Wednesday, May 2, 2012

४९वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

logo 270x300  ४९वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा


महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा व मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा यावर्षी मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलात ३० एप्रिलला पार पडला. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्काराचे हे ४९ वे वर्ष आहे. भारतीय चित्रपटसृष्टी आपल्या शंभराव्या वर्षात दिमाखदारपणे पदार्पण करत आहे. चित्रपटसृष्टीची ही शतकपूर्ती महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानास्पद आहे कारण तिची मुहूर्तमेढ ही याच मराठी मातीत आणि एका कर्तृत्ववान मराठी माणसाने म्हणजेच आदरणीय दादासाहेब फाळके यांनी रोवली होती. त्यामुळेच या दोन्ही सुवर्णक्षणांना भव्य सोहळ्याच्या साक्षीने साजरे करण्यासाठी या वर्षीच्या सोहळ्यात ‘पाऊलखुणा ! भारतीय चित्रपटसृष्टीची १०० वर्षे’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय क्रमांकांचा पुरस्कार ‘बालगंधर्व’ आणि ‘देऊळ यांना विभागून देण्यात आला. दिग्दर्शनाचा पुरस्कारही उमेश कुलकर्णी आणि रवींद्र जाधव यांना विभागून देण्यात आला. तृतीय उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ताऱ्यांचे बेट’ने पटकावला तर तृतीय दिग्दर्शनाचा पुरस्कार किरण यज्ञोपवीत यांना मिळाला. ग्रामीण भागातील उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘जन गण मन’, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अमित अभ्यंकर, सामाजिक चित्रपट म्हणून ‘दुसऱ्या जगात’ आणि दिग्दर्शक म्हणून सतीश रणदिवे यांना गौरविण्यात आले. अभिनेत्री लीला गांधी यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने, दिलीप प्रभावळकर यांना व्ही.शांताराम विशेष पारितोषिकाने, श्याम बेनेगल यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने तर माधुरी दीक्षितला राज कपूर विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले.
इतर पारितोषिके पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट कथा : कै.मधुसूदन कालेलकर पारितोषिक ‘ताऱ्यांचे बेट’साठी सौरभ भावे
उत्कृष्ट पटकथा : ‘मोरया’ सचिन दरेकर
उत्कृष्ट संवाद : कै. आचार्य अत्रे पारितोषिक ‘अर्जुन’ सचिन दरेकर
उत्कृष्ट गीते : कै. माडगुळकर पारितोषिक ‘डॅंबिस’साठी अरविंद जगताप
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : कै.अरुण पौडवाल पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी नरेंद्र भिडे
उत्कृष्ट पार्श्वगायक : ‘बालगंधर्व’साठी आनंद भाटे
उत्कृष्ट पार्श्वगायिका : ‘अर्जुन’साठी देवकी पंडित
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : ‘अर्जुन’साठी राजेश बिडवे
विशेष अभिनेता : कै. काशीनाथ घाणेकर पारितोषिक ‘गजर’साठी सुहास शिरसाट
विशेष अभिनेत्री : कै. हंसा वाडकर पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी ज्योती चांदेकर
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी आनंद इंगळे
सहायक अभिनेता : कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक ‘अर्जुन’साठी विद्याधर जोशी
सहायक अभिनेत्री : कै. शांता हुबळीकर पारितोषिक ‘सदरक्षणाय’साठी सुहिता थत्ते
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : कै. रंजना देशमुख पारितोषिक ‘गजर’मधील भूमिकेसाठी सुखदा यश
प्रथम पदार्पण निर्माता : ‘गजर’साठी सुनील खोसला आणि विभादत्ता खोसला
प्रथम पदार्पण दिग्दर्शक : ‘गजर’साठी अजित वैभवकर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या हस्ते पुरस्कार विजेत्या कलाकारांना गौरवण्यात आले.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

No comments:

Post a Comment