Sunday, August 19, 2012

‘महाराष्ट्र कला निधी’ : मराठी चित्रपट उद्योग समूहासाठी नवीन आधार

झगमगाट आणि देखाव्यांपेक्षा वैचारिक बाजू आणि परिपूर्ण कलाविष्कार यांनी समृद्ध असलेले मराठी सिनेमे मराठी प्रेक्षक नेहमीच उचलून धरतात आणि रसिकांची मनमुराद दादही त्या सिनेमांना मिळते. असे अनेक मराठी सिनेमे आज प्रदर्शित होत आहेत. पण चित्रपट निर्मिती आणि त्यांचे प्रदर्शन यांच्यामध्ये असलेला महत्वाचा भाग अजूनही थोडा अपरिपूर्ण राहतोय, तो म्हणजे चित्रपटाचे मार्केटिंग……
म्हणूनच स्वाभिमान संघटनेचे युवा नेते नितेश राणे आणि ज्येष्ठ निर्माते अनंत पणशीकर यांनी मिळून चित्रपट निर्मिती आणि मार्केटिंग यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ पुरवण्याचा मानस असल्याचे जाहीर केले आहे. ‘महाराष्ट्र कला निधी’ या संस्थेची निर्मिती करून केवळ चित्रपट निर्मितीसाठीच नव्हे तर त्याच्या मार्केटिंगसाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ या संस्थेतर्फे पुरवले जाईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. तसंच मराठी चित्रपटाच्या उद्योग जगतात दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याची क्षमता असून हा दर्जा टिकवण्यासाठी ‘महाराष्ट्र कला निधी’ ची स्थापना केली गेली असल्याचं निर्माते अनंत पणशीकर यांनी स्पष्ट केलं.
मराठी चित्रपटांना बॉलीवूडमधील सिनेमांसारखी प्रसिद्धी मिळत नाही. उत्तम दर्जा आणि वैविध्यता असलेल्या मराठी चित्रपटांचे मार्केटिंगसुद्धा तेवढ्याच ताकदीचे व्हायला हवे. त्यासाठी मराठी उद्योजकांनी एकत्रित येऊन चित्रपट उद्योगासाठी मदत करण्याचे आवाहन नितेश राणे या संस्थेद्वारे करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या पाहुण्यांकडून आपण मदतीची अपेक्षा करतो पण त्याआधी आपल्याच उद्योग समूहासाठी मराठी उद्योजक किती योगदान देतात याचा विचार व्हायला हवा, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
मूळ महाराष्ट्रीय असलेले आणि जगभरात नाव कमावलेले कलावंत, राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि उद्योग जगातील अनुभव या सर्व गोष्टींना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा विश्वास संपादन करून ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक कशा प्रकारे करता येईल आणि यातून आपला विकास कसा साधता येईल याचा विचार या उपक्रमातून केला जाईल असे नितेश राणे आणि अनंत पणशीकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment