Monday, June 11, 2012

”संत तुकारामाच्या ”माणूस” पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन”

Tukaram1 संत तुकारामाच्या माणूस पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन

”संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे दैवत. संत म्हणून तुकाराम श्रेष्ठच होते परंतु एक ‘माणूस’ म्हणूनही ते ‘देव माणूस’ होते. त्यामुळेच आजही महाराष्ट्रातील घराघरात ‘तुकारामा’ चे नाव घेतले जाते. ‘माणूस’ म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते याचे भावरम्य दर्शन चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ”तुकाराम” या नव्या मराठी चित्रपटात पहावयास मिळते. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे तब्बल ७६ वर्षांनी मोठ्या पडद्यावर तुकारामाचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. यापूर्वी म्हणजे १९३६ साली ‘प्रभात’ फिल्म कंपनीने काढलेला ”संत तुकाराम” हा चित्रपट खूपच गाजला होता. त्यातील विष्णुपंत पागनीस यांनी केलेली तुकारामाची भूमिका लोकांना एवढी आवडली होती की, पागनीस हे जणू संत तुकारामाचे ‘अवतार’ आहेत अशा पद्धतीने लोक त्यांना मान देत असत. मात्र ‘तुकाराम’ या नवीन चित्रपटात त्यांच्या संतंत्वापेक्षा तुकारामाच्या ‘माणूस’ पणाचीच थोरवी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तुकारामाचे बालपण दाखविताना लहानपणापासूनच त्यांच्यात ‘माणुसकी’ किती दडलेली होती हे छोट्या-छोट्या प्रसंगातून छान चित्रित केले आहे. ” चांदीचे सालकडे मित्राला का दिले म्हणून जेंव्हा आई रागावते त्यावेळी लहान तुकारामाने ‘ माझ्याजवळ सोन्याचे नव्हते म्हणून चांदीचे दिले’ असे निरागस भावनेने दिलेले उत्तर” त्याची साक्ष देते. त्यानंतर मोठेपणी ‘व्यापार-उदीम’ क्षेत्रात उतरलेले तुकाराम विठूरायावरील भक्तीच्या ओढीमुळे हळूहळू विरक्त होऊ लागतात. भीषण दुष्काळात त्यांनी स्वताच्या घरातील धान्यसाठा रिकामा करून गावकऱ्यांना केलेली मदतही त्यांच्या अपार माणुसकीचे दर्शन घडविते. त्यानंतरही अनेक प्रसंगातून तुकारामाच्या जीवनविषयक तत्वद्यानाचे सहज सुलभ दर्शन घडते. शिवाजी महाराज व तुकाराम यांच्या भेटीचा प्रसंग देखील साधाच परंतु हृद्य झाला आहे. अभंगाची रचना करून रूढी, परंपरा आणि संस्कृतीची मर्यादा ओलांड्ल्याबद्दल ‘धर्मपीठा’ने शिक्षा दिली म्हणून आपली गाथा इंद्रायणी नदीत बुडविणारे तुकाराम नदीकिनारी बसूनच अन्न-पाणी वर्ज्य करतात हा प्रसंगही खूप भावस्पर्शी झाला आहे. मात्र दिग्दर्शकाने ‘ तुकारामाच्या गाथा नदीत तरल्या व त्या तशाच वर आल्या हा ‘चमत्कार’ दाखविलेला नाही उलट या गाथातील अभंगाची लोकांनीच पुढे परंपरा चालवली व या गाथा ‘अमर’ केल्या असे निवेदनात्मक पद्धतीने सांगून कल्पक शेवट केला आहे.
हा चित्रपट प्रभावशाली करण्यात कथा-पटकथा व संवाद लेखक प्रा. अजित दळवी व प्रशांत दळवी तसेच छायालेखक राजन कोठारी यांचाही फार मोठा वाटा आहे. तुकारामाच्या भूमिकेत जितेंद्र जोशी छान शोभले आहेत. त्यांनी तुकारामाचे संतत्व कोठेही डोकावू दिले नाही. तसेच शरद पोंक्षे ( तुकारामाचे वडील ), प्रतीक्षा लोणकर ( तुकारामाची आई ), रुतुसेन दाभोळकर ( तुकारामाचा मोठा भाऊ ), विकास पाटील (तुकारामाचा लहान भाऊ) वीणा जामकर (तुकारामाची पहिली पत्नी ), राधिका आपटे (तुकारामाची दुसरी पत्नी-आवली ), यतीन कार्येकर ( मंबाजी गोसावी ) आदी कलाकारांनी आपापल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. त्यामुळेच या चित्रपटात ”संत तुकारामाच्या ”माणूस” पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन” घडू शकले आहे.

No comments:

Post a Comment