Wednesday, May 30, 2012

'लावू का लाथ' १ जूनला प्रदर्शित होणार.

Lavu Ka Lath, Vijay Patkar
विजय पाटकर यांचा निर्माता- दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका असलेला 'शार्दुल फिल्म' निर्मित 'लावू का लाथ' हा चित्रपट येत्या १ जूनला राज्यातील महत्त्वाच्या शहरात प्रदर्शित होतोय. विजय पाटकरांचा आगामी 'लावू का लाथ' सिनेमा शिर्षकातूनच उत्सुकता निर्माण करतो. पिढीजात चालत आलेली एक जुनी चप्पल आणि त्याभोवतीचे रहस्य या चित्रपटात विनोदी ढंगात रेखाटण्यात आले आहे. 

या चित्रपटाची कथा राजेश बामुगडे यांनी लिहीली असून पटकथा, संवाद व गीते ही त्यांनीच लिहिले आहेत. चित्रपटाची सहनिर्मिती राजेश वधावन, निवेदिता परब क्रास्टो यांनी केली आहे. संगीतकार अविनाश- विश्वजीत जोडीने संगीत दिलेल्या यातील गीतांना आनंद शिंदे, वैशाली सामंत, राहुल सक्सेना, मैथिली पानसे-जोशी आणि चिंतामणी सोहोनी या गायकांचा स्वर लाभला आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, नरेंद्र पंडीत आणि विश्वास नाटेकर या तिघांच्या अफलातून नृत्यशैलीतून साकारलेली नृत्ये या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण संजय खानझोडे यांचे असून कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांचे आहे. 

विजय पाटकर, हेमलता बाणे, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, कमलाकर सातपुते, किशोरी अंबिये, अर्चना पाटकर, जयंत सवरकर, राजन ताम्हाणे, जयराज नायर, अनंता कारेकर, राजेश बामगुडे, सुनील होळकर, किशोर रावराणे, प्रकाश पवार, श्रद्धा निगवेकर, शितल कोल्हापुरे, आशुतोष वाडेकर, प्रशांत तपस्वी, भरत चावले, राज पाटील आदी कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका असून पाहुण्या भूमिकेत मनोज जोशी व निशा परुळेकर आहेत.

Tuesday, May 29, 2012

अमृता झाली सावित्री

अमृता पत्की मिस इंडिया होऊन सगळ्यांच्या परिचयाची झाली. ‘ढोलकीच्या तालावर’ मधून अमृता घराघरांत पोहोचली आणि आता ‘सत्या, सावित्री आणि सत्यवान’ या सिनेमातून मराठीत पदार्पण करतेय.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘लालबाग परळ’ अशा अनेक सिनेमांसाठी एडिटर म्हणून काम केलेला सर्वेश परब या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून काम करतोय. या चित्रपटाची कथा राजीव जोशी यांची असून पटकथा संजय मोने यांनी लिहिली आहे.
अमृतासह सचित पाटील, श्रुती मराठे, संजय मोने, गणेश यादव, अतुल काळे, प्रदीप वेलणकर, किशोर प्रधान आदी कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या फॅशन शोमुळे सतत ग्लॅमर विश्वात वावरणारी मराठमोळी अमृता सावित्री नावाच्या नॉन ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती अनिवासी भारतीय मुलीची भूमिका करते आहे. तिची भूमिका नॉन ग्लॅमरस असली तरी तिला वेगवेगळ्या शेड्सही आहेत.
सर्वेशचाही दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असल्याने रिस्क वाटली नाही का यावर अमृताने सांगितले, “मुळात सर्वेश खूप अनुभवी आहे. त्याचा हा पहिला सिनेमा असला तरी त्याने केलेक्या कामामुळे त्याला काय करायचं हे नेमकं माहीत होतं. खरं तर रिस्क ही प्रत्येक ठिकाणीच असते. प्रेक्षकांना सिनेमा आवडण्याशी दिग्दर्शक, बॅनर, बजेट यांचा काहीही संबंध नसतो. उत्तम संहिता आणि दिग्दर्शकाची तयारी असली की बरंच काम सोपं होतं. तसंच मलाही मराठीत काम करायचं होतंच. मात्र मी काहीही ठरवून करत नाही. हिंदीतही काय करायचं हे मी ठरवलेलं नाही. माझे फॅशन शोज सुरु आहेत. तसंच, सध्याचा मराठी सिनेमा खरंच खूप मोठा होतोय. त्यामुळेच मला या सिनेमात काम करताना मजा आली आणि मी माझं पदार्पण एन्जॉय करते आहे.”

Monday, May 28, 2012

आजपासून 'साम टिव्ही' वर 'मिशन दोस्ती डॉट कॉम'.

Mission Dosti Dot Com, Manasi Kulkarni
आजच्या धावत्या जगात नि़खळ मैत्री अनुभवणे तसे कठीण, मात्र मैत्री संपली असे महणता येणार नाही. काळानुरुप मैत्रीची व्याख्या बदलली असली तरी नात्यातील पावित्र्य मात्र संपलेले नाही. अशाच नात्याची कथा डॉ. बालाजी तांबेंच्या कथा- संकल्पनेतून साकारलेल्या "मिशन दोस्ती डॉट कॉम" या आगामी मालिकेत मांडण्यात आली आहे. या अतिशय वेगळ्या धाटणीच्या मालिकेची निर्मिती शोभा आणि एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्स"ने केली असून २८ मे पासून दर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता 'साम टिव्ही' वर सुरु होत आहे.

मैत्रीच्या बदलत्या संदर्भांसह दिग्दर्शक रविंद्र करमरकर या मालिकेच्या निमित्ताने एक त्रिकोणी प्रेमकथा घेऊन आले आहेत. डीजे, संजना आणि रागिणी या तीन पात्रांभोवती या मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. 

या मालिकेत वृषसेन दाभोळकरने डीजेची मुख्य भूमिका साकारली आहे तर मानसी कुलकर्णी यात रागिणीच्या भूमिकेत आहे तर अनुराधा राजाध्यक्ष मीरा बनली आहे. याशिवाय राजन ताम्हणे, सुमुखी पेंडसे, प्रफुल्ल सामंत आदींच्या भूमिका या मालिकेत आहेत.

मालिकेची मुळ संकल्पना आणि कथा डॉ. बालाजी तांबेंची आहे. पटकथा आणि संवाद समीर हेमंत जोशींनी लिहीले आहे. प्रोजेक्ट हेड सुरेश पै असून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यांनी या शिर्षक गीताला संगीत दिले आहे. 

Sunday, May 27, 2012

तिकीटबारीवर मराठी सिनेमांचा जल्लोष

या आठवड्यात तिकीटबारीवर मराठी सिनेमांची गर्दी झालीय. गेला शुक्रवार, २५ मे रोजी आणि पुढच्या शुक्रवारी असे मिळून तब्बल नऊ सिनेमे एकापाठोपाठ एक प्रदर्शित होतायंत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये मराठी तिकीटबारीवर ‘काकस्पर्श ‘ , ‘अजिंठा’ असे बिगबजेट सिनेमे प्रदर्शित होत असल्यानं इतर सिनेमांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. मोठ्या संख्येनं तयार असलेल्या सिनेमांना प्रदर्शनाची घाई झाल्यानं शुक्रवारी (दि. २५) आठ सिनेमे प्रदर्शित होण्याची शक्यता होती ; मात्र ही गर्दी लक्षात येताच पुन्हा तारखांची ढकलाढकली झाली. आता या दोन शुक्रवारी मिळून नऊ मराठी सिनेमे प्रदर्शित होतायंत. आयपीएल आणि हिंदी सिनेमांची पर्वा न करता मायबाप प्रेक्षकांवर भरोसा ठेवत सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी निर्माता , दिग्दर्शकांची गडबड सुरू आहे. आता या रिलीजेसमुळे मराठी सिनेमांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ लागली आहे.
सिनेमा प्रदर्शित करण्याची घाई असल्यानं सर्वांनी शुक्रवारचा (दि. २५) मुहूर्त निवडला होता. ‘कुठे बोलू नका ‘ , ‘ मला एक चानस हवा ‘ , ‘ लावू का लाथ ‘ , ‘बाबूरावला पकडा’ , ‘साहेब’ , ‘ आम्ही का तिसरे’ , ‘एकावर एक वरचढ’ यांच्यासह बिगबजेट ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असे आठ सिनेमे एकाचवेळी तिकीटबारीवर येण्याची चिन्हं दिसत होती. ‘कुठे बोलू नका’ , ‘एकावर एक वरचढ ‘ हे दोन सिनेमे मुंबई आणि पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्रात प्रदर्शित होतायंत.
तिकीटबारीवरच्या संभाव्य गर्दीचा होणारा धोका लक्षात घेऊन ‘ आम्ही का तिसरे ‘ , ‘बाबूरावला पकडा ‘ , ‘ लावू का लाथ ‘ या तीन सिनेमांच्या निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे एक जूनला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय एक जूनला ‘ धागेदोरे ‘ हा सिनेमाही असल्यानं त्या दिवशी एकूण चार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

Friday, May 25, 2012

मला मराठी साहित्य वाचायचंय : आमीर खान

220px Aamir Khan From The NDTV Greenathon at Yash Raj Studios 111 मला मराठी साहित्य वाचायचंय : आमीर खान



मागच्या वर्षी आमीर खानने एका पुरस्कार वितरण सोहळ्यात काही मराठी ओळी वाचल्या होत्या. त्यावेळेस त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना लवकरच तो मराठी शिकेल अशी ग्वाही दिली होती. यावर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्याने त्याचे म्हणणे खरं करून दाखवलं. आमीरने IBN लोकमतला कोणत्याही लिखाणाच्या संदर्भाशिवाय मराठीत एक हटके मुलाखत दिली, हे खरच कौतुकास्पद आहे. ‘द ग्रेट भेट’ या कार्यक्रमात IBN लोकमतचे मुख्य संपादक निखिल वागळे यांनी आमीरला साधे साधे प्रश्न विचारले आणि या उत्साही अभिनेत्याने जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं अस्खलित मराठीत दिली. त्याने मराठी साहित्य वाचण्याची आणि मराठी भाषा जास्तीत जास्त शिकण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर आमीर असंही म्हणाला की पत्नी आणि मुलांच्याबरोबर मराठी शिकण्यासाठी त्याला दिवस संपता संपताच वेळ मिळतो. मुलं जरी कंटाळली तरी झोपण्यापूर्वी आमीर मात्र मराठी गांभीर्याने शिकतो.

Monday, May 21, 2012

२८ मे पासून झी मराठीवर 'महाराष्ट्राची लोकधारा'.

Maharashtrachai Lokdhara
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील या संपन्न लोककलांना एकत्र आणण्याचं मोलाचं काम शाहीर साबळे यांनी केलं होतं. शाहीर साबळे यांचा हा लोककलेचा वारसा त्यांचा नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे झी मराठीच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणतोय.

महाराष्ट्राच्या विविध प्रातांत विखुरलेल्या या सर्व लोककला नव्या कलाकारांना सोबत घेऊन नव्याने लोकांसमोर आणण्याची संकल्पना 'नटरंग'फेम दिग्दर्शक रवी जाधव यांची. रवी जाधव या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करत असून महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर मार्मिक टिप्पणी करत लोकनाट्याच्या अंगाने जाणार्‍या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता सुभाष, सुनील बर्वे, तुषार दळवी, कविता लाड आदि कलावंत करतील. 

या कार्यक्रमात नमन, गण, गौळण, बतावणी, भारुड, वाघ्या मुरळी, ओव्या, भजन, लावणी, वग, पोवाडा, बाल्या, झाखडी नृत्य अशा महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण आणि संपन्न लोककलांचा अस्सल, अनमोल आणि दुर्मिळ खजिना आठ भागांमध्ये म्हणजे चार आठवडे रसिकांना झी मराठीवरुन दर सोमवार आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता अनुभवता येणार आहे. 

'महाराष्ट्राची लोकधारा'मधूनच ज्याचा कलेचा प्रवास सुरु झाला तो भरत जाधव या कार्यक्रमात केदार शिंदे आणि संतोष पवारसह गौळण आणि बतावणी सादर करणार आहे.

'भारतीय' चे चित्रीकरण सुरू.

Subodh Bhave, Bhartiya
'देऊळ'च्या यशानंतर चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी आपल्या 'देविशा फिल्म्स' तर्फे 'भारतीय' चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाचे सध्या जकीनपेठ (ता.भुदरगड. जि. कोल्हापूर) या अति दुर्गम भागात चित्रीकरण सुरू आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. चित्रपटाची कथा व पटकथा अनिरुद्ध पोतदार यांनी लिहिली असून संवाद संजय पवार यांचे आहेत. 

चित्रपटाला अजय- अतुल यांचे संगीत असून गीते गुरु ठाकुर आणि संदीप खरे यांनी लिहिली आहेत. मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, ऋषिकेश जोशी, मिता सावरकर, स्मिता तळवळकर, उज्वला जोग, शुभांगी लाटकर, तेजश्री खेळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नव्वद टक्के चित्रीकरण कोल्हपुरात होणार असून हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

गौतम जोगळेकरांचा ‘जय जय महाराष्ट्र माझा’

Gautam Joglekar Writer Director1 682x1024  गौतम जोगळेकरांचा जय जय महाराष्ट्र माझा
गौतम जोगळेकर यांचा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा चित्रपट येत्या २५ मे ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. आई सई परांजपे यांच्याच लेखन आणि दिग्दर्शनाचा वारसा चालवणाऱ्या गौतमने आपल्या दोनच चित्रपटातून वेगळेपणाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. ‘पक पक पकाक ‘ सारखा अतिशय वेगळा विषय आणि ‘आई नं. वन’ सारखा मॅड कॉमेडीपट असे दोन चित्रपट गौतमच्या नावावर आहेत.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध ‘व्हिजे’ अनुषा दांडेकर असून तिच्यासोबत महेश मांजरेकर,मृणाल कुलकर्णी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. परदेशात वाढलेल्या एका मराठी मुलीचा महाराष्ट्रात परत आल्यानंतरचा भावनिक प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट महाराष्ट्राची महती तर सांगतोच पण त्याचबरोबर या मातीने जपलेल्या मानवी नात्यांची, भावभावनांची हृदयस्पर्शी कथाही सांगतो.
सरधोपट विनोदी चित्रपट आणि सासू-सूनांच्या मेलोड्रामांमध्ये अडकलेल्या मराठी चित्रपटात आता विविध विषय हाताळले जात आहेत. नव्या पिढीचा, प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरुचीचा विचार करून चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांच्या वेगळ्या प्रयत्नांमुळे हे बदल ठळकपणे समोर आले आहेत. गौतम जोगळेकर हे त्यातील एक नाव. पदार्पणातच ‘पक पक पकाक’ सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात गौतम जोगळेकर यशस्वी ठरले. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी गौतमने अभिनयाची वाटही धुंडाळली होती. नाना पाटेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘प्रहार’ या हिंदी चित्रपटात गौतमने साकारलेला मिल्ट्रीमन अनेकांच्या लक्षात राहिला. पण अभिनयापेक्षा दिग्दर्शनात रस असणाऱ्या गौतमने आपले लक्ष याच क्षेत्रावर केंद्रीत केले. नानाच्या तालमीत तयार झालेल्या गौतमने आपल्या पहिल्या चित्रपटात मुख्य नायक म्हणून नानाचीच निवड केली. ‘पक पक पकाक’ यशस्वी झाला आणि गौतमबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या.
आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ मधूनही गौतमने एक अतिशय वेगळा विषय मांडला आहे. त्यामुळे वेगळ्या विषयाच्या चित्रपटाची वाट बघणाऱ्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ही चांगली ट्रीट ठरू शकते.

Sunday, May 20, 2012

मला एक चानस हवा

2 4 1024x682                                           मला एक चानस हवा

‘हृषीकेश आर्ट्स’ प्रस्तुत ‘मला एक चानस हवा’ हा सिनेमा निर्माते विठ्ठल किसन चव्हाण २५ मे ला घेऊन येत आहेत. दादा कोंडकेंसोबत काम केलेल्या आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वारसदारांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून दादा कोंडकेंना अर्पण केलेला सिनेमा म्हणजे ‘मला एक चानस हवा’.
‘दादा कोंडके’ हे बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व माहित नसलेला रसिक उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. सातत्याने नऊ चित्रपट सिल्वर ज्युबिली होणे हे दादांचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांचे धमाल चित्रपट, गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही दादांचा चित्रपट लागला की चाहते हमखास आवडीने पाहतात. ‘मला एक चानस हवा’ हा दादांच्याच स्टाईलचा चित्रपट आहे.
विठ्ठल चव्हाण आणि अॅड. एकनाथ जावीर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर बाळ मोहिते दिग्दर्शक आहेत. दादा कोंडकेंच्या पहिल्या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंत जबाबदारी सांभाळणारे बाळ मोहिते यांनीच चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. संग्राम शिर्के आणि जितेंद्र गोळे यांनी चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
‘मला एक चानस हवा’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे, दिपाली सय्यद, कुलदीप पवार, विजय पाटकर, मधु कांबीकर, चेतन दळवी, राघवेंद्र कडकोळ आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या धमाल गाण्यांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, नंदेश उमप, वैशाली सामंत, बेला शेंडे या नामवंत गायकांनी गायली आहेत. पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांचे आहे तर छायांकन संजय खानझोडे यांचे आहे. अतुल ताम्हणकर व संजय दाबके यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. चित्रपटातील नृत्ये नरेंद्र पंडित यांची आहेत. ध्वनी प्रशांत पाताडे यांचा तर सतीश बिडकर यांची कला आहे.
ही जमीनदार पुतण्या आणि काकांची कथा आहे. पुतण्या बाजीरावच्या गडगंज संपत्तीवर काकाचा डोळा असतो. ती हडप करण्याच्या उद्देशाने काका आणि त्याचे मित्र सतत बाजीरावला संपवण्याचा कट रचतात. मात्र बाजीरावचा जिवलग मित्र सर्जेराव हे सगळे कट उधळून लावतो. बाजीरावला दादा कोंडकेंसारखा मोठा कलाकार व्हायचे असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो एका स्पर्धेत सहभागी होतो. या सगळ्या गुंत्यात बाजीरावला यश मिळतं का? काकांच्या तावडीतून त्याची सुटका कशी होते…अशा सर्व प्रश्नांची उकल ‘मला एक चानस हवा’ या चित्रपटात येत्या २५ मे ला होणार आहे.

Saturday, May 19, 2012

‘बाबूरावला पकडा’ ध्वनीफित प्रकाशित

2 3 1024x682   बाबूरावला पकडा ध्वनीफित प्रकाशित

बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या परदेशवाऱ्या आपण नेहमीच ऐकतो. परदेशात शूटिंग करण्याचा ट्रेंड तसा जुनाच आहे. पण एखाद्या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण परदेशात होतेय असे आजवर तरी ऐकिवात नाही. ‘साई व्हिजन शोबिझ’ निर्मित, ‘वॉच टॉवर इंटरनॅशनल ‘प्रस्तुत ‘बाबूरावला पकडा’ या मराठी चित्रपटाने आपल्या भल्यामोठ्या स्टारकास्टसह परदेशवारी केली असून हा चित्रपट पूर्णपणे बँकॉकमध्ये चित्रीत झाला आहे. तन्मय सेनगुप्ता आणि अश्विन कुमार क्षीरसागर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
येत्या २५ मे ला ‘बाबूरावला पकडा’ हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. त्याआधी यातील गीतांची ध्वनीफित कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली आहे. ‘जंगली म्युझिक’ कंपनी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बाबूरावला पकडा’च्या ध्वनिफितीत सहा गीतांचा समावेश आहे. गीतकार सागर पवार व ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेल्या या गीतांना दुर्गा नटराज यांनी संगीत दिले आहे. ‘मिस कॉल…’ हे आयटम साँग वैशाली सामंत यांनी ठसकेबाज स्वरात गायले असून ‘जमणार नाही…’ या गीताला आनंद शिंदे, मधुर दातार यांनी आपल्या स्वरांचा ताल धरला आहे. ‘बाबूरावला पकडा…’ हे शीर्षक गीत जोजो यांनी कोरसच्या साथीने गायले आहे, तर ‘पावसाने कसा घात केला…’ हे भावगर्भ गीत रवींद्र साठे आणि आकृती कक्कड यांच्या आवाजात स्वरबद्ध झाले आहे. ‘आग लागली तनमनात…’ हे गीत मधुरा दातार यांच्या बहारदार आवाजात ऐकायला मिळणार आहे. याशिवाय ‘तू स्टेनगन है…’ हे धमाल गीत अभिनेता संजय नार्वेकर यांनी गायिका रितू पाठक यांच्या सोबत गायले आहे. ‘जंगली म्युझिक’ कंपनीने 95 रुपयात चित्रपटाची ध्वनिफीत बाजारात आणली आहे.
या चित्रपटाची कथा – पटकथा आशिष उबाळे यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शनही आशिष उबाळे यांचेच आहे. चित्रपटातील संवाद आशिष यांच्या बरोबर शशांक केवले आणि श्याम पेटकर यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण दामोदर नायडू यांनी केले आहे. मिलन तारी यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते वैभव शहा आहेत. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, समीर धर्माधिकारी, सई ताम्हणकर, सिया पाटील, मीना कँवर, प्रियल पाटील, अभिजीत चव्हाण, अमृता देशमुख, अश्विन क्षीरसागर अशा नामवंत मराठी कलाकारांसोबत हिंदीतील अभिनेता शक्ति कपूर यांचीही यात विशेष भूमिका आहे.
शंभर टक्के परदेशात चित्रित होणारा ‘बाबूरावला पकडा’ हा बहुतेक पहिलाच मराठी चित्रपट आहे. बाबुराव या व्यक्तिरेखेभोवती ही फिरणारी कथा असून त्यात प्रासंगिक विनोदावर भर देण्यात येणार आहे. आता ह्यातील बाबूराव कोण आणि सर्वजण त्याला पकडण्यासाठी एवढे आतुर का झाले आहेत हे २५ मे ला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. त्यापूर्वी यातील गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

Thursday, May 17, 2012

स्वप्न तुझे नी माझे

download3                                        स्वप्न तुझे नी माझे



‘नामदेव उमाजी सिने आर्ट्स’ प्रस्तुत व ‘ओम साई फिल्म्स’ निर्मित ‘स्वप्न तुझे नी माझे’ हा चित्रपट १८ मे ला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची निर्मिती सचिन भालिंगे यांनी केली असून संकल्पना त्यांचीच आहे. अशोक कांबळी यांनी ‘स्वप्न तुझे नी माझे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘स्वप्न तुझे नी माझे’ ही कथा आहे विद्याधर आणि विश्वास या दोन मित्रांमधल्या अतूट नात्याची, त्यांच्या शुद्ध मैत्रीची. शेतकी महाविद्यालयातील प्रशिक्षणानंतर श्रीमंत घरातील विद्याधरला दुष्काळी भागात नंदनवन फुलवायचे आहे, तर गरीब घरातील विश्वासला गावाचा उद्धार करायचा आहे. पण विश्वासच्या अकस्मात जाण्याने त्याचे स्वप्न अर्धवट राहते. त्यांच्या घरातल्यांना आधार देण्यासाठी आणि मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्याधर विश्वासच्या गावी येतो. गावपातळीवर विद्याधरला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतं? मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यात त्याला यश येते का? हे रेखाटणारा चित्रपट म्हणजे ‘स्वप्न तुझे नी माझे’.
आजची तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी धडपडते आहे, पण शहरातील तरुण शेतीकडे वळत नाही. आपल्या ज्ञानाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कृषीक्षेत्रात करून, देशाला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी करावा हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा निर्मात्याचा पर्यंत आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, ओंकार कर्वे, नेहा जोशी, नितीन पारेगांवकर, मेधा गोखले, शाम ठोंबरे, अनिल सुतार, प्रिया गमरे, अशोक पावडे, विद्या भागवत, मिलिंद दास्ताने, संचित यादव या कलाकारांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक अशोक कांबळी यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली असून संवादही त्यांचेच आहेत. कॅमेरामन राजा फडतरे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले असून नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार यांचे आहे. निर्मिती प्रमुखाची जबाबदारी मिलिंद दास्ताने सांभाळत आहेत. या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे शंकर महादेवन यांचा सुपुत्र सिद्धार्थ महादेवन या मराठी चित्रपटातून संगीतकार आणि गायक म्हणून तर भाचा सौमिल संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. मनोज यादव यांनी लिहिलेल्या पाच गीतांना आजच्या पिढीचे सर्वात युवा संगीतकार सौमिल आणि सिद्धार्थ या नवोदित जोडीने संगीत दिले आहे. वेगवेगळ्या भावछटा रेखाटणारी यातील गीते आजच्या तरुणाईला भावतील अशा पद्धतीने संगीतबद्ध करण्यात आली असून आघाडीच्या युवा गायकांनी ती गायली आहेत. ‘झाले गेले विसरावे कसे’ हे गीत सिद्धार्थ महादेवन यांनी गायले असून ‘का रे मना का असा तू आज वागतो’ हे हळुवार गीत श्रेया घोषाल व राहुल वैद्य यांनी गायले आहे. ‘जोगी रे..’ हे गीत मनाली अधिकारी व गुलराज सिंग यांनी गायले आहे तर ‘हाय व्होल्टेज’ हे आयटम साँग सोनू कक्कड यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय ‘परमेश्वरा..’हे भावपूर्ण गीत शंकर महादेवन यांच्या हृदयस्पर्शी आवाजात ऐकायला मिळणार आहे.
मैत्रीची व्याख्या शब्दात व्यक्त करता येणे तसे अवघडच. मैत्री म्हणजे एकमेकांचा विश्वास की आश्वासक सहवास… कोणासाठी मैत्री नवचैतन्य देणारी तर कोणासाठी आयुष्य सावरणारी. मैत्री म्हणजे केवळ अतूट बंधन नसतं तर त्या असतात रेशीमगाठी. मैत्रीच्या अशाच हळुवार नात्यातील चढ-उताराचा प्रवास रेखाटणारा ‘स्वप्न तुझे नी माझे’ हा चित्रपट १८ मे ला प्रदर्शित होतोय.

Wednesday, May 16, 2012

‘सत्यमेव जयते- सुपर ब्रेन पण संवेदनशील आमीर’

546276 238964196203047 208159545950179 334752 1052943203 n 1                        सत्यमेव जयते  सुपर ब्रेन पण संवेदनशील आमीर

परवा रात्री(ता. १३) ‘सत्यमेव जयते’चा अजून एक हृदयद्रावक भाग प्रसारित झाला. विषय होता ‘लहान मुलांचं होणारं लैंगिक शोषण’. विषयच भयानक आहे. प्रत्यक्ष शोषित अशा काही जणांनी आपले अनुभव परवा सगळ्यांसमोर सांगितले. अगदी दोन वर्षांचा लहान मुलगाही लैंगिक शोषणाचा बळी पडतो हे ऐकून थरकाप होतो, संताप येतो. अनुभव सांगणाऱ्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की शोषण करणारी व्यक्ती शोषिताच्या घरच्यांच्या, पालकांच्या अगदी जवळची व्यक्ती असते. त्याच्यावर शोषिताच्या पालकांचा प्रचंड विश्वास असतो. याचा शोषण करणाऱ्या व्यक्तीला फायदा होतो आणि शोषिताला तोटा. मुलं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगायला लाजतात, घाबरतात. त्यांना हा विषय पालकांशी कसा बोलायचा असा प्रश्न पडतो. आई, वडील आपल्यावर विश्वास ठेवतील का? का आपल्यालाच दोषी मानतील, या आणि अशा अनेक शंकांनी बिचारे गप्प राहतात. त्यामुळे त्यांचा कोंडमारा व्हायला लागतो, त्यांना जगणं असह्य व्हायला लागतं. त्यांचं लहानपण हिरावून घेतलं जातं. कधी कधी ते स्वतःचीच घृणा करायला लागतात. काही जणांनी तर दहा दहा वर्षं लैंगिक शोषण झाल्यावर असह्य होऊन किंवा मानसिक बळ येऊन घरातल्या मोठ्या माणसांना सांगण्याचं धाडस केलं. त्यांच्यातल्याच एका आईने प्रेक्षकांना आवाहन केलं की मी केलेली चूक तुम्ही करू नका. आपल्या मुलाने/मुलीने नुसत्या खुणेनी जरी अशा गोष्टी सूचित केल्या तरी त्याच्यावर/तिच्यावर विश्वास ठेवा, परक्या लोकांवर नाही. काहीही झालं तरी आपल्या पाल्याला आधार द्या, त्याच्या बाजूने उभे राहा.
या बाबतीत डॉ. मित्रा म्हणाले की अशा लोकांना आपल्या कृत्याबद्दल काहीही गिल्ट नसतो. मुलांना ते अॅडल्टच समजतात. असे लोक मानतात की मुलंही ही गोष्टं एन्जॉय करतात. ते मुलांचा अभ्यास करतात, त्यांच्या हालचाली बघतात. असे कृत्य करणारा माणूस कोणीही असू शकतो. चेहऱ्यावरून आपण त्याला ओळखू शकत नाही. असा माणूस लहान मुलांमध्ये पटकन आणि जास्त वेळ मिसळतो. त्यांच्याबरोबरच जास्त वेळ घालवतो. ते पुढे म्हणाले की एकदा त्यांच्या एका स्टुडंटने विचारले की मोठ्या माणसांचा आदर करावा का? तेव्हा त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यांचे प्रिन्सिपल म्हणले की हे काय शिकवता? तर डॉ.मित्रा म्हणाले की मोठ्या माणसांच्या बिहेविअर बद्दल आदर दाखवा.
नंतर निशित कुमार यांनी सांगितले की लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल कोणताही खास कायदा नाही. ते स्वतः दहा वर्षं कोर्टात लढले आणि त्यांनी अशा मुलांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर आमीर खानने लहान मुलांबरोबर एक वर्कशॉप केले की ज्यामुळे मुलं याबाबतीत सावध होतील, स्वतःला ते वाचवू शकतील. मुलं सावध झाली तरी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मात्र मोठ्या माणसांची आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध ठोस कायदा हवाच यासाठी आमीर तर्फे सर्वांच्या सह्या असलेले पत्रक सरकारला सादर केले जाणार आहे ज्यावर पहिली सही अभिनेत्री श्रीदेवीने केली.
असा कार्यक्रम करणाऱ्या आमीर खानला सुपर ब्रेन म्हणून रिस्पेक्ट केलं पाहिजे कारण IPL चालू असताना सुद्धा आमीर IPL व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणतोय. IPL सुरु असताना मिडिया जवळजवळ सुट्टीवर जातं. राजकारणीही या काळात काही न करता गप्प राहतात. सगळा देशच IPL मध्ये गुंततो. IPL हा माईंड स्पेस ऑक्युपाय करणारा इव्हेंट आहे किंवा होता. IPL सुरु झाल्यावर खूप कमी कार्यक्रम लाँच झाले किंवा झालेच नाहीत म्हणलं तरी चालेल. फक्त ‘सत्यमेव जयते’ लाँच झाला आणि तोही रविवार या ‘प्राईम डे’ ला. ज्यांना क्रिकेट मधलं काहीही कळत नाही आणि ज्यांची खरं तर काहीच गरज नाही अशा चीअर गर्ल्सना बघण्यापेक्षा प्रेक्षक ‘सत्यमेव जयते’ बघणं पसंत करत आहेत. अश्लील नृत्य, कर्कश्श गाणी यांचा नुसता धुमाकूळ असणारे कार्यक्रम बघण्यापेक्षा प्रेक्षकांना ‘सत्यमेव जयते’ सारखा हृदयस्पर्शी कार्यक्रम बघावासा वाटतोय. या कार्यक्रमाने टीआरपीचे सारे विक्रम मोडून टाकले. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आमीरसारख्या संवेदनशील माणसाला सलाम !!!

Tuesday, May 15, 2012

कोण म्हणतं टक्का दिला

केंद्र सरकारने वीस वर्षांपूर्वी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर देशभर आरक्षणावरून आगडोंब उसळला होता आणि त्यानिमित्ताने जातीयवादावरच्या चर्चेत सर्वांचे पवित्रे उघड होत होते. तेव्हाची राजकीय-सामाजिक परिस्थिती स्फोटक होती. अशावेळी नव्वदोत्तरी नाटकांच्या आगमनातील पहिल्या फळीत ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ रंगभूमीवर आलं. नव्वदोत्तरी नाटकांनी मराठी रंगभूमीवर मोठ्या प्रमाणावर भोवतालच्या अस्थिर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरची थेट प्रतिक्रिया नाटयरुपाने मांडली. यात मंडल आयोगाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीवरचं दंभस्फोट करणारं नाटक होतं,’टक्का.’
आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचं पालन करणं आराध्ये कुटुंबालाही भाग पडतं आणि त्यांच्या घरात कचऱ्या धीवार हा तरुण येतो.
आपल्याला माहीत आहे की असा कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही. संजय पवार एक काल्पनिक सिच्युएशन तयार करून आपल्यासमोर ठेवतात. ती देखील आदर्श अशी. राष्ट्रात एकात्मता निर्माण व्हावी असं कोणाला वाटणार नाही ? मग अशा परिस्थितीत खरंच ती आणण्यासाठी कार्यक्रम राबवला गेला तर माणसं कशी वागतील ? नागर मराठी प्रेक्षक असलेल्या मध्यम, उच्च मध्यमवर्गीय समाजाला पेचात पकडण्याचा डाव नाटककार इथे हुशारीने खेळतो. त्यासाठी त्याने या विषयाला पूरक असे जे कच-देवयानीचं रूप वापरलं आहे तेही हिंदू पुराणकथांमधलं. त्यातील देवयानी कचाला शाप देते की तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल.
एक कचऱ्या सोडला तर नाटकातील सर्व पात्रं उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचऱ्याचा दगडाचा देव आपल्या देव्हाऱ्यात मांडायला विरोध करणाऱ्या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचऱ्याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे अँटिक पीस म्हणून बघणाऱ्या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचऱ्याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसतं. कोणी जोशी कुटुंब मागासवर्गीय घरात आणावा लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचं सरकारला कळवतं, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची लिस्ट बघायला जाणाऱ्या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. नाटकात कचऱ्याचा प्रवेश तसा उशीराच होतो. पण त्यानंतरची त्याची जहाल टिप्पणी मात्र प्रत्येक प्रसंगानंतर भरतवाक्यासारखी मागे उरते, टोचत राहते. तो म्हणतो, “जन्मजात श्रेष्ठत्वाच्या लढाईत काही माणसांनी जन्मजात क्षुद्रपणा मान्य करायचा आणि जन्मजात श्रेष्ठांनी आपला ताठरपणा सोडलाय, हे शतकाच्या स्लो प्रोसेसमध्ये पाहत राहायचं. वर पुन्हा त्येंचंच कवतिक, ‘सुधारले बरं का, काही म्हणून मानत नाही.”
संजय पवारांच्या वैचारिक बैठकीतला हा थेटपणा व्यक्त करणारे तिखट संवाद हे या नाटकाचं बलस्थान आहे. आज वीस वर्षांनंतर पहिले काही संदर्भ जुने झाले आहेत. त्यामुळे पूर्वी बाबरी वादाच्या पार्श्वभूमीवर ‘देवावरनं घर मोडण्याइतकं अडानी नाय आपन’ या संवादातली जाणवणारी दाहकता आता कमी झाली आहे. अर्थात परिस्थिती स्फोटक राहत नाही तेव्हाच अशा नाटकांचा कस लागतो. ‘टक्का’ मधला राजकीय भाग आज तीव्र राहिला नसला तरी त्यातला सामाजिक आशय तसाच जिवंत आहे आणि तो मांडण्याची गरज आजही संपलेली नाही, हे लक्षात येतं.
अनिरुद्ध खुटवडने दिग्दर्शकीय मांडणीत नाटकाची दृश्यरचना सोपी ठेवून त्यातला संवादांत सामावलेला आशय उंचावण्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. अर्थात संवादांत बोचरेपणा अधिक असल्याने ते उच्चारणारे स्वर कठोर न होता, त्याला वितंडवादाचं स्वरूप न येता ते सहज आणि सॉफ्ट कसे होतील हेही पाहिलं आहे. सुदर्शन आणि कचऱ्या यांच्या दोन टोकाच्या पोझिशन्समधून भूमिकांमधील तीव्रता पकडली. नरेंद्र भिडेंच्या संगीताने आधीचा जाणीवपूर्वक स्वीकारलेला आघातीपणा नंतर क्रमशः कमी करत संगीत संवादी नोटपर्यंत नेऊन नाट्याशयाला हातभार लावला आहे.
उपेंद्र लिमयेचा कचऱ्या हा मुळातंच ऑथरबॅक आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा रोल आहे. तो साकारणाऱ्या नटाला गॅलरी प्लेईंगचा मोह होऊ शकतो. उपेंद्रच्या पहिल्या प्रवेशात जेव्हा कचऱ्याची घरात एन्ट्री होते, तो या मोहात पडतो की काय असं वाटलं कारण त्याचा स्वर जास्तच ठासून आणि एका शैलीदारपणे येऊ लागला. पण पुढच्या सीनपासून उपेंद्रने त्याचा नैसर्गिक आवाज पकडला आणि नाटकाचा तोल सावरला. त्याची भूमिका पुढे उंचावत गेली. अनिता दातेने अत्यंत सहजतेने आणि विश्वासाने सुकन्याचं मानवी असणं व्यक्त केलं. विचारी प्रेक्षकाचं नेतृत्व करणारी ही व्यक्तिरेखा आहे. अनिताने ती प्रभावीपणे निभावली. पद्मनाभ बिंडचा आवेशी सुदर्शन खूप पटणारा होता. वसंत अवसरीकरांचा धमाल शुक्राचार्य, शेखर नवरेंचा समंजस आविष्कार, विनिता पिंपळखरेंचं खोटं न वाटणारं लाडिक बोलणं यांचा प्रयोगाच्या रंगतीत वाटा होताच. संयोगिता भावेंच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेलाच मर्यादा असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला.
नाटकाची निर्मिती सीमांत पुणेची असून, लेखक आहेत संजय पवार. नाटकाचं दिग्दर्शन अनिरुद्ध खुटवड यांनी केलं असून, नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचं आहे. नाटकाला पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांनी दिलं आहे. नाटकातील कलावंत आहेत – उपेंद्र लिमये, अनिता दाते, पद्मनाभ बिंड, शेखर नवरे, संयोगिता भावे, विनिता पिंपळखरे, वसंत अवसरीकर, अक्षया देवधर, अमर गायकवाड, मयूर निगडे, विघ्नेश जोशी.

Sunday, May 13, 2012

नाशिकमध्ये रंगला मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा

2 2 1024x682 नाशिकमध्ये रंगला मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा

‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ ही देशातील सर्व फिल्म सोसायट्यांची अखिल भारतीय संघटना आहे. महाराष्ट्रातल्या २५ जिल्ह्यात एकूण ५० सोसायट्या कार्यरत आहेत. फेडरेशनचा ‘महाराष्ट्र चॅप्टर’ महाराष्ट्रात क्रियाशील असून त्यांच्यातर्फे नेहमीच निरनिराळे कार्यक्रम आखण्यात येतात. यंदा मराठी सिनेसृष्टीला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र चॅप्टर’ तर्फे मराठी सिनेमाचा शतसांवत्सरिक सोहळा नाशिक येथील पांडव लेण्याजवळील दादासाहेब फाळके स्मारकात ६ मे ला साजरा करण्यात आला. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
मराठी सिनेमाच्या शंभराव्या वर्षातील पदार्पणाच्या या समारोहाची सुरुवात दीप प्रज्वलनाने न करता सुधीर मोघेंनी दादासाहेब फाळके यांच्यावर केलेल्या कविता सादरीकरणाने करण्यात आली. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक मानले जातात. भारतीय सिनेमाबरोबरच मराठी चित्रपटांचा जन्मही ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटामुळे झाला. १९१३ ते २०१३ हे मराठी चित्रपटाचे शतक महोत्सवी वर्ष असून शतकाचा आरंभ २०१२ पासून होत आहे. या निमित्तानेच मराठी सिनेसृष्टीचा हा शतसांवत्सरिक सोहळा नाशिक महापालिकेच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात दादासाहेब फाळके यांच्या उपलब्ध मूकपटावरून पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काईव्हने बनवलेली ‘फाळके अॅन्थालॉजी’ ही ५ मि.फिल्म व १९७० साली फाळके जन्मशताब्दी समारोह समितीने बनवलेली फाळकेंचे कर्तृत्व रेखाटणारी गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘ड्रीम स्केस विंग्ज’ ही डॉक्युमेंटरी या वेळी दाखवण्यात आली.
नाशिकचे महापौर अॅडव्होकेट यतीन वाघ आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गेल्या पन्नास वर्षात मराठी सिनेमाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देणारे निर्माते- दिग्दर्शक आणि कलावंत यांचा सुलोचना दीदी आणि यतीन वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात दिग्दर्शक अमोल पालेकर, जब्बार पटेल, राजीव पाटील, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, संदीप सावंत व निर्माते रामदास फुटाणे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मराठी सिनेमाला प्रेक्षक खेचून आणणारे दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, विजय कोंडके, महेश मांजरेकर, राजू फिरके आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचाही सत्कार करण्यात आला. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी उपस्थित नसल्याने सुधीर मोघे यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. तर जब्बार पटेल आणि महेश मांजरेकर यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांचा पुरस्कार घरी पाठवण्यात आला. या सोहळ्याचे सूत्र संचालन अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी केले.
या कार्यक्रमात मौज प्रकाशनने दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित ‘काळ, कर्म आणि कर्तृत्व’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ५०० पानांच्या या पुस्तकाचे मूल्य ८०० रुपये असून राज्यातील सर्व फिल्म सोसायट्यांना ते भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले. याबरोबरच सिनेपत्रकार मंदार जोशी लिखित चित्रपट सृष्टीच्या १०० वर्षातील महत्वाच्या १०० सिनेमांचा आढावा घेणारं ‘शंभर नंबरी सोनं’ हे पुस्तक महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी किरण शांताराम यांनी आर्थिक मदत केली आहे. सोहळ्याच्या अखेरीस किरण शांताराम यांनी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे (वैयक्तिक देणगी दिल्याबद्दल) आणि कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्व कलावंतांचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना किरण शांताराम यांनी सांगितले की सिनेसृष्टीच्या शंभरी निमित्त वेगवेगळ्या शहरात अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून २०१३ मध्ये हे वर्ष संपत येईल तेव्हा मुंबईमध्ये एका भव्य दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल.

Friday, May 11, 2012

आयफा २०१२ची नामांकने जाहीर

download1                आयफा २०१२ची नामांकने जाहीर

१३ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) अॅवॉर्डसचा सोहळा यावर्षी ७ ते ९ जून रोजी सिंगापोरच्या लायन सिटीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. त्या सोहळ्यातील नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. हिंदी चित्रपटांसाठी २०११ हे साल उत्तम ठरले. केवळ समीक्षकांच्याच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही एकाचवेळी उत्तम कामगिरी करणारे दर्जेदार सिनेमे या वर्षाने दिले. या वर्षात अनेक नवीन चेहरेही उदयास आले. या नवीन चेहऱ्यांचे स्वागत जगभरातील भारतीय प्रेक्षकांनी केले.
IIFA अॅवॉर्डस् २०१२ पॉप्युलर अॅवॉर्डस् नामांकनं –
सर्वोत्कृष्ट चित्रपट -
१. बॉडीगार्ड – अलविरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री, रिलायंस एन्टरटेनमेंट
२. नो वन किल्ड जेसिका – रॉनी स्क्रूवाला
३. रॉकस्टार – धिलीन मेहता
४. द डर्टी पिक्चर – शोभा कपूर, एकता कपूर
५. जिंदगी ना मिलेगी दोबारा – रितेश सिधवानी, फरहान अख्तर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -
१. राज कुमार गुप्ता – नो वन किल्ड जेसिका
२. रोहित शेट्टी – सिंघम
३. इम्तियाझ अली – रॉकस्टार
४. मिलन लुथ्रिया – द डर्टी पिक्चर
५. झोया अख्तर – जिंदगी ना मिलेगी दोबारा
सर्वोत्कृष्ट अभिनेता -
१. अमिताभ बच्चन – आरक्षण
२. सलमान खान – बॉडीगार्ड
३. शाहरुख खान – डॉन २
४. रणबीर कपूर – रॉकस्टार
५ . अजय देवगण – सिंघम
६. हृत्तिक रोशन – जिंदगी ना मिलेगी दोबारा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -
१. प्रियांका चोप्रा – सात खून माफ
२. करीना कपूर – बॉडीगार्ड
३.माही गिल – साहेब बिवी और गँगस्टर
४. कंगना रानावत – तनु वेडस् मनु
५. विद्या बालन – द डर्टी पिक्चर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता –
१. अभय देओल – जिंदगी ना मिलेगी दोबारा
२. रणदीप हुडा – साहेब बिवी और गँगस्टर
३. नसीरुद्दीन शाह – द डर्टी पिक्चर
४. इम्रान हाश्मी – द डर्टी पिक्चर
५. फरहान अख्तर – जिंदगी ना मिलेगी दोबारा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री –
१. दिव्या दत्ता – स्टॅनली का डब्बा
२. परिणीती चोप्रा – लेडीज v/s रिकी बहल
३. सोनाली कुलकर्णी – सिंघम
४. स्वरा भास्कर – तनु वेडस् मनु
५. कल्की कोचलीन – जिंदगी ना मिलेगी दोबारा
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता –
१. परेश रावल – रेडी
२. रितेश देशमुख – डबल धमाल
३. दिव्येंदू शर्मा – प्यार का पंचनामा
४. पितोबाश – शोर इन द सिटी
५. दीपक डोब्रियाल – तनु वेडस् मनु
सर्वोत्कृष्ट खलनायक -
१. इरफान खान – सात खून माफ
२. बमन इराणी – डॉन २
३. विद्युत जमवाल – फोर्स
४. प्रकाश राज – सिंघम
५. नसीरुद्दीन शाह – द डर्टी पिक्चर
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
१. विशाल भारद्वाज – सात खून माफ
२. सोहेल सेन – मेरे ब्रदर की दुल्हन
३. विशाल शेखर – रा.वन
४. शंकर-एहसान-लॉय – जिंदगी ना मिलेगी दोबारा
५. ए. आर. रेहमान – रॉकस्टार
सर्वोत्कृष्ट कथानक -
१. इम्तियाझ अली – रॉकस्टार
२. अमोल गुप्ते – स्टॅनली का डब्बा
३. हिमांशू गुप्ता – तनु वेडस् मनु
४. रजत अरोरा – द डर्टी पिक्चर
५. रीमा कागती, झोया अख्तर – जिंदगी ना मिलेगी दोबारा
सर्वोत्कृष्ट गीतकार –
१. शब्बीर अहमद – तेरी मेरी (बॉडीगार्ड)
२. गुलजार – डार्लिंग (सात खून माफ )
३. ईर्शाद कामील – नादान परिंदे (रॉकस्टार)
४. जावेद अख्तर – ख्वाबोंके परिंदे (जिंदगी ना मिलेगी दोबारा)
५. रजत अरोरा – इश्क सुफियाना (द डर्टी पिक्चर)
सर्वोत्कृष्ट गायक -
१. अॅश किंग – आय लव यू – (बॉडीगार्ड)
२. राहत फतेह अली खान – तेरी मेरी (बॉडीगार्ड)
३. मिका सिंग – सुबह होने ना दे (देसी बॉईज)
४. मोहित चौहान – नादान परिंदे (रॉकस्टार)
५. कमाल खान – इश्क सुफियाना (द डर्टी पिक्चर)
सर्वोत्कृष्ट गायिका -
१. उषा उत्थुप, रेखा भारद्वाज – डार्लिंग (सात खून माफ)
२. श्रेया घोषाल – तेरी मेरी (बॉडीगार्ड)
३. सुनिधी चौहान – टी आमो (दम मारो दम)
४. हर्षदीप कौर – कतिया करू (रॉकस्टार)
५. श्रेया घोषाल – ऊ ला ला (द डर्टी पिक्चर)

Thursday, May 10, 2012

‘किडनॅप’ रंगमंचावर दाखल

IMG 9151 1024x768                               किडनॅप रंगमंचावर दाखल

मराठी चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक यशवंत चौघुले यांची ‘किडनॅप’ ही नवीन नाट्यकृती नुकतीच रंगमंचावर दाखल झाली. ‘किडनॅप’ या नाटकाचे लेखन सुहास ज्ञाते यांनी केले असून प्रकाशयोजना आणि दिग्दर्शनाची बाजू कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे. नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून वेशभूषा महेश शेरला यांची आहे. निर्मिती व्यवस्थेची सूत्रे श्रीकांत तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
कौटुंबिक थरार मांडणाऱ्या ‘किडनॅप’ या नाटकात कुणाल लिमये, नंदिनी वैद्य-रेगे, सुहास पळशीकर आणि बालकलाकार ओवी दिक्षीत या सगळयांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. अभिनेते सुहास पळशीकर ह्यांनी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर ‘किडनॅप’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा पदार्पण केले आहे.
लहान मुलं ही ओल्या मातीप्रमाणे असतात, जसे आपण त्यांना घडवू तसे ते घडतात. कुंभार ज्याप्रमाणे माती ओली असतानाच मायेच्या ओलाव्यानेच मातीची भांडी घडवतो , तसेच लहान मुलांचे असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचा मुलांच्या मनावर, जीवनावर, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो हे या नाटकात आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलांच्या जडणघडणीत पालकांचा मोलाचा वाटा असतो. पालकांचे प्रेम जर लहान मुलांना नाही मिळाले तर त्या अजाण मुलांचे व्यक्तिमत्व कसे आकार घेते याचे दर्शन ‘क्षितीज इंटरनॅशनल नाट्यसंस्था’ निर्मित ‘किडनॅप’ या नवीन नाटकात प्रेक्षकांना घडते.

Tuesday, May 8, 2012

'आज काय स्पेशल' एक आगळा वेगळा शो.

Aaj Kay Special

आज काय स्पेशल ! हा एक आगळा वेगळा शो आहे. 

या कार्यक्रमात पहिल्या सेगमेंट मध्ये कार्यक्र्माची सूत्रसंचालिका प्राजक्ता दातार ही कार्यक्रमात बोलावलेल्या सेलिब्रिटीशी गप्पा मारते त्यांच्या आयुष्यात घडलेलेल किस्से त्यांच्याबरोबर शेअर करते. यावेळी आलेली सेलिब्रिटी नुसतं करीयरबद्दल न बोलता आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतात तसेच त्यांच्या खाण्या पिण्याच्या आवडी निवडी त्यांना किचनरुम मध्ये आलेले अनुभव देखील ते सांगतात.

दुसर्‍या सेगमेंटमध्ये एखादी गृहिणी किंवा शेफ येऊन स्नॅक्स किंवा डिनर  डिश बनवून दाखवतात.

तिसर्‍या सेगमेंटमध्ये एखादा एक्सपर्ट येऊन कारविंग, केक आयसिंग, फ्लॉवर अरेंजमेंट, टेबल मॅनर्स, टेबल एटिकेटस अशा गोष्टी करुन दाखवतो व शिकवतो. 

अशा या कार्यक्रमातून नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. विविध सण या कार्यक्रमाद्वारे साजरे केले जातात जसे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, मकर संक्रांत, चैत्रगौर त्यावेळी त्या सणांसाठी विशेष पाहुणे बोलावले जातात त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या जातात. तसेच त्या सणानिमित्त विशेष रेसिपी बनवली जाते आणि त्याचप्रमाणे त्याला अनुसरुण प्रेझेंटेशन दाखवले जाते.

मे महिन्याच्या छोट्या मित्रांसोबत मे धमाल स्पेशल वीक दि. ७ मे मे महिन्याच्या छोट्या मुलांच्या सुट्टीचेते १२ मे या दरम्यान साजरा केले औचित्य साधून छोट्या सेलिब्रिटी मित्रांसोबत मे धमाल स्पेशल वीक दि. ७ मे ते १२ मे या दरम्यान साजरा केला जाणार आहे. मुलं या क्षेत्रात काम करताना पालकांची जबाबदारी कशी वाढते ते त्यांचा अभ्यास, त्यांचे अरोग्य या गोष्टींवर कसे लक्ष ठेवतात हे सर्व अनुभव या आपल्या छोटया मित्रांच्या आया आपल्याला सांगणार आहेत. 

तेव्हा पहायला विसरु नका ७ मे ते १२ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वा. आणि पुनःप्रक्षेपण सकाळी ११.३० वा. साम टी. व्ही. वर.

तुकाराम

401597 3931453849163 1364252112 33665763 1959857656 n1 300x150                                             तुकाराम



‘तुकाराम’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. चंद्रकांत कुलकर्णी आमच्याशी खूप मनमोकळेपणाने बोलले. ते म्हणाले, ” तुकाराम एकूणच चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. कंटेंट वाईजही खूप मोठा होता. हा सिनेमा बायोपिक्स करायचा असल्यामुळे शिस्तीत काम करावं लागतं. पण माझे लेखक अजित दळवी आणि प्रशांत दळवी यांनी काम खूप सोपं केलं कारण हा विषय जेवढा अभ्यासावा तेवढा कमी आहे. हा सिनेमा बायोपिक्स करायचा असल्यामुळे संपूर्ण चरित्रपट निर्माण करता यावा आणि तो फिक्शन व्हावा, तो डॉक्युमेंटरी करायचा नाही या पद्धतीने त्याचं ट्रीटमेंट झाल्यामुळे खूप छान काम करता आलं आणि लिखाण खूप चांगलं झालं की मग आपोआप ते बाकीच्या टेकिंगला, त्या प्रोडक्शन व्हॅल्यूला कारणीभूत ठरतं. ४०० वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा रिक्रिएट करता यायला हवा होता. ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. १६०९ -१६५० असं तुकारामांचं वय आहे. माझ्या सिनेमात १६१८ ते १६५० असा कालावधी आहे म्हणजेच या चित्रपटात ९/१० वर्षांचा तुकाराम दाखवला आहे. या स्क्रिप्ट मध्ये कम्प्लीट चार फेजेस मधला , चार स्टेट ऑफ माईंड आणि चार अवस्थांमधला तुकाराम दाखवला आहे. बालपण, तरुणपण, मधला आणि जो आपल्याला माहीत आहे तो तुकाराम या पद्धतीने ते सगळं झालं. प्रभातच्या सिनेमात संत झाल्यानंतरचा तुकाराम होता आणि माझ्याकडे बायोपिक्स असल्यामुळे मला अजून मागे जाऊन त्याची सगळी रचना स्क्रिप्टमध्ये होती तशी करावी लागली. राजन कोठारी ‘तुकाराम’चे सिनेमाटोग्राफर आहेत. संगीत दिग्दर्शक म्हणून अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांना एकत्र आणलं कारण मला ते साउंड्स क्रिएट करताना काही जरा वेगळं पाहिजे होतं.
तुकारामांचे वडील सावकार होते, पूर्वी वाणी होते. त्यांचा व्यवसाय पण होता, अशा वेळेला माणूस संत कसा झाला, म्हणजे कशी कशी कारणमीमांसा झाली असेल, काय रिलेशनशिप असेल हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपल्याला नंतरच्या गोष्टी माहीत असतात. पोटात जाऊन काहीच माहीत नसतं. हे काम नेहमीपेक्षा खूप लेंदी झालं म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला आपलं काहीतरी काम होतं. मी जवळपास सातारा सेंटर धरून १५० कि. मी.च्या परिसरात १४ ते १५ गावात शूटिंग केलं. कारण ४०० वर्षांपूर्वी म्हणणं सोपं आहे पण ४०० वर्षांपूर्वी म्हणजे विजेचा खांब नाही, वायर नाही, प्रदूषण नाही, प्लास्टिक नाही हे सगळं पाळायचं होतं. मी सलग ४५ दिवसांचं शूटिंग केलं. १५० जणांचं युनिट आहे. खूप मजा आली हे काम करताना. बजेट, काम, आवाका या पद्धतीने २ ते ३ सिनेमांचं काम एकत्र झालं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ४/५ महत्वाची नावं आहेत त्यातले एक तुकाराम महाराज. त्यांच्यामुळे इतर अनेक जण घडले तर ते स्वतः कसे घडले यासाठी त्या काळात जाण्याचा एक चांगला प्रयत्न केला. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांपेक्षा २० वर्षांनी लहान होते. या सिनेमात ते दोघं एकत्र पण आहेत. ते कसे आहेत, काय आहेत हे मी काही सांगत नाही. त्याची इंटरेस्टिंग पद्धतीने एक गुंफण आहे. क्लायमॅक्सच्या वेळेला तर एक हजार लोकांचा सहभाग होता. सिनेमा करताना खूप अभ्यास करता आला, मागे जाता आलं, भाषेचा अभ्यास करता आला. चांगली स्टारकास्ट मिळाली. खूप लोकांनी तुकाराम सिनेमाचं महत्त्व ओळखून सीनची लेन्थ न बघता कार्य केलं, आनंदाने आले. त्याच्यामुळे काम मोठं झालं. ते स्वतः मोठे होते म्हणून आम्ही मोठं काम करू शकलो. महिनाभराने सिनेमा रिलीज होईल. संदेश भंडारे ज्यांनी वारीवरचं एक पुस्तक छापलंय, त्यांना खास आम्ही स्पेशल फोटोग्राफीसाठी बोलावलं, तर त्यांनी त्या दरम्यान काढलेल्या काही फोटोंचं प्रदर्शन पुणे, मुंबईत करत आहोत. वारीवर एक परिसंवाद पण घेणार आहोत.”
तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जितेंद्र जोशी बद्दल चंद्रकांतजी म्हणाले, “तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले तसं त्याने दिग्दर्शकाशी एकरूप व्हायला हवं होतं आणि तो झालाही.”
‘तुकाराम’ चित्रपटाच्या ध्वनीफितीचं प्रकाशन काल ७ मे रोजी पी.वाय.सी. क्लब, पुणे येथे पार पडले. त्याप्रसंगी निर्माते संजय छाब्रिया, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अजित दळवी, अशोक पत्की, जितेंद्र जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम उपस्थित होते.

Sunday, May 6, 2012

५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते नुकतेच ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना ‘देऊळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर अभिनेत्री विद्या बालनला ‘द डर्टी पिक्चर’ या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ आणि ‘ब्यारी’ या कन्नडभाषक चित्रपटाने पटकावला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्या व गिरीश यांना रजतकमळ व प्रत्येकी पन्नास हजार रुपये पुरस्कारार्थ प्रदान करण्यात आले. गुरविंदरसिंग यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आनंद भाटे आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका रूपा गांगुली यांनी गाणी सादर केली.
याप्रसंगी बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रकर्मी सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ७७ वर्षीय चटर्जी म्हणाले, ” मी आत्ता काहीही बोलण्याच्या खरोखर मनःस्थितीत नाही. मी माझ्या कामाविषयी कायमच साशंक असायचो. करमणुकीचा हा धंदा काही कामाचा नाही असेच मला वाटायचे. चटर्जी यांच्या या उद्गारानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

Saturday, May 5, 2012

'किडनॅप' आज ५ मे पासून रंगमंचावर.

Suhas Palshikar, Kidnap

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचा मुलांच्या मनावर, जीवनावर त्यांच्या एकूण व्यक्तीमत्त्वावर काय परिणाम होतो हे सांगणारं क्षितीज इंटरनॅशनल नाट्यसंस्था निर्मित 'किडनॅप' हे नवीन नाटक येत्या ५ मे ला रंगमंचावर दाखल होत आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक यशवंत चौघुले 'किडनॅप' ही नवीन नाट्यकृती रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. 'किडनॅप' या नाटकाचे लेखन सुहास ज्ञाते यांनी केले असून प्रकाशयोजना आणि दिग्दर्शनाची बाजू कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले आहे. नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून वेशभूषा महेश शेरला यांची आहे. निर्मिती व्यवस्थेची सुत्रे श्रीकांत तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कुणाल लिमये, नंदिनी वैद्य-रेगे, सुहास पळशीकर आणि बालकलाकार ओवी दिक्षीत या सगळ्यांचा दमदार अभिनय या नाटकात पहायला मिळणार आहे. अभिनेता सुहास पळशीकर हे बर्‍याच वर्षाच्या कालावधीनंतर 'किडनॅप' या नाटकातून रंगमंचावर पुन्हा पदार्पण करीत आहेत.

कौटुंबिक थरार मांडणारं 'किडनॅप' हे नाटक ५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

हर्षदीप कौर मराठीत

Harshdeep Kaur4 198x300                                          हर्षदीप कौर मराठीत

मराठी चित्रपट संगीताच्या वाढत्या क्रेझमुळे मराठी सोबत अमराठी गायकांचाही मराठी संगीताकडे ओढा दिसून येतोय. यात आणखी एक लोकप्रिय नाव दाखल होत आहे, सुफी गायिका हर्षदीप कौर हिचे. प्राप्ती फिल्म्स बॅनरच्या ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या आगामी चित्रपटाद्वारे हर्षदीप कौर मराठीत पदार्पण करते आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत दिलीप लक्ष्मण पाटील, उन्मेष राव आणि शंकर निकाळजे तर दिग्दर्शक आहेत संजय – मोहम्मद. या चित्रपटातील गीतांना पंकज – पुष्कर यांनी संगीत दिले आहे तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी किशोर सावंत सांभाळत आहेत.
‘कतीया करू..’ हे ‘रॉकस्टार’मधील गाणं किंवा ‘बॅण्ड बाजा बारात’ मधलं ‘बारी बरसी…’ असो, ‘रंग दे बसंती’ मधील धीरगंभीर गीत ‘एक ओंकार…’ किंवा ‘झक मार के…’ हे देसी बॉय मधील भन्नाट गीत असो हर्षदीप कौर हिचा आवाज आपल्याला चांगलाच परिचयाचा झालाय. छोट्या पडद्यावर सलग दोन रिआलिटी शोमध्ये विजेती ठरलेली हर्षदीप तिच्या सुफी गायनासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या आवाजाची जादू आता ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या चित्रपटाद्वारे आता मराठीतही अनुभवता येणार आहे. ‘आली रे आली चंद्रमुखी ..’ असे बोल असलेले हे आयटम साँग गीतकार तन्वीर गाझी यांनी लिहिले आहे. या गीतात हर्षदीप कौर हिला साथ दिली आहे ‘सारेगमप’ फेम रोहित राऊत याने. या चित्रपटातून रोहित प्रथमच पार्श्वगायक म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय.
चित्रपटात ‘मिस्टर ना. ना. नकोसे ही व्यक्तिरेखा भारत जाधव साकारत असून किशोरी शहाणे त्यांच्या बायकोच्या भूमिकेत आहे. त्यांच्यासह आदिनाथ कोठारे, तन्वी परब, आशिष गाडे, विजू खोटे, भरत दाभोळकर, केदार शिंदे, सुनील पाल, नकुल घाणेकर, निशा परुळेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या सर्वसामान्य माणसाची कथा मजेशीर ढंगात गुंफण्यात आली आहे. आयुष्यात प्रत्येकवेळी नकारघंटा मिळालेले नाना नकारात्मक विचारांनी त्रासलेले आहेत. एके दिवशी त्यांच्या भूतकाळातील एक घटना त्यांच्या वर्तमानात येऊन त्यांचा भविष्यकाळ कशाप्रकारे बदलून टाकते त्याचे धमाल करमणूकप्रधान चित्रण ‘मिस्टर ना. ना. नकोसे’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Friday, May 4, 2012

प्रेक्षकांच्या भेटीला ‘माझी शाळा’

04 1 1024x682  प्रेक्षकांच्या भेटीला माझी शाळा

पॅशनवर्ल्ड एन्टरटेनमेंट निर्मित ‘माझी शाळा’ या चित्रपटात प्रेक्षकांना एका ध्येयवेड्या शेतकऱ्याच्या मुलाची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव जरी ‘माझी शाळा’ असले तरी यातील विषय मात्र सामाजिक आहे. विनोद अनंत तांबे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही स्वतः त्यांनीच लिहिले आहेत.
ऑस्करच्या पटलावर ‘श्वास’ सारख्या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमाचे नाव उमटवणारे अभिनेते अरुण नलावडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्यांनी रामचंद्र नावाच्या शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका साकारली आहे. याशिवाय अलका कुबल-आठल्ये, जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दिपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बालकलाकार आकाश वाघमोडे यांच्या ‘माझी शाळा’ मध्ये भूमिका आहेत. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन विजय मयेकर यांचे असून संकलनाची बाजू सुरेश नागनाले यांनी सांभाळली आहे. हृषीकेश कोळी यांनी ‘माझी शाळा’साठी गीतलेखन केले असून सचिन – दिपेश या संगीतकार जोडीने या गीतांना स्वरसाज चढवला आहे. विनायक जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे.
शेतकऱ्याने शेतकरीच बनून जीवन व्यथित करावे या विचारसरणीला छेद देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. शाळेचे कौतुक, शाळेतील किस्से, शाळेतील आठवणी, शाळेतील गंमतीजमती आणि एकूणच शाळेतील दिवस आठवण्याचे दिवस सरले आहेत. आपण जे केले त्यात रमण्यापेक्षा आपण इतरांसाठी काय करू शकतो त्याची चाचपणी करून त्या दृष्टीने संघर्ष करण्याचे दिवस आले असल्याची जाणीव करून देणारा, तसेच शाळेची नव्हे तर शाळेविषयीची नवी व्याख्या मांडणारा ‘माझी शाळा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Thursday, May 3, 2012

‘बाबूरावला पकडा’ डिजिटल पोस्टरवर

download  बाबूरावला पकडा डिजिटल पोस्टरवर


वॉटर टॉवर प्रस्तुत आणि साई व्हिजन शोबिझ निर्मित ‘बाबूरावला पकडा’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनची एक आगळी वेगळी पद्धत आपल्याला दिसणार आहे. बॉलीवूडमध्ये ‘एक था टायगर’, ‘इशकजादे’, ‘क्या सुपर कुल है हम’, या सिनेमांचे डिजिटल पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. याच प्रकारे ‘बाबूरावला पकडा’ या सिनेमाचे डिजिटल पोस्टर बनवण्यात आले असून लवकरच ते सोशल नेटवर्क साईटच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नवीन कल्पना आणि नवे फंडे वापरून आज मराठी सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आजच्या टेक्नो सॅव्ही जगात मराठी सिनेसृष्टीनेही कात टाकून नवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. पोस्टर्स, होर्डींग्ज आणि बॅनर्स या माध्यमांबरोबरच आजच्या कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या जगात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल पोस्टर हे योग्य माध्यम आहे.
या चित्रपटाची निर्मिती तन्मय सेनगुप्ता आणि अश्विनकुमार क्षीरसागर यांची आहे तर दिग्दर्शन आशिष उबाळे यांचे आहे. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर हे मराठीतील तीन सुपरस्टार्स आपल्याला ‘बाबूरावला पकडा’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या सिनेमाचं पारंपारिक पद्धतीने प्रमोशन करण्याबरोबरच नव्या कल्पनांची सांगड घालत हे डिजिटल पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. जितेंद्र मोरे यांनी हे पोस्टर तयार केले असून लवकरच हे डिजिटल पोस्टर फेसबुक, युट्यूब, सोशल नेटवर्क साईट्स आणि टीव्हीवर आपल्याला पाहता येणार आहे.
डिजिटल पोस्टरच्या या अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळून सिनेमा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात यश मिळेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Wednesday, May 2, 2012

४९वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

logo 270x300  ४९वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा


महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा व मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा यावर्षी मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलात ३० एप्रिलला पार पडला. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्काराचे हे ४९ वे वर्ष आहे. भारतीय चित्रपटसृष्टी आपल्या शंभराव्या वर्षात दिमाखदारपणे पदार्पण करत आहे. चित्रपटसृष्टीची ही शतकपूर्ती महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानास्पद आहे कारण तिची मुहूर्तमेढ ही याच मराठी मातीत आणि एका कर्तृत्ववान मराठी माणसाने म्हणजेच आदरणीय दादासाहेब फाळके यांनी रोवली होती. त्यामुळेच या दोन्ही सुवर्णक्षणांना भव्य सोहळ्याच्या साक्षीने साजरे करण्यासाठी या वर्षीच्या सोहळ्यात ‘पाऊलखुणा ! भारतीय चित्रपटसृष्टीची १०० वर्षे’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय क्रमांकांचा पुरस्कार ‘बालगंधर्व’ आणि ‘देऊळ यांना विभागून देण्यात आला. दिग्दर्शनाचा पुरस्कारही उमेश कुलकर्णी आणि रवींद्र जाधव यांना विभागून देण्यात आला. तृतीय उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ताऱ्यांचे बेट’ने पटकावला तर तृतीय दिग्दर्शनाचा पुरस्कार किरण यज्ञोपवीत यांना मिळाला. ग्रामीण भागातील उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘जन गण मन’, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अमित अभ्यंकर, सामाजिक चित्रपट म्हणून ‘दुसऱ्या जगात’ आणि दिग्दर्शक म्हणून सतीश रणदिवे यांना गौरविण्यात आले. अभिनेत्री लीला गांधी यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने, दिलीप प्रभावळकर यांना व्ही.शांताराम विशेष पारितोषिकाने, श्याम बेनेगल यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने तर माधुरी दीक्षितला राज कपूर विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले.
इतर पारितोषिके पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट कथा : कै.मधुसूदन कालेलकर पारितोषिक ‘ताऱ्यांचे बेट’साठी सौरभ भावे
उत्कृष्ट पटकथा : ‘मोरया’ सचिन दरेकर
उत्कृष्ट संवाद : कै. आचार्य अत्रे पारितोषिक ‘अर्जुन’ सचिन दरेकर
उत्कृष्ट गीते : कै. माडगुळकर पारितोषिक ‘डॅंबिस’साठी अरविंद जगताप
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : कै.अरुण पौडवाल पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी नरेंद्र भिडे
उत्कृष्ट पार्श्वगायक : ‘बालगंधर्व’साठी आनंद भाटे
उत्कृष्ट पार्श्वगायिका : ‘अर्जुन’साठी देवकी पंडित
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : ‘अर्जुन’साठी राजेश बिडवे
विशेष अभिनेता : कै. काशीनाथ घाणेकर पारितोषिक ‘गजर’साठी सुहास शिरसाट
विशेष अभिनेत्री : कै. हंसा वाडकर पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी ज्योती चांदेकर
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक ‘पाऊलवाट’साठी आनंद इंगळे
सहायक अभिनेता : कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक ‘अर्जुन’साठी विद्याधर जोशी
सहायक अभिनेत्री : कै. शांता हुबळीकर पारितोषिक ‘सदरक्षणाय’साठी सुहिता थत्ते
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : कै. रंजना देशमुख पारितोषिक ‘गजर’मधील भूमिकेसाठी सुखदा यश
प्रथम पदार्पण निर्माता : ‘गजर’साठी सुनील खोसला आणि विभादत्ता खोसला
प्रथम पदार्पण दिग्दर्शक : ‘गजर’साठी अजित वैभवकर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या हस्ते पुरस्कार विजेत्या कलाकारांना गौरवण्यात आले.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

Tuesday, May 1, 2012

सत्य घटनेवर आधारित ‘दहा डिसेंबर’

‘दहा डिसेंबर’ हा परभणीत घडलेल्या सत्य घटनेवर अनुराधा वैद्य यांनी लिहिलेल्या ‘चौफुला’ कादंबरीवर बेतलेला चित्रपट आहे. ‘मानसी मूव्ही’ निर्मिती संस्थेच्या या चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब भोईर आणि कांचन अधिकारी यांनी मिळून केली आहे.
‘दहा डिसेंबर’ची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे. या कुटुंबाला बांधून ठेवणारी व आपल्या तीन मुली आणि नवरा यांच्यात स्वतःला हरवून बसलेली नायिका सावित्री हिचे पत्नी आणि आई या दोन नात्यातील हळुवार भावनिक बंध या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे, मोहन जोशी, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, सुशांत शेलार, ऐश्वर्या तुपे या कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची ‘दहा डिसेंबर’ या एका तारखेभोवती घडणारी कथा व संवाद दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी लिहिली असून पटकथा लेखा त्रैलोक्य यांची आहे. सौमित्र (किशोर कदम) यांच्या भावस्पर्शी गीतांना मिलिंद इंगळे संगीत देणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण सिनेमाटोग्राफर शेखर अण्णा करत आहेत.
या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.यावेळी ‘राजाराणी ट्रॅव्हल्स’चे अभिजित पाटील तसेच संस्कृती कलादर्पणच्या कार्याध्यक्षा अर्चना नेवरेकर हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
शासनाने आणि प्रसारमाध्यमांनी मुलगा मुलगी समानतेचे प्रबोधन करण्याची जोरदार मोहीम राबवली असली तरी समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत हा विषय पोहोचलेला नाही. आजच्या कॉम्प्यूटरायजेशनच्या जमान्यात स्त्री-पुरुष भेदभाव करणेच मुळी चुकीचे आहे. चूल आणि मूल यात अडकलेली स्त्री कधीच या जोखडामधून पुढे गेलेली असली तरी समाजाची मानसिकता मात्र काही केल्या बदलायला तयार नाही. यातूनच स्त्री-भ्रूण हत्येसारखी कृत्ये घडताना दिसतात. खेड्या-पाड्यातच नव्हे तर उच्चभ्रू पांढरपेशा समाजातही स्त्री-भ्रूण हत्येसारखी गंभीर कृत्ये सर्रास होतात. आजही आपल्या समाजात ‘मुलगी जन्माला येणे’ नापसंतीचे मानले जाते. स्त्री-भ्रूण हत्येचा हाच गंभीर विषय चित्रपटात मांडून त्यावर समाजाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने निर्मात्या -दिग्दर्शिका कांचन अधिकारी ‘दहा डिसेंबर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. समाजाच्या मानसिकतेला बदलू पाहण्यासाठी कांचन अधिकारी हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळत आहेत.
‘दहा डिसेंबर’चे चित्रीकरण मे अखेरीस पूर्ण करून जुलै ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते भाऊसाहेब भोईर आणि कांचन अधिकारी यांचा मानस आहे.