Sunday, June 10, 2012

तुकोबांच्या शब्दांची आस : हरिहरन

20080316hariharan112  तुकोबांच्या शब्दांची आस : हरिहरन

ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी ’तुकाराम’ या मराठी सिनेमात गाणं गायल्यानंतर, त्यांना आता तुकोबांच्या शब्दांचीच आस लागली आहे. संत तुकारामांच्या मूळ अभंगांवर ते लवकरच अभंग काढणार आहेत. हरिहरन मुंबईतच शिकले असल्यामुळे त्यांना मराठी भाषा नवीन नाही. त्यामुळेच जरी मराठी त्यांची मातृभाषा नसली तरी मराठी गाणी गाताना भाषेचा गोडवा त्यांना समजतो. ‘तुकाराम’ मधलं ‘कोरडं आभाळ’ हे नवं गाणंही त्यांना असंच स्पर्शून गेलं.
हरिहरन यांच्या मते सिनेमाचं संगीत सिनेमासाठी, त्यातल्या व्यक्तिरेखांसाठी, तो पुढे जाण्यासाठी असतं. अल्बमचं तसं नाही. अल्बममधल्या गाण्यावर बाकी गोष्टी गुंफल्या जातात. गाण्यानुसार कथा बनते , त्यानुसार सीन्स येतात. त्यामुळे गाण्यात कमी पडतात ते अल्बम्स मागे राहतात. पण , म्हणून अल्बम्स बाजारात येतंच नाहीत असं नाही. अनेक चांगले अल्बम्स, गाणी बाजारात येत आहेत.
‘ तुकाराम ‘ च्या निमित्ताने तुकोबांचं जीवनकार्य आणि रचनांमुळे ते भारावून गेले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या मूळ रचनांवर एखादा म्युझिक अल्बम काढायला त्यांना नक्की आवडेल . संगीत जगतात होणाऱ्या बदलांबाबत ते म्हणाले की’ ‘ जसं फॅशनचं एक चक्रं असतं तसंच संगीताचं आहे. सध्या आयटम साँग्जची लाट आहे , त्यामुळे ती चालतायंत. उद्या आणखी कसली लाट येईल तेव्हा ती गाणी लोकप्रिय होतील. पण म्हणून शांत , सौम्य गाण्यांना लोकांची पसंती नाहीच असं नाही. प्रत्येक संगीतप्रकारांच्या चाहत्यांत ही गाणी लोकप्रिय होत असतात. आजची तरुणाई फक्त ढिंगचॅक गाणी ऐकते,यात त्यांचा दोष नाही. लहानपणापासून जे ऐकायला मिळणार त्यावरच त्यांची अभिरुची अवलंबून असेल. चांगलं दिलंत तर तरुणांना ते आवडेल ‘ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या सप्टेंबर महिन्यात हरिहरन त्यांच्या प्रसिद्ध ‘कलोनिअल कझिन्स’ अल्बमचा भाग २ घेऊन येत आहेत. हा अल्बम आधीच्या अल्बम प्रमाणेच रॉकिंग असेल. तसंच ‘शाम-ए-गझल’ हा त्यांचा अल्बमही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment