‘पत्री सरकार’ या चित्रपटाद्वारे अतिशय रोमांचकारी आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरलेली क्रांतीसिंह नाना पाटील यांची जीवन कहाणी मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतीकारक आणि त्यांच्या जीवन संघर्षाची कहाणी या सर्वांची व्याप्ती एवढी मोठी आहे की या प्रत्येक क्रांतिकारकाच्या आयुष्यावरच नव्हे तर प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र अध्याय लिहिला जाऊ शकतो. काहींनी आपल्या विचारांना आदर्श मानून चळवळ उभारली तर काहींनी प्रवाहाच्या विरुद्ध जात आपल्या सशस्त्र क्रांतीने ब्रिटीश साम्राज्याला खिळखिळे केले. भारतीय स्वतंत्र लढ्यातील असेच एक धगधगते पर्व म्हणजे ‘क्रांतीसिंह नाना पाटील’.
ब्रिटीश राजवटीच्या अत्याचाराखाली भारतीय समाज भरडून निघत असताना नाना पाटलांनी पश्चिम महाराष्ट्र आणि परिसरात ब्रिटीशांच्या कारवाया उधळून लावत त्यांची जुलमी राजवट मोडून काढली. आपल्या तुफानी सेना या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून ब्रिटीशांबरोबरच सामान्य शेतकऱ्यांवर जुलूम करणाऱ्या सावकारशाही आणि भटशाहीविरुद्ध लढा उभारला आणि स्वतःचं प्रतिसरकार स्थापन केलं.
शेतकरी कामगार पक्षांतर्गत ग्रामीण भागातील चळवळ ही मुख्यतः नाना पाटील यांच्यामुळे शक्य झाली. समाजाला नडणाऱ्या सावकार आणि तत्सम दुष्ट प्रवृत्तींना नानांच्या प्रतिसरकारचा चांगलाच धाक होता. गरिबांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या समाजविघातक शक्तींना प्रति सरकारने अक्षरशः पत्र्या ठोकल्या. त्यामुळे ‘प्रतिसरकार’ हे ‘पत्री सरकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
संवेदनशील विषयांबरोबरच आशयघन मांडणी आणि तांत्रिक कौशल्यासाठी प्रसिद्ध असणारे लेखक-दिग्दर्शक हा चित्रपट घेऊन येत आहेत. गेली दोन दशकं हिंदी मनोरंजन सृष्टीत कार्यरत असणाऱ्या ‘ए.एस.आर.मिडिया’ या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सय्यद आसिफ जाह-शुजा अली सांभाळत आहेत. ऐतिहासिक विषय किंवा व्यक्तिरेखांवर चित्रपट करण्याचं काम हे नेहमीच आव्हानात्मक असतं. तो काळ, त्या व्यक्ती, त्या काळचे संदर्भ, त्यासाठीचे संशोधन, निरीक्षण या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘पत्री सरकार’साठी गेल्या सहा महिन्यांपासून क्रांतीसिन्हांच्या आयुष्याशी निगडीत अनेक दस्तावेज, कागदपत्रे गोळा केली. त्यांच्या साथीदारांशी, नातेवाईकांशी, संबंधित माणसांशी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधला. क्रांतीसिंहांनी प.महाराष्ट्राच्या परिसरात आपल्या संघटनेचा विस्तार केला होता. त्यांच्या भूमिगत चळवळीचे कार्यक्षेत्र असलेल्या या परिसरातील विविध गावांना गजेंद्र अहिरेंनी भेटी दिल्या. यामध्ये नानांसोबत प्रत्यक्ष लढ्यात सहभागी झालेले काही साथीदार त्यांना भेटले. ज्यांनी नानांचे कार्य बघितले असे लोक, त्यांचे वारसदार अशा अनेकांच्या अनुभवकथनातून हा संपूर्ण कालखंड जिवंत झाला. यामध्ये नानांच्या सहकार्यांबरोबरच त्यांच्या मुलीने आणि इतर जवळच्या नातेवाईकांनी नानांच्या देशभक्तीच्या आणि शौर्याच्या सांगितलेल्या कथा सुन्न करणाऱ्या होत्या.
पारतंत्र्याचा काळ, ब्रिटीशांचे अत्याचार अशात नानांनी भूमिगत राहून, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन लढलेला स्वातंत्र्यसमर आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा विचार या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला. चित्रीकरण स्थळे आणि महत्वाच्या पात्रांच्या निवड प्रक्रियेचे काम सध्या वेगात सुरु असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे धगधगतं पर्व लवकरच रुपेरी पडद्यावर साकारणार आहे.
No comments:
Post a Comment