Thursday, May 17, 2012

स्वप्न तुझे नी माझे

download3                                        स्वप्न तुझे नी माझे



‘नामदेव उमाजी सिने आर्ट्स’ प्रस्तुत व ‘ओम साई फिल्म्स’ निर्मित ‘स्वप्न तुझे नी माझे’ हा चित्रपट १८ मे ला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची निर्मिती सचिन भालिंगे यांनी केली असून संकल्पना त्यांचीच आहे. अशोक कांबळी यांनी ‘स्वप्न तुझे नी माझे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘स्वप्न तुझे नी माझे’ ही कथा आहे विद्याधर आणि विश्वास या दोन मित्रांमधल्या अतूट नात्याची, त्यांच्या शुद्ध मैत्रीची. शेतकी महाविद्यालयातील प्रशिक्षणानंतर श्रीमंत घरातील विद्याधरला दुष्काळी भागात नंदनवन फुलवायचे आहे, तर गरीब घरातील विश्वासला गावाचा उद्धार करायचा आहे. पण विश्वासच्या अकस्मात जाण्याने त्याचे स्वप्न अर्धवट राहते. त्यांच्या घरातल्यांना आधार देण्यासाठी आणि मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्याधर विश्वासच्या गावी येतो. गावपातळीवर विद्याधरला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतं? मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यात त्याला यश येते का? हे रेखाटणारा चित्रपट म्हणजे ‘स्वप्न तुझे नी माझे’.
आजची तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी धडपडते आहे, पण शहरातील तरुण शेतीकडे वळत नाही. आपल्या ज्ञानाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कृषीक्षेत्रात करून, देशाला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी करावा हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा निर्मात्याचा पर्यंत आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, ओंकार कर्वे, नेहा जोशी, नितीन पारेगांवकर, मेधा गोखले, शाम ठोंबरे, अनिल सुतार, प्रिया गमरे, अशोक पावडे, विद्या भागवत, मिलिंद दास्ताने, संचित यादव या कलाकारांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक अशोक कांबळी यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली असून संवादही त्यांचेच आहेत. कॅमेरामन राजा फडतरे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले असून नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार यांचे आहे. निर्मिती प्रमुखाची जबाबदारी मिलिंद दास्ताने सांभाळत आहेत. या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे शंकर महादेवन यांचा सुपुत्र सिद्धार्थ महादेवन या मराठी चित्रपटातून संगीतकार आणि गायक म्हणून तर भाचा सौमिल संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. मनोज यादव यांनी लिहिलेल्या पाच गीतांना आजच्या पिढीचे सर्वात युवा संगीतकार सौमिल आणि सिद्धार्थ या नवोदित जोडीने संगीत दिले आहे. वेगवेगळ्या भावछटा रेखाटणारी यातील गीते आजच्या तरुणाईला भावतील अशा पद्धतीने संगीतबद्ध करण्यात आली असून आघाडीच्या युवा गायकांनी ती गायली आहेत. ‘झाले गेले विसरावे कसे’ हे गीत सिद्धार्थ महादेवन यांनी गायले असून ‘का रे मना का असा तू आज वागतो’ हे हळुवार गीत श्रेया घोषाल व राहुल वैद्य यांनी गायले आहे. ‘जोगी रे..’ हे गीत मनाली अधिकारी व गुलराज सिंग यांनी गायले आहे तर ‘हाय व्होल्टेज’ हे आयटम साँग सोनू कक्कड यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय ‘परमेश्वरा..’हे भावपूर्ण गीत शंकर महादेवन यांच्या हृदयस्पर्शी आवाजात ऐकायला मिळणार आहे.
मैत्रीची व्याख्या शब्दात व्यक्त करता येणे तसे अवघडच. मैत्री म्हणजे एकमेकांचा विश्वास की आश्वासक सहवास… कोणासाठी मैत्री नवचैतन्य देणारी तर कोणासाठी आयुष्य सावरणारी. मैत्री म्हणजे केवळ अतूट बंधन नसतं तर त्या असतात रेशीमगाठी. मैत्रीच्या अशाच हळुवार नात्यातील चढ-उताराचा प्रवास रेखाटणारा ‘स्वप्न तुझे नी माझे’ हा चित्रपट १८ मे ला प्रदर्शित होतोय.

No comments:

Post a Comment