Thursday, May 10, 2012

‘किडनॅप’ रंगमंचावर दाखल

IMG 9151 1024x768                               किडनॅप रंगमंचावर दाखल

मराठी चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक यशवंत चौघुले यांची ‘किडनॅप’ ही नवीन नाट्यकृती नुकतीच रंगमंचावर दाखल झाली. ‘किडनॅप’ या नाटकाचे लेखन सुहास ज्ञाते यांनी केले असून प्रकाशयोजना आणि दिग्दर्शनाची बाजू कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे. नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून वेशभूषा महेश शेरला यांची आहे. निर्मिती व्यवस्थेची सूत्रे श्रीकांत तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
कौटुंबिक थरार मांडणाऱ्या ‘किडनॅप’ या नाटकात कुणाल लिमये, नंदिनी वैद्य-रेगे, सुहास पळशीकर आणि बालकलाकार ओवी दिक्षीत या सगळयांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. अभिनेते सुहास पळशीकर ह्यांनी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर ‘किडनॅप’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा पदार्पण केले आहे.
लहान मुलं ही ओल्या मातीप्रमाणे असतात, जसे आपण त्यांना घडवू तसे ते घडतात. कुंभार ज्याप्रमाणे माती ओली असतानाच मायेच्या ओलाव्यानेच मातीची भांडी घडवतो , तसेच लहान मुलांचे असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचा मुलांच्या मनावर, जीवनावर, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो हे या नाटकात आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलांच्या जडणघडणीत पालकांचा मोलाचा वाटा असतो. पालकांचे प्रेम जर लहान मुलांना नाही मिळाले तर त्या अजाण मुलांचे व्यक्तिमत्व कसे आकार घेते याचे दर्शन ‘क्षितीज इंटरनॅशनल नाट्यसंस्था’ निर्मित ‘किडनॅप’ या नवीन नाटकात प्रेक्षकांना घडते.

No comments:

Post a Comment