मराठी चित्रपट संगीताच्या वाढत्या क्रेझमुळे मराठी सोबत अमराठी गायकांचाही मराठी संगीताकडे ओढा दिसून येतोय. यात आणखी एक लोकप्रिय नाव दाखल होत आहे, सुफी गायिका हर्षदीप कौर हिचे. प्राप्ती फिल्म्स बॅनरच्या ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या आगामी चित्रपटाद्वारे हर्षदीप कौर मराठीत पदार्पण करते आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत दिलीप लक्ष्मण पाटील, उन्मेष राव आणि शंकर निकाळजे तर दिग्दर्शक आहेत संजय – मोहम्मद. या चित्रपटातील गीतांना पंकज – पुष्कर यांनी संगीत दिले आहे तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी किशोर सावंत सांभाळत आहेत.
‘कतीया करू..’ हे ‘रॉकस्टार’मधील गाणं किंवा ‘बॅण्ड बाजा बारात’ मधलं ‘बारी बरसी…’ असो, ‘रंग दे बसंती’ मधील धीरगंभीर गीत ‘एक ओंकार…’ किंवा ‘झक मार के…’ हे देसी बॉय मधील भन्नाट गीत असो हर्षदीप कौर हिचा आवाज आपल्याला चांगलाच परिचयाचा झालाय. छोट्या पडद्यावर सलग दोन रिआलिटी शोमध्ये विजेती ठरलेली हर्षदीप तिच्या सुफी गायनासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या आवाजाची जादू आता ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या चित्रपटाद्वारे आता मराठीतही अनुभवता येणार आहे. ‘आली रे आली चंद्रमुखी ..’ असे बोल असलेले हे आयटम साँग गीतकार तन्वीर गाझी यांनी लिहिले आहे. या गीतात हर्षदीप कौर हिला साथ दिली आहे ‘सारेगमप’ फेम रोहित राऊत याने. या चित्रपटातून रोहित प्रथमच पार्श्वगायक म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय.
चित्रपटात ‘मिस्टर ना. ना. नकोसे ही व्यक्तिरेखा भारत जाधव साकारत असून किशोरी शहाणे त्यांच्या बायकोच्या भूमिकेत आहे. त्यांच्यासह आदिनाथ कोठारे, तन्वी परब, आशिष गाडे, विजू खोटे, भरत दाभोळकर, केदार शिंदे, सुनील पाल, नकुल घाणेकर, निशा परुळेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या सर्वसामान्य माणसाची कथा मजेशीर ढंगात गुंफण्यात आली आहे. आयुष्यात प्रत्येकवेळी नकारघंटा मिळालेले नाना नकारात्मक विचारांनी त्रासलेले आहेत. एके दिवशी त्यांच्या भूतकाळातील एक घटना त्यांच्या वर्तमानात येऊन त्यांचा भविष्यकाळ कशाप्रकारे बदलून टाकते त्याचे धमाल करमणूकप्रधान चित्रण ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment