Monday, May 21, 2012

२८ मे पासून झी मराठीवर 'महाराष्ट्राची लोकधारा'.

Maharashtrachai Lokdhara
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील या संपन्न लोककलांना एकत्र आणण्याचं मोलाचं काम शाहीर साबळे यांनी केलं होतं. शाहीर साबळे यांचा हा लोककलेचा वारसा त्यांचा नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे झी मराठीच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणतोय.

महाराष्ट्राच्या विविध प्रातांत विखुरलेल्या या सर्व लोककला नव्या कलाकारांना सोबत घेऊन नव्याने लोकांसमोर आणण्याची संकल्पना 'नटरंग'फेम दिग्दर्शक रवी जाधव यांची. रवी जाधव या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करत असून महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर मार्मिक टिप्पणी करत लोकनाट्याच्या अंगाने जाणार्‍या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता सुभाष, सुनील बर्वे, तुषार दळवी, कविता लाड आदि कलावंत करतील. 

या कार्यक्रमात नमन, गण, गौळण, बतावणी, भारुड, वाघ्या मुरळी, ओव्या, भजन, लावणी, वग, पोवाडा, बाल्या, झाखडी नृत्य अशा महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण आणि संपन्न लोककलांचा अस्सल, अनमोल आणि दुर्मिळ खजिना आठ भागांमध्ये म्हणजे चार आठवडे रसिकांना झी मराठीवरुन दर सोमवार आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता अनुभवता येणार आहे. 

'महाराष्ट्राची लोकधारा'मधूनच ज्याचा कलेचा प्रवास सुरु झाला तो भरत जाधव या कार्यक्रमात केदार शिंदे आणि संतोष पवारसह गौळण आणि बतावणी सादर करणार आहे.

No comments:

Post a Comment