Saturday, May 19, 2012

‘बाबूरावला पकडा’ ध्वनीफित प्रकाशित

2 3 1024x682   बाबूरावला पकडा ध्वनीफित प्रकाशित

बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या परदेशवाऱ्या आपण नेहमीच ऐकतो. परदेशात शूटिंग करण्याचा ट्रेंड तसा जुनाच आहे. पण एखाद्या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण परदेशात होतेय असे आजवर तरी ऐकिवात नाही. ‘साई व्हिजन शोबिझ’ निर्मित, ‘वॉच टॉवर इंटरनॅशनल ‘प्रस्तुत ‘बाबूरावला पकडा’ या मराठी चित्रपटाने आपल्या भल्यामोठ्या स्टारकास्टसह परदेशवारी केली असून हा चित्रपट पूर्णपणे बँकॉकमध्ये चित्रीत झाला आहे. तन्मय सेनगुप्ता आणि अश्विन कुमार क्षीरसागर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
येत्या २५ मे ला ‘बाबूरावला पकडा’ हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. त्याआधी यातील गीतांची ध्वनीफित कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली आहे. ‘जंगली म्युझिक’ कंपनी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बाबूरावला पकडा’च्या ध्वनिफितीत सहा गीतांचा समावेश आहे. गीतकार सागर पवार व ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेल्या या गीतांना दुर्गा नटराज यांनी संगीत दिले आहे. ‘मिस कॉल…’ हे आयटम साँग वैशाली सामंत यांनी ठसकेबाज स्वरात गायले असून ‘जमणार नाही…’ या गीताला आनंद शिंदे, मधुर दातार यांनी आपल्या स्वरांचा ताल धरला आहे. ‘बाबूरावला पकडा…’ हे शीर्षक गीत जोजो यांनी कोरसच्या साथीने गायले आहे, तर ‘पावसाने कसा घात केला…’ हे भावगर्भ गीत रवींद्र साठे आणि आकृती कक्कड यांच्या आवाजात स्वरबद्ध झाले आहे. ‘आग लागली तनमनात…’ हे गीत मधुरा दातार यांच्या बहारदार आवाजात ऐकायला मिळणार आहे. याशिवाय ‘तू स्टेनगन है…’ हे धमाल गीत अभिनेता संजय नार्वेकर यांनी गायिका रितू पाठक यांच्या सोबत गायले आहे. ‘जंगली म्युझिक’ कंपनीने 95 रुपयात चित्रपटाची ध्वनिफीत बाजारात आणली आहे.
या चित्रपटाची कथा – पटकथा आशिष उबाळे यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शनही आशिष उबाळे यांचेच आहे. चित्रपटातील संवाद आशिष यांच्या बरोबर शशांक केवले आणि श्याम पेटकर यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण दामोदर नायडू यांनी केले आहे. मिलन तारी यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते वैभव शहा आहेत. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, समीर धर्माधिकारी, सई ताम्हणकर, सिया पाटील, मीना कँवर, प्रियल पाटील, अभिजीत चव्हाण, अमृता देशमुख, अश्विन क्षीरसागर अशा नामवंत मराठी कलाकारांसोबत हिंदीतील अभिनेता शक्ति कपूर यांचीही यात विशेष भूमिका आहे.
शंभर टक्के परदेशात चित्रित होणारा ‘बाबूरावला पकडा’ हा बहुतेक पहिलाच मराठी चित्रपट आहे. बाबुराव या व्यक्तिरेखेभोवती ही फिरणारी कथा असून त्यात प्रासंगिक विनोदावर भर देण्यात येणार आहे. आता ह्यातील बाबूराव कोण आणि सर्वजण त्याला पकडण्यासाठी एवढे आतुर का झाले आहेत हे २५ मे ला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. त्यापूर्वी यातील गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment