‘शोले’ या हिंदी चित्रपटातील रहीम चाचांच्या भूमिकेने अजरामर झालेले ए.के. हंगल यांचे २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील पारेख रुग्णालयात निधन झाले. २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हंगल ९८ वर्षाचे होते. सांताक्रुझ येथील आशा पारेख रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हंगल यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. पण रविवारी सकाळी तिथेच अवतार किशन हंगल यांची प्राणज्योत मालवली. ए. के. हंगल अशाच नावाने प्रसिद्ध असलेले हंगल यांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत २५० हून जास्त चित्रपटांमध्ये अभिनय साकारला.
१९७१ साली वयाच्या ५० व्या वर्षी हृषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटातून हंगल यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. अभिनेत्री जया बच्चन यांचादेखील हा पहिलाच सिनेमा होता. रंगभूमीशी अत्यंत जवळचे नाते असलेल्या हंगल यांनी अनेक नाटके लिहून त्या भूमिका समर्थपणे निभावल्या. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी फार पूर्वीपासून ते जोडले गेले होते. सतत बदलणा-या या रंगांमध्ये आजची तरुणाई रंगभूमीवर काय प्रयोग करतेय हे पाहण्यासाठी हंगल इप्टाच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना आवर्जुन उपस्थित राहत.
हंगल यांना गेली अनेक वर्ष पाठदुखीने ग्रासले होते. घरात पडल्यामुळे त्यांच्या कमरेला जबर मार बसला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही अशक्य झाले होते, अशी माहिती त्यांचे पुत्र विजय हंगल यांनी दिली.
४५ वर्ष रुपेरी पडदा गाजवलेल्या या चाचांना mazzacinema.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली…..
No comments:
Post a Comment