‘हृषीकेश आर्ट्स’ प्रस्तुत ‘मला एक चानस हवा’ हा सिनेमा निर्माते विठ्ठल किसन चव्हाण २५ मे ला घेऊन येत आहेत. दादा कोंडकेंसोबत काम केलेल्या आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वारसदारांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून दादा कोंडकेंना अर्पण केलेला सिनेमा म्हणजे ‘मला एक चानस हवा’.
‘दादा कोंडके’ हे बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व माहित नसलेला रसिक उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. सातत्याने नऊ चित्रपट सिल्वर ज्युबिली होणे हे दादांचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांचे धमाल चित्रपट, गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही दादांचा चित्रपट लागला की चाहते हमखास आवडीने पाहतात. ‘मला एक चानस हवा’ हा दादांच्याच स्टाईलचा चित्रपट आहे.
विठ्ठल चव्हाण आणि अॅड. एकनाथ जावीर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर बाळ मोहिते दिग्दर्शक आहेत. दादा कोंडकेंच्या पहिल्या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंत जबाबदारी सांभाळणारे बाळ मोहिते यांनीच चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. संग्राम शिर्के आणि जितेंद्र गोळे यांनी चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
‘मला एक चानस हवा’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे, दिपाली सय्यद, कुलदीप पवार, विजय पाटकर, मधु कांबीकर, चेतन दळवी, राघवेंद्र कडकोळ आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या धमाल गाण्यांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, नंदेश उमप, वैशाली सामंत, बेला शेंडे या नामवंत गायकांनी गायली आहेत. पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांचे आहे तर छायांकन संजय खानझोडे यांचे आहे. अतुल ताम्हणकर व संजय दाबके यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. चित्रपटातील नृत्ये नरेंद्र पंडित यांची आहेत. ध्वनी प्रशांत पाताडे यांचा तर सतीश बिडकर यांची कला आहे.
ही जमीनदार पुतण्या आणि काकांची कथा आहे. पुतण्या बाजीरावच्या गडगंज संपत्तीवर काकाचा डोळा असतो. ती हडप करण्याच्या उद्देशाने काका आणि त्याचे मित्र सतत बाजीरावला संपवण्याचा कट रचतात. मात्र बाजीरावचा जिवलग मित्र सर्जेराव हे सगळे कट उधळून लावतो. बाजीरावला दादा कोंडकेंसारखा मोठा कलाकार व्हायचे असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो एका स्पर्धेत सहभागी होतो. या सगळ्या गुंत्यात बाजीरावला यश मिळतं का? काकांच्या तावडीतून त्याची सुटका कशी होते…अशा सर्व प्रश्नांची उकल ‘मला एक चानस हवा’ या चित्रपटात येत्या २५ मे ला होणार आहे.
No comments:
Post a Comment