नाट्यसंपदातर्फे ‘लेकुरे उदंड जाहली’ हे नाटक रंगभूमीवर येतंय. २ जूनला त्याचा मुहूर्त करण्यात आला. विशेष गोष्ट अशी की प्रेक्षकांसमोरच या नाटकाचा मुहूर्त झाला.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांची ही अजरामर कलाकृती. काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी ‘लेकुरे उदंड जाहली’चे प्रयोग केले होते. आता पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला हे लोकप्रिय नाटक सज्ज होतंय. टीव्हीवर मालिका आणि शोज मध्ये बिझी असलेला सुमीत राघवन जवळजवळ वीस वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुनरागमन करतोय. या नाटकात प्रमुख भूमिकेत सुमीत आणि त्याची पत्नी चिन्मयी ही जोडी चमकणार आहे. त्याचबरोबर उदय सबनीस, शिवानी, सुनील गोडबोले ह्या कलाकारांच्याही या नाटकात भूमिका आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की या नाटकाला संगीत देत आहेत.
या नाटकाबाबत सुमीत म्हणाला, “नाटकात एकत्र काम करायला मिळाल्याने मी आणि चिन्मयी खूप एक्साईटेड आहोत. १९९३ मध्ये आम्ही दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही अशा संधीच्या शोधात होतो. ऑफर्स येत होत्या, पण दोघांना एकत्र काम करण्याची ऑफर काही हाती येत नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक बघायला गेलो होतो. तेव्हाच ‘लेकुरे उदंड जाहली’ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाटकातले राजा आणि राणी ज्या वयोगटातले आहेत त्याच वयोगटात आम्ही दोघंही सध्या आहोत. त्यामुळे हे करायला खूप मजा येणार आहे. तालमींपूर्वीच आम्हा दोघांची तयारी मात्र सुरु झाली आहे.”
लवकरच ‘लेकुरे…’च्या तालमी सुरु होणार असून २८ जुलैला नाटकाचा शुभारंभ होणार आहे.
No comments:
Post a Comment