श्री. गिरीशकुमार के. प्रोडक्शनने ‘गोची झाली ना!’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ या दोन व्यावसायिक नाटकांबरोबरच काही फिल्म्स आणि अल्बम्सची निर्मिती केल्यानंतर आता ते ‘ खेळ तमाशा’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करत आहेत.
चित्रपटाच्या ‘खेळ तमाशा’ या नावाबरोबरच चित्रपटाची कथा तमाशा या लोककलेवर आधारीत असल्याचे लक्षात येते. तमाशा या कलेचा लोप पावत चाललेला पारंपारिक बाज आणि लोकांचा त्याकडे बघण्याचा मूळ दृष्टीकोन यातील विसंगती दूर करून त्याचे स्थान जपण्यासाठी नवीन पिढीने केलेला हा एक प्रयत्न आहे. तमाशातील कलावंतांनी जर सिनेमा करायला घेतला तर काय होईल? असा आशय असलेला एक विनोदी मसालापट प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे पाहता येईल.
गिरीशकुमार यांनी नुकतीच ‘लेक वाचवा’ या सी. डी. फिल्मची निर्मिती केली आहे. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या यातील गीतांना नंदू होनप यांनी संगीत दिले आहे आणि नृत्य दिग्दर्शन नरेंद्र पंडीत यांचे आहे. राहुल सोलापूरकर, किशोर महाबोले, प्रकाश धोत्रे, वंदना वाकनीस, मिलिंद ओक, रोहित चव्हाण यांनी या फिल्ममध्ये अभिनय केला आहे.
‘खेळ तमाशा’ या चित्रपटाची कथा कॅनन ५D या डिजिटल कॅमे-याद्वारे चित्रित केली जाणार असून ब-याच वास्तव स्थळांचा यात समावेश असणार आहे. पुणे, सातारा, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे. मराठीतील ब-याच मोठ्या कलावंतांचा समावेश या चित्रपटात असून काही नवीन कलाकारांचा समावेश करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत.
‘खेळ तमाशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक नवीन विनोदी मसालापट बघायला मिळेल असे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आशिष पुजारी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment