Tuesday, May 1, 2012

सत्य घटनेवर आधारित ‘दहा डिसेंबर’

‘दहा डिसेंबर’ हा परभणीत घडलेल्या सत्य घटनेवर अनुराधा वैद्य यांनी लिहिलेल्या ‘चौफुला’ कादंबरीवर बेतलेला चित्रपट आहे. ‘मानसी मूव्ही’ निर्मिती संस्थेच्या या चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब भोईर आणि कांचन अधिकारी यांनी मिळून केली आहे.
‘दहा डिसेंबर’ची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे. या कुटुंबाला बांधून ठेवणारी व आपल्या तीन मुली आणि नवरा यांच्यात स्वतःला हरवून बसलेली नायिका सावित्री हिचे पत्नी आणि आई या दोन नात्यातील हळुवार भावनिक बंध या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे, मोहन जोशी, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, सुशांत शेलार, ऐश्वर्या तुपे या कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची ‘दहा डिसेंबर’ या एका तारखेभोवती घडणारी कथा व संवाद दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी लिहिली असून पटकथा लेखा त्रैलोक्य यांची आहे. सौमित्र (किशोर कदम) यांच्या भावस्पर्शी गीतांना मिलिंद इंगळे संगीत देणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण सिनेमाटोग्राफर शेखर अण्णा करत आहेत.
या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.यावेळी ‘राजाराणी ट्रॅव्हल्स’चे अभिजित पाटील तसेच संस्कृती कलादर्पणच्या कार्याध्यक्षा अर्चना नेवरेकर हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
शासनाने आणि प्रसारमाध्यमांनी मुलगा मुलगी समानतेचे प्रबोधन करण्याची जोरदार मोहीम राबवली असली तरी समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत हा विषय पोहोचलेला नाही. आजच्या कॉम्प्यूटरायजेशनच्या जमान्यात स्त्री-पुरुष भेदभाव करणेच मुळी चुकीचे आहे. चूल आणि मूल यात अडकलेली स्त्री कधीच या जोखडामधून पुढे गेलेली असली तरी समाजाची मानसिकता मात्र काही केल्या बदलायला तयार नाही. यातूनच स्त्री-भ्रूण हत्येसारखी कृत्ये घडताना दिसतात. खेड्या-पाड्यातच नव्हे तर उच्चभ्रू पांढरपेशा समाजातही स्त्री-भ्रूण हत्येसारखी गंभीर कृत्ये सर्रास होतात. आजही आपल्या समाजात ‘मुलगी जन्माला येणे’ नापसंतीचे मानले जाते. स्त्री-भ्रूण हत्येचा हाच गंभीर विषय चित्रपटात मांडून त्यावर समाजाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने निर्मात्या -दिग्दर्शिका कांचन अधिकारी ‘दहा डिसेंबर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. समाजाच्या मानसिकतेला बदलू पाहण्यासाठी कांचन अधिकारी हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळत आहेत.
‘दहा डिसेंबर’चे चित्रीकरण मे अखेरीस पूर्ण करून जुलै ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते भाऊसाहेब भोईर आणि कांचन अधिकारी यांचा मानस आहे.

No comments:

Post a Comment