‘धुडगूस’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण करणाऱ्या मैत्र एन्टरटेनमेंट बॅनर अंतर्गत सतीश मोरे, स्नेहा तांबे, गिरीश साळवी, लक्ष्मण साळुंखे आणि आदित्य शर्मा यांची निर्मिती तसेच हनुमानजी रॉक्ज एन्टरटेनमेंटची सहनिर्मिती असलेल्या ‘येडा आप्पा’ चे चित्रीकरण अलिबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात पूर्ण करण्यात आले. सध्या चहुबाजूंनी मराठी सिनेमाचा बोलबाला आहे. राष्ट्रीय पारितोषिकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच मराठी सिनेमे आपला ठसा उमटवत आहेत. मराठी सिनेमांची हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेला ‘येडा आप्पा’ हा मराठी सिनेमा तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
‘येडा आप्पा’ ही मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या एका व्यक्तीची कथा आहे. विक्षिप्त आणि खुनशी व्यक्तीची ही कथा असल्याने चित्रपटात बऱ्याच उत्कंठावर्धक घटनांची गुंफण करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर पांडुरंग बेळेकर यांचे आहे. दिग्दर्शनाबरोबरच किशोर बेळेकरांनी सिनेमाची कथा-पटकथा लिहिली असून संकलनही त्यांचेच आहे. गिरीश साळवी यांनी चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. पवन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
बॉलीवूडनंतर तेलुगु सिनेमातही अभिनय केलेला आशुतोष राणा या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत दाखल होत आहे. ‘येडा आप्पा’ मध्ये आशुतोष शीर्षक भूमिकेत दिसेल. रीमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, अनिकेत विश्वासराव तसेच इतर काही कलाकारांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये विविध छायालेखकांच्या दृष्टीकोनातून अलिबागचे सौंदर्य रसिकांनी पहिले आहे. ‘येडा आप्पा’चे चित्रीकरणही अलिबागमधील चेऊल, नागाव या ठिकाणी करण्यात आले असले तरी या चित्रपटातील लोकेशन्स यापूर्वी कधीच पडद्यावर आलेली नाहीत. त्यामुळे या चित्रपटात छायालेखक रईस अन्सारींच्या नजरेतून अलिबागचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment