Friday, August 17, 2012

अघोर : २४ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

3 X 20 अघोर : २४ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

आज प्रत्येक गोष्ट मोजण्याचं ‘पैसा’ हे एवढं एकच परिमाण असल्याचं दिसून येतं. पण सेवाभावी वृत्ती ठेवून देशाला निरोगी बनवणा-यांची सुद्धा या धंदेवाईक जगात पैशासाठी स्पर्धा लागलेली पाहायला मिळते आहे. सध्या समाजात घडत असलेल्या विविध घटनांमुळे डॉक्टर आणि रुग्णामधली विश्वासाची गाठ कुठे तरी सैल होत असल्याचं लक्षात येतं. ही सुटत चाललेली गाठ पुन्हा एकदा घट्ट व्हावी या सकारात्मक दृष्टीकोनातून ‘अघोर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘प्रतिभा फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटात, डॉक्टरांच्या वाढत्या व्यावसायिक दृष्टीकोनातून वैद्यकीय जगताचं झालेलं बाजारीकरण आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम रेखाटण्यात आले आहेत. राजू धिवधोंडे, अॅड. रमण सेनाड, मंगेश पितळे निर्मित ‘अघोर’ चित्रपटाचे दिग्दर्शन सलीम शेख यांनी केले असून चित्रपटाची संकल्पना राजू धिवधोंडे यांची आहे.
चित्रपटाची कथा- पटकथा सलीम शेख यांचीच असून संवाद सलीम शेख आणि पराग धोंगे यांचे आहेत. गीतकार प्रवीण दवणे यांचे अप्रतिम शब्द आणि ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांच्या संगीत दिग्दर्शनाने चित्रपटातील गाणी सुश्राव्य अशी बनली आहेत.रवींद्र साठे, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, कौस्तुभ दातार, वैशाली सामंत आणि बेला शेंडे या एक से एक गायकांची सुरावट गीतांमधून ऐकता येईल. चित्रपटाचे छायांकन आशुतोष आपटे, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, कला दिग्दर्शन अमर गायकवाड यांनी केले असून संकलन पराग- सुशांत यांनी केले आहे. आशुतोष खोब्रागडे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, मानसी कुलकर्णी, किशोरी शहाणे, डॉ. विलास उजवणे, विनोद राऊत, तेजस्वी पाटील, शादाब, रमण सेनाड या कलाकरांच्या भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येतील. अत्यंत नाजूक सामाजिक आशयावर आधारलेला ‘अघोर’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

No comments:

Post a Comment