Thursday, August 9, 2012

दहीहंडीच्या गाण्याने ‘कुंभारवाडा- डोंगरी’ चित्रपटाचा मुहूर्त

1 दहीहंडीच्या गाण्याने कुंभारवाडा  डोंगरी चित्रपटाचा मुहूर्त

सध्याच्या गुन्हेगारी वाढत चाललेल्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी जगताचं चित्रण करणारे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. वास्तववादी चित्रण, तत्कालीन सामाजिक, राजकीय संदर्भ यामुळे हे चित्रपट पाहणाऱ्यांचा एक प्रेक्षकवर्गही तयार झाला आहे. मराठी सृष्टीत तितकासा न हाताळला गेलेला हा विषय ‘कुंभारवाडा- डोंगरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुन्हेगारी जगावर नजर टाकून त्याची कहाणी मांडणा-या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दहीहंडीच्या गाण्याच्या चित्रीकरणाने पार पडला. ‘अंकुर मूव्हीज’ या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटाची निर्मिती अंकिता लाड करत असून सदानंद पप्पू लाड हे दिग्दर्शन करत आहेत. अंकुर स्वामी हा नवोदित अभिनेता या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. समिधा बांदिवडेकर, संदेश जाधव, के. टी. आनंदराव, भारती पाटील, अनिकेत केळकर, सुहास पळशीकर, रवींद्र बेर्डे आणि अनंत जोग यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
सध्या सर्वत्र दहीहंडीची धूम सुरू आहे आणि याचेच औचित्य साधून चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘दहीकाल्याचा उत्सव छान रे, कुणी जाऊ नका लांब रे….’ या गीताच्या तालावर थिरकत गोविंदांच्या जल्लोषाचे चित्रीकरण करण्यात आले. मुलांच्या गोविंदाबरोबरच गोपिकांचा दहीकाला आणि त्यांचाही थरारक जल्लोष या गाण्यात चित्रित करण्यात आला. हे गीत पप्पू लाड यांनी लिहिलेले असून गाण्याचे संगीत अशोक वायंगणकर यांचे आहे.
मुंबईतील गुन्हेगारीची सुरुवात ‘कुंभारवाडा- डोंगरी’ या भागातूनच झालेली असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. सदानंद कोळी या तरुणाचा गुन्हेगारी जगात झालेला प्रवेश आणि त्यानंतरच्या त्याच्या आयुष्यात झालेल्या घटनांचा प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. चित्रपटाची कथा पप्पू लाड यांची असून पटकथा, संवाद प्रकाश भालेकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पूर्ण होऊन दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शक यांचा विचार आहे.

No comments:

Post a Comment