Thursday, August 30, 2012

“चॅम्पियन्स” येत आहेत…

२०१० मध्ये सामाजिक विषयाच्या आशयाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘चॅम्पियन्स’ उद्यापासून मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या चार महानगरांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘Aishwarya Arts n Vision, IME Motion Pictures Pvt. Ltd.’ प्रस्तुत या सिनेमाच्या निर्मात्या ऐश्वर्या नारकर असून अभय गाडगीळ आणि श्रीरंग गोडबोले हे सहनिर्माते आहेत.
भारतातील सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे समृद्ध शिक्षणाचा. अजूनही असे अनेक विभाग आहेत जिथे शिक्षणाच्या सोयीचा अभाव आपल्याला दिसून येतो. याच विषयावर भाष्य करणारी कथा रमेश मोरे यांनी लिहिलेली आहे. एका अविकसित, लहानश्या गावात राहणारे कुटुंब, परिस्थितीही तशी बेताचीच. पण आई वडिलांची इच्छाशक्ती आणि मुलांची जिद्द अशा दुहेरी प्रयत्नातून दोन्ही मुले आयुष्यातले यशाचे शिखर गाठण्यात यशस्वी होतात. त्यांच्या शिक्षणात येणा-या अडचणी, संधींचा अभाव या सर्वाची जाणीव असूनही आपल्या मुलांमध्ये असलेल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेऊन आई वडील त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि परिस्थितीला झुकवून उंच झेप घेण्याचं बळ त्या मुलांना मिळवून देतात.
आज भारतातील Municipal शाळेमध्ये १०० मुलांपैकी फक्त ४० ते ५० मुलं दहावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याचं चित्र दिसत आहे. अशा वेळी मुलांमध्ये शिक्षणासाठी तळमळ निर्माण करण्याची आणि त्यासाठी त्यांची मानसिक, वैचारिक वाढ होण्याची अत्यंत गरज आहे. या चित्रपटातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन रमेश मोरे आणि सहदिग्दर्शन दिलीप असुर्डेकर करत आहेत. ऐश्वर्या नारकर,अविनाश नारकर, अरुण नलावडे, उदय सबनीस, हृदयनाथ राणे, मृणाल चेंबूरकर, सविता गोस्वामी,भाग्यश्री पाने, राजेश आंबोळे, अशोक परब या सर्व कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. शंतनू रांगडेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोन बालकलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या चित्रपटात पाहता येईल.
‘शिक्षण मिळत नसते ते मिळवावे लागते’ असा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनाबरोबर सामाजिक जाणीवही करून देतो.

No comments:

Post a Comment