’ असे आहेत. आपल्या भारतीय सिनेसृष्टीचा पाया असलेल्या मराठी सिनेसृष्टीत गाण्याच्या निमित्ताने का होईना पण काम करण्याची संधी मिळाल्याने मेघना खुश आहे आणि मराठीतील ही आपली सुरुवात असल्याचं तिने म्हणलं आहे.
‘करून टाक गोलमाल’ मध्ये ‘शैला मी शैला’ या गीताबरोबरच ‘तुझाच भास, तुझा आभास…’, हृदयी तार छेडताना…’, ‘देते तुम्हा विडा आधी सुपारी फोडा…’ आणि एका शीर्षकगीताचा समावेश आहे. कोकणातील वेळणेश्वरसारख्या आजवर कधीही पडद्यावर न आलेल्या नयनरम्य लोकेशन्सवर ‘तुझाच भास तुझा आभास…’ आणि ‘हृदयी तार छेडताना…’ या दोन गीतांचे चित्रीकरण यापूर्वी करण्यात आले असून प्रसाद भेंडे यांनी कोकणातले निसर्गसौंदर्य कॅमेरात कैद केले आहे. या सिनेमात अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत असून त्याच्या जोडीला गिरीजा जोशी हा नवा चेहरा रुपेरी पडद्यावर चमकणार आहे. याशिवाय मोहन जोशी, उमा सरदेशमुख, अशोक समर्थ, धनंजय मांद्रेकर, विजू खोटे, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, अरविंद धनू, सुनील शिंदे इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
राजेश वामगुडे यांनी मेघानावर चित्रीत होणारे गीत लिहिले आहे तर सुदेश भोसले आणि पौर्णिमा यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. संगीतकार निर्मलकुमार यांनी मेघनाच्या या ‘शैला’ला संगीत दिले आहे. या गीताचे नृत्यदिग्दर्शन मराठीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव करणार आहेत.
प्रेक्षकांचे सर्वांगाने मनोरंजन करणारा परिपूर्ण चित्रपट ‘करून टाक गोलमाल’च्या निमित्ताने द्यायचा असल्याचे मत निर्माती सुवर्णा बांदिवडेकर व्यक्त करतात. त्या म्हणल्या की यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असून, जे जे उत्तम ते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याचाच एक भाग म्हणून मेघना नायडू सारख्या महागड्या अभिनेत्रीला मराठीत आणले आहे.
No comments:
Post a Comment