Sunday, May 6, 2012

५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते नुकतेच ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना ‘देऊळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर अभिनेत्री विद्या बालनला ‘द डर्टी पिक्चर’ या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ आणि ‘ब्यारी’ या कन्नडभाषक चित्रपटाने पटकावला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्या व गिरीश यांना रजतकमळ व प्रत्येकी पन्नास हजार रुपये पुरस्कारार्थ प्रदान करण्यात आले. गुरविंदरसिंग यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आनंद भाटे आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका रूपा गांगुली यांनी गाणी सादर केली.
याप्रसंगी बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रकर्मी सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ७७ वर्षीय चटर्जी म्हणाले, ” मी आत्ता काहीही बोलण्याच्या खरोखर मनःस्थितीत नाही. मी माझ्या कामाविषयी कायमच साशंक असायचो. करमणुकीचा हा धंदा काही कामाचा नाही असेच मला वाटायचे. चटर्जी यांच्या या उद्गारानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

No comments:

Post a Comment